IPL Final 2025 Rushi Sunak: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर १९१ धावांचे आव्हान उभे केले आहे. अशात हा सामना पाहण्यासाठी आणि बंगळुरूला चिअर करण्यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह उपस्थित आहेत. ऋषक सुनक यांनी एक्सवर मैदानावरील त्यांच्या पत्नीसह एक फोटो शेअर करत बंगळुरूला सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, ऋषी सुनक बंगळुरूच्या खेळाडूंच्या कामगिरीला दाद देत आहेत. त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंजाबचा सलामीवीर प्रभसीमरन सिंग बाद झाल्यानंतर सुनक टाळ्या वाजवताना दिसत आहेत.
या सामन्यातील बंगळुरूच्या फलंदाजीनंतर माध्यमांशी बोलताना ऋषी सुनक म्हणाले की, “हे अविश्वसनीय दृश्य आहे, हे अगदी विजेसारखे आहे, मी इथे पहिल्यांदाच आलो आहे, गर्दी अविश्वसनीय आहे, मी क्रिकेटचा असा अनुभव कधीच घेतला नव्हता.”
गट फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या आरसीबीने क्वालिफायर १ मध्ये पंजाब विरुद्ध आठ विकेट्सने शानदार विजय मिळवत थेट अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव करून दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएलच्या या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांत १९०/९ धावा केल्या आहेत. आरसीबीची सुरूवातीला फलंदाजी चांगली झाली नव्हती. त्यांनी पॉवरप्लेमध्येच फिल सॉल्टची विकेट गमावली होती. त्यानंतर पॉवरप्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या होत्या. पुढे विराट कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. विराटच्या या धावा बंगळुरूकडून सर्वोच्च धावा ठरल्या. तर मयंक अग्रवाल २४ धावा, रजत पाटीदार २६ धावा, लिव्हिंगस्टोन २५ धावा, जितेश शर्माने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची खेळी केली होती.
बंगळुरूच्या या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघ २० षटकांत ७ फलंदाज गमावत १८४ धावाच करू शकला. यामध्ये शशांक सिंहने ६१ धावा करत एकाकी झुंज दिली.