BCCI Takes Strong Action Against Shreyas Iyer, PBKS Hardik Pandya : आयपीएल २०२५ हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिएमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात खेळवला गेला. या थरारक सामन्यात अखेर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाने विजय मिळवला. पंजाबचा संघ फायनलमध्ये आरसीबीशी दोन हात करणार आहे. दरम्यान या हाय व्होल्टेज सामन्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ स्पर्धेच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या यांच्यावर कडक कारवाई केली आहे. सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी ‘स्लो ओव्हर-रेट’ राखल्याने श्रेयस आणि हार्दिक या दोघांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या १८ हंगामात पंजाब किंग्ज हा संघ दुसर्‍यांदा स्लो-ओव्हर रेट राखल्याबद्दल दोषी आढळला आहे, आणि यामुळे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला बीसीसीआयने २४ लाखांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित पंजाब किंग्ज संघाला ६ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीसच्या २५ टक्के रक्कम या दोन्हीपैकी जे कमी असेल ते दंड म्हणून द्यावे लागणार आहे.

“आयपीएलच्या कोड ऑफ कंटक्टनुसार किमान ओव्हर-रेट संबंधित त्याच्या संघाचे हे दुसरे उल्लंघन होते, त्यामुळे अय्यरला २४ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला,” असे बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “इम्पॅक्ट प्लेयरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना वैयक्तिकरित्या प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के, यापैकी जे कमी असेल ते इतका दंड ठोठावण्यात आला,” असेही निवेदनात म्हटले आहे.

हार्दिक पंड्याला ३० लाख रुपयांचा दंड

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या १८ व्या हंगामात तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट राखला, ज्यामुळे संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात एखाद्या कर्णधाराला दंड म्हणून भरावी लागलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. तर इंपॅक्ट प्लेअरसह मुंबई इंडियन्सच्या संघातील इतर खेळाडूंना देखील याचा फटका बसला आहे, या सर्वांना १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीसच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. “इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५० टक्के, जे कमी असेल ते दंड ठोठावण्यात आला,” असे बीसीसीआयने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्वालिफायर २ बद्दल बोलायचे झाल्यास पंजबा किंग्ज संघाने हा सामना अगदी सहज जिंकल्याचे पाहायला मिळाले. पंजाबच्या संघाने २०४ धावांचे लक्ष्य ५ गडी आणि ६ चेंडू शिल्लक ठेवून गाठले. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असलेल्या आयपीएल २०२५ च्या फायनलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात करणार आहे.