Kashvi Gautam bought by Gujarat Giants for WPL 2024 : २० वर्षांच्या काशवी गौतमसाठी शनिवार कायमचा संस्मरणीय ठरला. या युवा वेगवान अष्टपैलू खेळाडूला महिला प्रीमियर लीगच्या लिलावात विक्रमी दोन कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. काशवी ही सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली आहे. या लिलावात १ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतलेल्या वृंदा दिनेशला तिने मागे टाकले.
काशवीची मूळ किंमत १० लाख रुपये ठेवण्यात आली होती. गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात या खेळाडूला खरेदी करण्यासाठी बराच वेळ स्पर्धा लागली होती. यामुळेच काही मिनिटांतच काशवीची किंमत १० लाखांवरून दोन कोटींवर पोहोचली. गुजरात जायंट्सने २ कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर, यूपी वॉरियर्सने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरात जायंट्सने तिला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.
काशवी २०२० मध्ये प्रकाशझोतात आली. तिने अंडर-१९ वनडे ट्रॉफीमध्ये मोठा पराक्रम केली. चंदीगडची कर्णधार असताना काशवीने अरुणाचल प्रदेश संघाच्या सर्व १० विकेट घेतल्या. यामध्ये एका हॅट्ट्रिकचाही समावेश होता. वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीमध्ये तिने ७ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. अलीकडे तिने भारत-अ संघाकडून खेळतानाही चांगली कामगिरी केली आहे.
कोण आहे काशवी गौतम?
काशवी गौतम ही भारताची उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आहे. तिचा जन्म २००३ मध्ये चंदीगड, पंजाब येथे झाला. ती भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकली नाही, परंतु तिने भारत अ संघात आणि त्याआधी महिला टी-२० चॅलेंजमध्ये केलेल्या कामगिरीने प्रसिद्धी मिळवली. अलीकडे, इंग्लंड अ विरुद्ध, तिने दोन सामन्यांत भारत अ संघासाठी सुमारे ७ च्या इकॉनॉमीने तीन बळी घेतले. आता ती आंतरराष्ट्रीय संघात नाही, पण डब्ल्यूपीएलच्या व्यासपीठामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.