देशांतर्गत क्रिकेटमधली प्रतिष्ठेची अशी रणजी स्पर्धा बुधवारपासून सुरू होत आहे. तब्बल ४२ वेळा रणजी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरणारा मुंबईचा संघ जम्मू काश्मीरविरुद्ध श्रीनगर इथे खेळणार आहे. प्रत्येक राज्याचा एकेक संघ अशी संरचना असताना मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ असे तीन संघ का? असे तीन संघ का खेळतात असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. हेच उत्तर जाणून घेऊया.

रणजी स्पर्धेत सध्याच्या संरचनेत रणजी स्पर्धेत 38 संघ खेळतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र या राज्यांचे तीन तीन संघ आहेत. महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ असे महाराष्ट्राचे तर बडोदा, सौराष्ट्र आणि गुजरात असे गुजरातचे तीन संघ आहेत. आंध्र प्रदेश आणि हैदराबाद असे दोन संघ त्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात.दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसला तरी दिल्लीचा स्वतंत्र संघ या स्पर्धेत खेळतो.

पूर्वांचलातून अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड यांचे संघ 2018-19 हंगामापासून खेळू लागले आहेत. सिक्कीम, पुदुचेरी, उत्तराखंड, चंदिगढ हे संघ 2018 पासून सहभागी होऊ लागले आहेत. रेल्वे आणि सर्व्हिसेस ही राज्यं नाहीत पण त्यांचे स्वतंत्र संघ आहेत. सर्व्हिसेस संघात लष्कर, नौदल, हवाई दलात कार्यरत खेळाडू खेळतात.

रणजी स्पर्धेची सुरुवात कधीपासून?

रणजी स्पर्धा 1934 मध्ये सुरू झाली आहे. बीसीसीआयचे संस्थापक ए.एस. डीमेलो यांच्या संकल्पनेतून रणजी स्पर्धेची सुरुवात झाली. डीमेलो यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची कल्पना बीसीसीआयच्या 1934 साली सिमला इथे झालेल्या बैठकीत मांडली.

सुरुवातीला स्पर्धेचं नाव द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया असं करण्यात आलं. त्यावेळी बीसीसीआयकडे अशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे पटियाळाचे महाराज भूपेंद्र सिंह यांनी स्पर्धेचं प्रायोजकत्व घेतलं.

आर्थिक आघाडीची जबाबदारी घेताना त्यांनी या स्पर्धेला सर रणजीतसिंहजी यांचं नाव द्यावं अशी विनंती केली. रणजीतसिंहजी हे भारताबाहेर खेळणारे पहिले क्रिकेटपटू होते. ते नवानगरचे महाराज होते. ते रणजी या नावाने प्रसिद्ध होते.त्यांच्या योगदानाची दखल घेत स्पर्धेला रणजी हे नाव मिळालं.

पहिल्या हंगामात कसे होते संघ?

रणजी स्पर्धेच्या 1934 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात म्हैसूर, मद्रास, हैदराबाद, आर्मी, नॉदर्न इंडिया, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, सेंट्रल इंडिया, युनायटेड प्रोव्हिन्स, सदर्न पंजाब, बॉम्बे, गुजरात, महाराष्ट्र असे 12 संघ सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळ होता. ब्रिटिशांचा अंमल होता. राज्यं नव्हे तर संस्थानं होती. अनेक संस्थानिकांनी राजाश्रय देऊन खेळ आणि खेळाडूंना आधार मिळवून दिला होता. यातूनच बॉम्बे, वेस्टर्न इंडिया, महाराष्ट्र, सेंट्रल प्रोव्हिन्स, गुजरात असे संघ होते. महाराष्ट्र असं राज्यच अस्तित्वात नव्हतं.

विदर्भ संघ कसा घडला?

1932 मध्ये सेंट्रल इंडिया क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. त्यातून पुढे होळकर क्रिकेट असोसिएशन निर्माण झाली. होळकर संस्थानचा क्रिकेटला मोठा पाठिंबा होता.

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाली. त्यामुळे होळकर असोसिएशनऐवजी मध्य भारत संघटना निर्माण झाली. विदर्भाचा भाग त्यात येत असे. पण याच काळात मध्य प्रदेश असं स्वतंत्र राज्य निर्माण झालं.

विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. 1956 मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली, वर्षभरात मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन अस्तित्वात आलं. विदर्भ भागातील खेळाडूंसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली.

