India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढं ऑस्ट्रेलियाचा आख्खा संघ १८८ धावांवर गारद झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वानखेडे मैदानावर पहिला सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. सलामीला आलेले इशान किशन आणि शुबमन गिल स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानात धाव घेतली.
कसोटी क्रिकेटमध्ये वादळी खेळी करुन शतक ठोकणाऱ्या विराटला आजच्या सामन्यातही धावांचा सूर मिळावा, यासाठी स्टेडियमधील विराटच्या चाहत्यांनी ‘विराट-विराट’चा नारा लावला. पण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विराटला फक्त ४ धावांवर पायचीत केलं आणि मैदानातील प्रेक्षक सुन्न झाले. मैदानातील हा बोलका क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
भारताची सलामीची इशान-शुबमनची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराटच्या खांद्यावर भारताची कमान होती. पण स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढं विराटला चेंडूवर फटका मारता आला नाही. स्टार्कने फेकलेला चेंडू विराटने मिस केला अन् थेट त्याच्या पॅडवर जाऊन आदळला. त्यामुळे स्टार्कच्या गोलंदाजीवर विराट पायचीत झाला. पाचव्या षटकात स्टार्कने दोन चेंडू स्विंग करुन फेकले. त्यानंतर स्टार्कने अचूक टुप्प्यावर चेंडू फेकला. विराटने त्या चेंडूवर फ्लिक शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मिस झाल्याने पॅडला लागला. त्यानंतर विराटने रिव्यू न घेता तो मैदाबाहेर पडला. विराटने ९ चेंडूत फक्त ४ धावा केल्या.
विराट बाद होताच स्टार्कने अजून एक इन स्विंगर चेंडू फेकला आणि मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद केला. स्टार्कने फेकलेल्या चेंडूने सूर्यकुमारला चकवा दिला अन् त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर लगेच सूर्यकुमारने रिव्यू घेतला. पण रिव्यूचा निर्णय त्याच्या बाजूने लागला नाही. स्टार्कने दोन विकेट घेतल्यानंतर मैदानातील प्रेक्षक सुन्न झाले.