शिक्षण मंडळच गृहपाठ करायला विसरले तर विद्यार्थ्यांचे कसे होणार? सेहवागचा खोचक प्रश्न

शिक्षणमंडळावर व्यक्त केली नाराजी

विरेंद्र सेहवाग

टिम इंडियाचा सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग कायम आपले वेगवेगळे ट्विटस आणि सोशल मीडियावरचा वापर यामुळे चर्चेत असतो. कधी एखाद्या सामाजिक गोष्टीवरुन तर कधी आणखी काही ट्विट करत तो नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतो. आताही त्याचे असेच एक ट्विट ट्विटरवर जोरदार गाजत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याने आपला साधूच्या वेशातील फोटो शेअर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता त्याने एका पाठ्यपुस्तकातील चुकीच्या धड्याचा फोटो टाकत तो लिहीणाऱ्यांना त्याने चांगलेच फैलावर घेतले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या मोहीमेत त्याला नेटीझन्सनेही चांगलीच साथ दिली आहे. शिक्षण मंडळच आपला अभ्यास योग्य पद्धतीने करत नसल्याचे तो यामध्ये म्हणाला आहे.

पाठ्यपुस्तकात लिहीलेल्या एका मुद्द्यावर त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. इंग्रजीमध्ये लिहीलेल्या या मुद्द्याला गोल करत त्याने त्याचा फोटोही शेअर केला आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे, मोठ्या कुटुंबात अनेक समस्या असतात. मोठ्या कुटुंबात अनेक लोक असल्याने ते फारसे सुखी राहू शकत नाहीत. वीरेंद्र म्हणतो, अशाप्रकारचा मसुदा पाठ्यपुस्तकांमध्ये असतो. आता संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करतील.

आता हे नेमके कोणत्या पुस्तकातील आहे याबाबत मात्र कुठेही उल्लेख करण्यात आलेला माही. मात्र पुस्तकातील ही गोष्ट गृहपाठ म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये असेही त्याने यामध्ये म्हटले आहे. या ट्विटमुळे लोकांनी विराटला साथ तर दिलीच पण पाठ्यपुस्तकातील मसुदा तयार करणारे आणि तो छापणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. अनेकांनी यामध्ये प्रकाश जावडेकर आणि पीएमओ ऑफीसला टॅग केले आहे. तर अनेकांनी यावर जोरदार टिका करत आपल्याकडे असणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळेच आपल्याकडील कुटुंब लहान होत चालली आहेत असे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Virendra sehwag angry on education system tweet regarding matter in text book family structure