बीसीसीआयची स्थापना झाली तेव्हा संस्थानं होती.तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात आजचं मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात यांचा समावेश होता. या प्रांतांमध्ये क्रिकेट संघटना तयार झाल्या होत्या.

१९५६ मध्ये राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी एक राज्य एक संघटना असं ठरलं होतं. त्यावेळी बीसीसीआयने सरकारला विनंती केली की संघटना आधीपासूनच अस्तित्वात आहेत. त्यांचं कामकाज वर्षानुवर्ष सुरू आहे. आहे ती व्यवस्था मोडून नव्याने संरचना करायला नको.

या विनंतीला मान दिल्याने मुंबई आणि महाराष्ट्र संघटना कायम राहिल्या. मध्य प्रदेशची स्वत:ची संघटना आकारास आल्यानंतर विदर्भची संघटना आणि संघ निर्माण झाले.

मुंबईत क्रिकेटला आवश्यक वातावरण आहे. वयोगट स्पर्धा, क्लब, जिमखाने, ऑफिस पातळीवरचे संघ, मैदानं सगळं आहे. मुंबई ही भारतीय क्रिकेटची नर्सरी मानली जाते. तीन संघ असल्यामुळे अधिकाअधिक खेळाडूंना संधी मिळते. तिन्ही मिळून एकच संघ असता तर मुंबईतल्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं असतं तसंच असंख्य खेळाडूंना खेळण्याची संधीच मिळाली नसती.

राज्य एकच मग खेळाडू कुठल्या संघाकडून खेळणार हे कसं ठरतं?

मुंबईकडून खेळण्यासाठी तीन जिल्ह्यातले खेळाडू पात्र ठरतात. मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यात जन्मलेले खेळाडू मुंबईसाठी खेळू शकतात. मुंबईची व्याप्ती वाढती आहे. एमएमआरडीए प्रदेशही यातच मोडतो. उदाहरणार्थ खारघरसारखं शहर.

तांत्रिकदृष्ट्या खारघर रायगड जिल्ह्यात येतं पण भौगोलिक आणि व्यवहारादृष्टीने मुंबई जवळचं आहे. त्यामुळे मुंबईनजीकच्या भागातल्या खेळाडूंना रायगड किंवा मुंबई असा खेळण्याचा पर्याय मिळतो. विदर्भातील 11 जिल्ह्यातले खेळाडू विदर्भ संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरतात.

रणजी स्पर्धेचं स्वरुप कसं आहे?

नियोजनाच्या दृष्टिकोनातून रणजी स्पर्धा आता दोन टप्प्यात खेळवली जाते. स्पर्धेत सहभागी होणारे संघ एलिट आणि प्लेट असे विभागले जातात. प्राथमिक फेरीनंतर दोन अव्वल संघ बाद फेरीत जात असत. एलिट गटात तळाशी राहणाऱ्या संघाची प्लेट गटात रवानगी होत असे. दहा वर्षानंतर सुपर लीग आणि प्लेट लीग असं नामकरण करण्यात आलं. 2017-18 पासून दोनस्तरीय रचना बदलून प्रत्येकी 7 संघांचे असे 4 गट करण्यात आले.

2018-19 पासून त्रिस्तरीय रचना करण्यात आली. रणजी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या लढती चारदिवसीय असतात.

बाद फेरीचे सामने पाच दिवसांचे असतात. देशभरात विविध ठिकाणी विभिन्न वातावरणात चार/पाच दिवस सातत्याने चांगलं खेळण्याचं आव्हान खेळाडूंवर असतं.

रणजी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडूच पुढे जाऊन भारतीय संघासाठी खेळताना दिसतात. स्पष्ट निकाल न लागल्यास पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजेता ठरवला जातो.

रणजी स्पर्धेच्या विजेत्या संघाची हंगामाअखेर शेष भारत अर्थात रेस्ट ऑफ इंडियाशी लढत होते. विजेत्या संघाला इराणी चषक प्रदान करण्यात येतो.

रणजी करंडकावर कोणाचं वर्चस्व?

योगायोग म्हणजे रणजी करंडकावर मुंबईचंच वर्चस्व आहे. मुंबईने ही स्पर्धा तब्बल ४२वेळा जिंकली आहे. विदर्भने तीनदा तर महाराष्ट्राने दोनदा रणजी करंडक पटकावला आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम वासिम जाफरच्या नावावर आहे.