संघाच्या शीर्षस्थानी उत्तम फलंदाज आहेत- डॅरेन लेहमन
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या पहिला कसोटी सामना यजमान इंग्लंडने जिंकला खरा पण सामन्याला तेवढेच रोमांचक वळणही मिळाले होते. दुसऱया सामन्यात आम्ही नक्की वरचढ ठरू, संघाच्या शीर्षस्थानी उत्तम फलंदाज आहेत असे ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी म्हटले आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांमध्ये पुढील सामना पाहण्याची उत्सुकता आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर गुरूवार १८ जुलैला रंगणार आहे. डॅरेन लेहमन म्हणाले, संघाच्या गोलंदाजांनी सामन्यात उत्तम फलंदाजी करत एकाकी झुंझ दिली पण, आता फलंदाजांची वेळ आली आहे. पुढील सामन्यात संघाचे फलंदाज स्वत:ला सिद्ध करून दाखवतील.
पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या जोडीने इंग्लंडचे घामटे काढले होते, दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या विकेटने इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची अखेरची जोडी आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरलेली असताना दुसऱ्या डावातही त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे वाटत असल्याने ट्रेंट ब्रिजवर इंग्लिश प्रेक्षकांचे चेहरे तणावग्रस्त दिसू लागले होते. पण नाटय़पूर्ण सामन्याचा शेवटही तेवढाच नाटय़पूर्ण झाला आणि ऑस्ट्रेलियावर अवघ्या १४ धावांनी थरारक विजय मिळवत इंग्लंडने सुस्कारा सोडला.