26 November 2020

News Flash

छुपा घटस्फोट 

काय आहे हा छुपा घटस्फोट?

नवरा बायकोत पटत नसेल तर छुपा घटस्फोट घेऊन बऱ्याच वेळा फायदा होतो असं आतापर्यंत आढळलेलं आहे. कायदेशीर घटस्फोट हे प्रकरण सोपं नाही. मुलांचे तर हालच होतात. घटस्फोटाला आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक कितीतरी पैलू असतात. काय आहे हा छुपा घटस्फोट?

मागच्या लेखात (१३ जानेवारी) आपण सध्याच्या कुटुंबांची परिस्थिती बघितली. विवाहितांना वाटतं त्यातून सुटका म्हणजे घटस्फोट. पण खरा मार्ग स्वत: विचार करून किंवा कोणाची तरी मदत घेऊन सुधारणा करणं हा आहे. प्रत्यक्षात बरीच जोडपी नुसती सोसत आयुष्य काढतात. तो खरा काळजीचा विषय आहे.

एकमेकांशी जुळत नाही असं अगदी नक्की वाटत असेल आणि घटस्फोटाशिवाय पर्याय नाही असं वाटत असलं तरी १० वेळा त्यावर विचार करावा. घटस्फोटानंतरसुद्धा आयुष्य सोपं नाही. घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेचा काळ त्रासदायक असतोच. आणि तुम्हाला जर मूल असलं तर घटस्फोटाचा २० वेळा विचार करावा, कारण मुलाचे खूप हाल होतात. खूप मालमत्ता असेल तर ३० वेळा विचार करावा. मालमत्ता नवऱ्याच्या एकटय़ाच्या नावाने असो किंवा बायकोच्या एकटीच्या नावाने असो; जोडीदाराचा त्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतोच. या सगळ्यामध्ये वय चाळीसच्या पुढे गेलं तर घटस्फोटापूर्वी ५० वेळा विचार करावा. मुख्य म्हणजे समुपदेशकाकडे जावं. प्रत्येकाला शेवटची एक संधी मिळायलाच हवी. तरीही नाही जमलं तर काडीमोड आहेच.

गेल्या काही वर्षांत कायद्यात बदल झाले. निराळं ‘फॅमिली कोर्ट’ वा ‘कुटुंब न्यायालय’ एकेकाळी नव्हतं ते सुरू झालं. ‘नॉन कॉम्पॅटिबिलिटी’ या कारणांनी घटस्फोटाला मान्यता मिळायला लागली. घटस्फोटितांनी असं समजायचं काही कारण नाही की हा शेवट आहे. ही तर नव्या कहाणीची सुरुवात असते. आधीच्या प्रेमभंगाचा जसा फायदा असतो तसा विवाहभंगाचाही फायदा घ्यावा.

ज्याअर्थी एवढी शेकडो, हजारो वर्षे विवाह संस्था टिकून आहे, त्याअर्थी त्यात काही तरी तथ्य असलं पाहिजे. त्या मुख्य कारणासाठी आपण सगळे मिळून तिचा अभ्यास करू या. संस्काराबद्दलचे नियम, समाजनियम अलिखित आहेत. काही नुसते रीतिरिवाज आहेत, पण जास्तीत जास्त प्रमाणात स्त्री-पुरुष संबंधांबद्दल आहेत.

लग्न करताना घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये काही तरी अडचण असणार या गृहीतामुळे लोकांना पुनर्विवाहासाठी विधवा, विधूर चालतात. शिवाय मुख्य भीती अशीही असते की, घटस्फोटिताचा जोडीदार जिवंत असतो. त्यामुळे पुन्हा भेटू शकतो. ती गुंतागुंत नको अशी इच्छा असते. ज्यांना आधीच्या लग्नातलं अपत्य आहे, त्यांचे तर खूप प्रश्न असतात. मात्र या प्रकारची लग्नं जुळली तर टिकताना दिसतात. कारण दोघं समदु:खी असतात. जोडीदाराचा शोध घेतानाच्या अडचणींच्या यादीत एक मोठं पिशाच्च आपल्या समाजाच्या मानगुटीवर बसलेलं दिसतं. ते म्हणजे प्रथम वर, प्रथम वधू ही कल्पना. एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा घटस्फोट झाला असला तर लोक विचार करतात, की त्या व्यक्तीमध्येच काही तरी दोष असेल. या कल्पनेमुळे प्रथम वर किंवा प्रथम वधू त्या व्यक्तीचा विचारसुद्धा करत नाहीत.

नातं टिकवण्यासाठी काही उपाय नक्की करता येतात. माझ्या समुपदेशनाच्या कामात आतापर्यंत कित्येक भांडणाऱ्या जोडप्यांना मी छुपा घटस्फोट कसा घ्यायचा याच्या पायऱ्या सुचवल्या आहेत. त्या ओळीनं सांगतो.

१) ठरलेल्या दिवसापासून एकमेकांशी कुठल्याही विषयावर चर्चा करणं बंद करायचं. इतरांना जाणवेल असा अबोला धरायचा नाही, पण प्रत्यक्ष मतभेदाच्या विषयाविषयी अजिबात बोलायचं नाही. रोजच्या दिनचर्येत काही बदल करायचा नाही. मुलं असली तर मुलांना ही गोष्ट कळताही कामा नये. मुलं असली तरी घटस्फोटाच्या कल्पनेला नैतिक दृष्टींनी नकारच आहे. एरवीसुद्धा मुलांच्या देखत भांडायचं नाही हे पथ्य पाळायचं आहे. त्यामुळे भांडणांवर आपोआप मर्यादा येते.

