भारतातील करोनाचं संकट पाहता टी २० विश्वचषकाचं युएईत आयोजन करण्यात आलं आहे. अबूधाबीत स्पर्धेदरम्यान या संकटाचा सामना करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. करोना संकट टाळण्यासाठी प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी वेगवेगळे बॉक्स बनवण्यात आले आहेत. या व्यवस्थापनाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगसाठी लाकडी बॉक्स बनवण्यात आले आहे. बॉक्समध्ये चार ते पाच व्यक्तींना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना ही क्लुप्ती चांगलीच भावली आहे. बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

आयसीसी टी २० वर्ल्डकपच्या वेबसाइटनुसार या खास आसन व्यवस्थेसाठी ४ हजारापासून पुढे पैसे मोजावे लागणार आहेत. अबूधाबीत पात्रता फेरीचे ४ सामने खेळले गेले. तर सुपर १२ फेरीतील १० सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. करोनामुळे यंदा मर्यादित प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर लोकांना करोना नियमावलींचं पालन करावं लागणार आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच मैदानात प्रवेश दिला जात आहे. तसेच स्टेडियममध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे.