India Won 6 Gold Medals in one Day at Taiwan Open: तैवान ओपन इंटरनॅशनल अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात ६ सुवर्णपदकांना गवसणी घातली. यामध्ये मराठमोळा खेळाडू तेजस शिरसेने सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तेजसच्या शर्यतीचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशियाई चॅम्पियन ज्योती याराजीने महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत आणखी एक कमालीची वेळ नोंदवत विजय मिळवला. तैपेई म्युनिसिपल स्टेडियमवर राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे असलेल्या याराजीने १२.९९ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. जपानी धावपटू असुका तेराडा (१३.०४ सेकंद) आणि चिसातो कियोयामा (१३.१० सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

तेजस शिरसे हा गेल्या काही वर्षांपासून अडथळा शर्यतीत भारताचे प्रतिनिधीत्त्व करत आहे. २३ वर्षीय तेजसने ११० मीटर अडथळा शर्यतीत १३.५२ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटाकवलं. तेजसच्या कारकिर्दीतील ही त्याची दुसरी सर्वात वेगवान वेळ आहे. यापूर्वी त्याने १३.४१ सेकंद अशी सर्वात वेगवान प्रभावी वेळ नोंदवली होती. स्थानिक खेळाडू ह्सेह युआन-काई (१३.७२ सेकंद) आणि कुएई-रू चेन (१३.७५ सेकंद) यांनी रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

तेजस शिरसेने सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या शर्यतीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्याच्या शर्यतीच्या व्हीडिओला त्याने राजं आलं राजं आलं जिंकूनी हे पावनखिंड चित्रपटातील गाणं लावलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्राचा सुपुत्र, भारताची शान. त्याचा हा व्हीडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताच्या ४x१०० मीटर रिले पथकातील गुरिंदरवीर सिंग, अनिमेश कुजूर, मणिकांत होबलीधर आणि अमलन बोरगोहेन यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ३८.७५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. मे महिन्यात चीनमधील ग्वांगझू येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स रिलेद्वारे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी चौदा देश आधीच पात्र ठरले आहेत आणि आता फक्त दोनच जागा उपलब्ध आहेत. नायजेरिया आणि नेदरलँड्स सध्या ३८.२० सेकंदांसह या दोन जागांसाठी पात्र आहेत.

सुधीक्षा वडलुरी, स्नेहा सत्यनारायण शानुवल्ली, अबिनया राजराजन आणि नित्या गंधे यांच्या भारतीय संघाने महिलांच्या ४x१०० मीटर रिलेमध्ये ४४.०६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अब्दुल्ला अबोबकर आणि पूजा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या तिहेरी उडी आणि महिलांच्या १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. अबूबकरने १६.२१ मीटर उडी मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या पूजाने ४ मिनिटे ११.६३ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. २०२३ मध्ये तिने ४:०९.५२ ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.