२) रोज जमेल तेव्हा मतभेदांच्या विषयाबद्दल विचार करायचा, माहिती काढायची. स्वत:ची टिपणं रोज लिहून ठेवायची. लोक लिहित नाहीत कारण लिहिता लिहिता विचार स्पष्ट होत जातात याची त्यांना कल्पना नसते.

३) घरातली माणसं किती, घर केवढं याप्रमाणे निराळ्या खोल्यांत झोपायचं किंवा एकाच खोलीत पण निराळ्या ठिकाणी झोपायचं. लैंगिक संबंधांना शक्यतोवर सुट्टी द्यायची. नवरा-बायकोच्यामध्ये मूल झोपत असलं तर त्या व्यवस्थेत बदल करायचा नाही, पण शारीरिक संबंधांसाठी अडवणूक करण्याचा विचार डोक्यात आणायचा नाही.

४) या पद्धतीने साधारणपणे आठवडा काढला की एकमेकांना मुद्देसूद पत्र लिहायचं. त्यामध्ये जोडीदाराचे चांगले गुण जाणीवपूर्वक आठवून आवर्जून लिहायचे. शिवाय स्वत:ला कशाचं वाईट वाटलं ते लिहायचं. ते एकमेकांना द्यायचं.

५) इथपर्यंतच्या मार्गानी काही परिणाम होत नसला तर आणखी ८ दिवस निराळ्या घरी, बाहेरगावी तोच प्रयत्न पुन्हा करायचा. या ८ दिवसांत आणि आधीच्या ८ दिवसांत मुख्य फरक करायचा तो म्हणजे खाणं कमी कमी करायचं. पोट रिकामं असलं की माणूस अंतर्मुख होण्याची बऱ्याच प्रमाणात शक्यता असते. असा उपास शक्य नसला तर समुपदेशकाशी बोलून निराळा मार्ग काढावा लागणार हे निश्चित आहे.

६) यानंतरही काही परिणाम होत नाही असं आढळलं तर समुपदेशकाकडे जायचं आणि सगळी पत्रं दाखवायची. समुपदेशकाला न दाखवण्याइतकं खासगी असं काहीही असूच शकत नाही.

या पद्धतीनं छुपा घटस्फोट घेऊन बऱ्याच वेळा फायदा होतो असं आतापर्यंत आढळलेलं आहे. कायदेशीर घटस्फोट हे प्रकरण सोपं नाही. मुलांचे तर हालच होतात. घटस्फोटाला आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक कितीतरी पैलू असतात. त्याखेरीज पुन्हा दुसरं लग्न केलं तर चांगला जोडीदार मिळेल याची काय खात्री?

बहुतेक वेळा विभक्त कुटुंबात एक वर्ष संसार केल्यावर नवरा-बायकोला मूल्यं आणि तपशील यामधला फरक कळलेला असतो. एकत्र कुटुंबात कित्येक वेळेला एकमेकांच्या मूल्यांमध्ये फरक असल्यामुळे खटके उडतात, हे कळायलाच काही वर्षे जातात. मी वैचारिक दृष्टींनी विभक्त कुटुंबाच्या बाजूचा आहे. त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या जोडप्याला एकमेकांशी आपलं जुळत नाही हे मुलं होण्याच्या आत वेळेवर कळलं ते नशीबवानच म्हणायचे आणि अर्थात ती मुलं देखील. लग्नाला काही वर्षे झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर ज्या जोडप्याला खूप उशिरा जाग येते आणि घटस्फोट घ्यायची वेळ येते त्यांचं मला वाईट वाटतं. आपल्या समाजात पुन्हा लग्न होईपर्यंत घटस्फोटित मुलगी माहेरी राहायला येण्याचा रिवाज दिसतो. मुलगा मात्र स्वतंत्र राहण्याचं प्रमाण खूप आहे.

घटस्फोट या विषयावर मुळात मला काय वाटतं ते सांगतो. सगळा विचार, अभ्यास, चर्चा यानंतर मुलं झालेली असोत किंवा नसोत, मुलं छोटी असोत किंवा मोठी असोत, नवरा-बायकोंनी एकमेकांशी जमत नाही असा पक्का निर्णाय घेतला असेल तर उगाच एकमेकांना छळत संसार करण्यात काही अर्थ नाही. त्या त्रासदायक नात्यातून स्वत:ची सुटका हे सर्वात महत्त्वाचं मानावं. पोटगीचे दावे, एकमेकांचा सूड या कशाच्याही भानगडीत पडू नये. अशा प्रसंगी मालमत्तेचा, दागिन्यांचा मोह या सगळ्या गोष्टी कमी महत्त्वाच्या समजाव्यात. वकिलांना अशा वेळेला उगाचच्या उगाच खरी नसलेली कारणं कागदपत्रांमध्ये आणू देऊ नयेत. पुनर्विवाह करताना एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे; नवीन जोडीदाराला आधीच्या घटस्फोटाचं खरं कारण सविस्तर सांगायला हवं. फॅमिली कोर्टाच्या निकालाची प्रत सरळसरळ वाचायला द्यावी. त्यात न लिहिलेल्या गोष्टीही सांगाव्यात.

कौटुंबिक विसंवाद या विषयाबद्दल मी एवढय़ा पोटतिडकीने उपाय शोधतोय, सांगतोय, पण या सगळ्याला खूप वेळ लागणार याची मला कल्पना आहे.

अनिल भागवत

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 4:43 am

Web Title: article on divorce hidden aspect of divorce
Next Stories
1 कुटुंबाचं व्यवस्थापन
Just Now!
X