Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवाल हिला सलमीच्याच सामन्यात गाशा गुंडाळावा लागला. जपानच्या अकाने यामागूची हिने सायनाला २१-१०, १०-२१, १९-२१ असे पराभूत केले. पहिला गेम सायनाने २१-१० असा अगदी सहज जिंकला होता. त्यामुळे पुढच्या गेममध्येही सायना विजय मिळवेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण दुसऱ्या गेममध्ये यामागूची हिने अप्रतिम खेळ केला आणि गेम २१-१० असे नमवत तिच्याच भाषेत उत्तर दिले. त्यानंतर तिसरा गेम अपेक्षेप्रमाणे अटीतटीचा झाला. दोघींमध्ये गुणांसाठी चुरस होती. पण अखेर यामागूचीने चपळ खेळ करत तिसरा गेम जिंकला आणि सायनाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

याच स्पर्धेत आधी झालेल्या सामन्यात पी व्ही सिंधूने विजयी सलामी दिली. तृतीय मानांकित पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या नीचाऑन जिंदापॉल हिला २१-१५, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा यानेही विजयी सलामी दिली. त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला. त्याने २१-१७, २१-१४ सरळ गेममध्ये हा सामना खिशात घातला. तर साईप्रणीतला मात्र खोसीतविरुद्ध हार पत्करावी लागली. तो २१-१६, ११-२१, १५-२१ असा पराभूत झाला.