परीक्षेचे दिवस म्हणजे घरभर पुस्तकं-स्टेशनरीचा पसारा आणि हरवलेल्या वस्तूंची शोधाशोध. हे टाळायचं असेल, तर घरातल्या रिकाम्या बरण्या, खोके गोळा करून घरच्या घरी डेस्क ऑर्गनायझर तयार करता येईल.

रिकामे खोके, प्लास्टिकचे ग्लास, आणि बरण्या स्प्रे पेंट किंवा ऑइल पेंटने एकाच रंगात आतून आणि बाहेरून रंगवा. रंग नीट सुकल्यावर रंगीत लोकर, रिबन किंवा लेस बांधून सजवा. जुन्या पत्रिकांतील सोनेरी रंगाच्या कागदाचे त्रिकोण, चौकोन किंवा अन्य कोणतेही आकार कापून यापैकी एखाद्या खोक्यावर किंवा बरणीवर चिकटवा. प्लायवुडची फळी आणि ती नसल्यास जाडजूड पुठ्ठा घेऊन तो देखील त्याच रंगात रंगवा. त्यावर या सजवलेल्या बरण्या, ग्लास आणि खोके फेव्हिकॉलच्या साहाय्याने एकमेकांलगत चिकटवा आणि मुलांच्या डेस्कवर ठेवून द्या. पेन्सिल, पेन, पट्टी, ब्रश, कात्री-ब्लेड्स सगळं जागच्या जागी राहील आणि शोधाशोध टळेल.