Yashasvi Jaiswal Fastest 2000 Runs Record: भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला पहिल्या डावात शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ८७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंगने टाकलेला चेंडू टप्पा पडून आत आला आणि यशस्वीला पायचीत करून गेला. या डावात त्याने २८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने दमदार सुरुवात केली. त्याने २२ चेंडूंचा सामना करत ६ चौकारांच्या साहाय्याने २८ धावा केल्या. यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या २८ धावांच्या खेळीसह जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह त्याने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या दिग्गज फलंदाजांची बरोबरी केली आहे.
यशस्वी जैस्वालने आपल्या ४० व्या डावात कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठला आहे. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी देखील कसोटी क्रिकेटमधील ४० व्या डावात २००० धावांचा पल्ला गाठला होता.
सर्वात जलद २००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल हा राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. विजय हजारे आणि गौतम गंभीर यांनी हा कारनामा ४३ व्या डावात केला होता. तर सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांनी हा कारनामा ४४ व्या डावात केला होता. तर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी हा कारनामा आपल्या ४५ व्या डावात केला होता. तर चेतेश्वर पुजाराने ४६ व्या डावात २००० धावा पूर्ण करण्याचा कारमाना केला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारे भारतीय फलंदाज
४० डावात – राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, यशस्वी जैस्वाल
४३ डावात – विजय हजारे , गौतम गंभीर
४४ डावात – सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर
४५ डावात – सौरव गांगुली
४६ डावात – चेतेश्वर पुजारा