न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये रविवारीसुद्धा मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका कायम राहिली. महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीला रविवारी गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोव्हिचने मात्र विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करताना उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील लढतीत अमेरिकेच्या बिगरमानांकित शेल्बी रॉजर्सने ऑस्ट्रेलियाच्या बार्टीवर ६-२, १-६, ७-६ (७-५) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. शनिवारी गतविजेत्या नाओमी ओसाकाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

अन्य लढतींमध्ये चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अज्ला टॉमलिजानोव्हिचला ६-३, ६-२ अशी धूळ चारली. पोलंडच्या सातव्या मानांकित इगा श्वीऑनटेकने अ‍ॅनेट कोंटावेटवर ६-३, ४-६, ६-३ अशी सरशी साधली. याव्यतिरिक्त, २०१९ची विजेती बियांका आंद्रेस्कू, १७वी मानांकित मारिया सकारी यांनीसुद्धा पुढील फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीत सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने जपानच्या केई निशिकोरीवर ६-७ (४-७), ६-३, ६-३, ६-२ अशी मात केली. जोकोव्हिचचा हा यंदाच्या वर्षांतील सलग २४वा ग्रँड स्लॅम विजय ठरला. पुढील लढतीत जोकोव्हिचची जेन्सन ब्रूक्सबायशी गाठ पडेल.

जर्मनीच्या चौथ्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने जॅक सॉकवर ३-६, ६-२, ६-३, ६-१ अशी पिछाडीवरून सरशी साधली. इटलीच्या १३व्या मानांकित जॅनिक सिनरने फ्रान्सच्या १७व्या मानांकित गाएल मोनफिल्सला तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ७-६ (७-१), ६-२, ४-६, ४-६, ६-४ असे नमवले.

बोपण्णा उपउपांत्यपूर्व फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन सहकारी इव्हान डोडिग यांनी पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. १३व्या मानांकित बोपण्णा-डोडिग यांच्या जोडीने आर्थर रिंडर आणि ह्य़ुगो नाइस यांना ६-३, ४-६, ६-४ असे पराभूत केले.