IPL 2025 RR vs CSK Highlights in Marathi: राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात अखेरीस थरारक विजयाची नोंद केली. रियान परागच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या ६ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने या सामन्याला चांगली सुरूवात केली, पण जशी सुरूवात केली त्या अपेक्षेप्रमाणे संघ धावसंख्या उभारू शकला नाही आणि विजयसाठी सीएसकेला १८३ धावांचे लक्ष्य दिले. पण चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकांत ६ विकेट गमावत १७६ धावा करूच शकला. जडेजा आणि धोनी दोघेही मैदानावर होते, पण धोनी बाद झाला त्यानंतर जडेजा शेवटपर्यंत मैदानात कायम होता, पण यावेळेस मात्र तो संघाला विजय मिळवू देऊ शकला नाही. राजस्थानसाठी नितीश राणा आणि वानिंदू हसरंगा हिरो ठरले. तर अखेरचं षटक टाकणारा संदीप शर्मा उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला.

राजस्थान रॉयल्सचा सुरूवातीच्या तीन सामन्यांसाठी कर्णधार असलेल्या रियान परागला पहिला विजय नोंदवला आहे. कर्णधार म्हणून पहिल्या दोन्ही सामन्यात त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाला पराभवाचा धक्का बसला. पण तिसऱ्या सामन्यात बलाढ्य सीएसकेचा पराभव करत मिळवलेला विजय रियानसाठी खास ठरला. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून रियान परागच्या नेतृत्त्वाखाली हा संघाचा पहिला विजय आहे.

RR vs CSK: अखेरच्या षटकात नेमकं काय घडलं?

अखेरच्या षटकात संदीप शर्माला १९ धावांचा बचाव करायचा होता. संदीपने पहिलाच चेंडू वाईड टाकला. धोनी स्ट्राईकवर होता, दुसऱ्या चेंडूवर धोनीने मोठा फटका खेळायचा गेला आणि सीमारेषेजवळ झेलबाद झाला. चेन्नईच्या विजयाच्या आशांना इथे धक्का बसला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर जेमी ओव्हरटनने १ धाव घेत जडेजाला स्ट्राईक दिली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर जडेजाने १ धाव घेतली. यानंतर चौथ्या चेंडूवर जेमी ओव्हरटनने षटकार खेचला. पण पाचव्या चेंडूवर त्याने २ धाव घेतल्या आणि अखेरच्या चेंडूवर त्याला ९ धावा करायच्या होत्या, जे अशक्य होतं आणि अशारितीने शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत राजस्थानचा संघ विजयी ठरला.

राजस्थानने दिलेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने रचिन रवींद्रला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठीने संथ सुरूवात करत काही फटके मारले. पण राजस्थाच्या संघाने विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन करू दिले नाही.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १८२ धावांची मजबूत धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात बाद झाला. पण यावेळी राजस्थानने आपली चूक सुधारत तिसऱ्या क्रमांकाचा स्पेशालिस्ट नितीश राणाला पाठवले. याचा फायदा अखेर संघाला मिळाला आणि राणा येताच त्याने चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. नितीश राणाने अवघ्या ३६ चेंडूत ८१ धावांची स्फोटक खेळी खेळली.

सामनावीर ठरलेल्या नितीश राणाने पॉवरप्लेमध्येच २१ चेंडूत अर्धशतक झळकावत रविचंद्रन अश्विन, खलील अहमद आणि जेमी ओव्हरटन यांची धुलाई केली. नितीशला शतक पूर्ण करता आले नाही पण त्याने संघासाठी चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. त्यांच्याशिवाय कर्णधार रियान पराग आणि संजू सॅमसन यांनीही थोडेफार योगदान दिले. नूर अहमद आणि मथिशा पाथिराना यांनी चेन्नईसाठी चांगली कामगिरी केली.