रा. ग. गडकरी यांच्या जन्मशताब्दीला (१९८५ साली) एकच प्यालाया नाटकाची पुनर्माडणी करून त्याची दोन अंकी रंगावृत्ती डॉ. श्रीराम लागू यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाली. त्याबद्दल डॉ. लागू यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेली ही नोंद..

मी प्रामुख्याने नव्या नाटकाचा पक्षपाती असलो तरी जुन्या नाटकांपैकी ‘शारदा’, ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’, ‘एकच प्याला’ इत्यादी नाटकांची थोरवी मी जाणून होतो. विशेषत: गडकऱ्यांचे ‘एकच प्याला’ हे ज्याचे ‘थोर’पण थोडक्यात हुकले आहे असे एक फार मोठे नाटक आहे, असे मी मानत होतो. विनोदी लेखन, काव्य आणि नाटके हे गडकऱ्यांचे समग्र साहित्य लक्षात घेता साहित्यिक म्हणून गडकऱ्यांचेही हेच मूल्यमापन करता येईल असे मला (मी व्यावसायिक समीक्षक नसल्यामुळे!) वाटत असे. ‘थोरपण थोडक्यात हुकलेला फार मोठा साहित्यिक’! मनुष्य-स्वभावाची अत्यंत सहृदय आणि सखोल अशी जाण, सृष्टीच्या व्यापारांविषयीचे अतिशय गाढ कुतूहल, अद्वितीय भाषाप्रभुत्व आणि जवळजवळ अतिमानवी अशी विलक्षण तरल कल्पनाशक्ती असे सगळे गुण असूनही, भौतिक परिस्थितीचे फार कष्टदायक ओझे खांद्यावर वागवत गडकऱ्यांना आपल्या छोटय़ाशा आयुष्यात वाटचाल करावी लागली. ‘एकच प्याला’नंतर आणखी काही वर्षे गडकरी जगते तर ‘भारतातले एक थोर साहित्यिक’ अशी त्यांची गणना झाली असती, असे मला वाटते. तात्यासाहेब शिरवाडकर एकदा गडकऱ्यांबद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘‘गडकरी स्वत:च्या प्रतिभेच्या जंगलात हरवलेले कवी होते!’’

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

मला मुळी ‘एकच प्याला’ हे नाटक ‘संगीत’ दिसतच नव्हते! अगदी प्रथम, जेव्हा मी ते नाटक पाहिले (नानासाहेब फाटक – सुधाकर आणि बिंबा म्हणजे शांता मोडक – सिंधू) तेव्हाच मला त्यातले संगीत अगदी उपरे वाटले होते – रसभंग करणारे वाटले होते. पुढे मला कळले, की ‘एकच प्याला’ची पदे गडकऱ्यांनी लिहिलीच नव्हती. ती सारी वि. सी. गुर्जरांनी गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर लिहिली!

गडकऱ्यांनी स्वत: पदे का लिहिली नाहीत? स्वत: एवढे मोठे कवी असून?

की गडकऱ्यांना या नाटकात संगीत दिसलेच नसेल? हे नाटक गद्यच असायला हवे असे तर गडकऱ्यांना वाटले नसेल? पण तसे ठापमणे बजावणे त्यांना शक्य झाले नसेल? कारण त्याकाळी संगीत नसलेले नाटक गंधर्व कंपनीने घेतलेच नसते. नाटक तर गडकऱ्यांनी, ‘गंधर्वाना फाटकी लुगडी नेसायला लावीन’ या प्रतिज्ञेने गंधर्व कंपनीसाठीच लिहायला घेतले होते!

या साऱ्यामुळेच माझा असा निश्चय होता, की ‘एकच प्याला’ संगीत करायचे नाही- गद्य करायचे! अर्थात गद्य नाटकाला पाश्र्वसंगीत असते तितपत ते असेल. परंतु केवळ गाणी काढून टाकून गद्य ‘एकच प्याला’चा प्रयोग करणे एवढय़ाकरताच मला हे नाटक करायचे नव्हते, तर या नाटकाच्या आशयाबद्दलही मला काही तरी वेगळे म्हणायचे होते!

‘एकच प्याला’ म्हणजे दारूचे भीषण दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडणारी प्रत्ययकारी शोकान्तिका, असाच त्या नाटकाचा लौकिक होता. ‘‘दारूच्या व्यसनामुळे अत्यंत बुद्धिवान आणि कर्तृत्ववान माणसांचा आयुष्याचा अकाली सर्वनाश होतो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रिय कुटुंबीयांचाही! तेव्हा दारूचा पहिला ‘एकच प्याला’सुद्धा वर्ज मानला पाहिजे,’’ असा संदेश देण्यासाठीच गडकऱ्यांनी हे नाटक लिहिले आहे, याबद्दल साऱ्याच समीक्षकांत आणि प्रेक्षकांतही एकमत होते.

पण एवढे साधे, बाळबोध तत्त्व मांडण्यासाठी गडकऱ्यांनी इतकी भीषण शोकात्मिका रचली असेल हे मला पटत नव्हते. कारण आपलाच संदेश खोटा ठरविणारी काही पात्रे गडकऱ्यांनी आपल्या नाटकात घातली होती. उदा. रामलालचे एकच व्याख्यान ऐकून दारू सोडलेला आणि समाजकार्याला लागलेला भगीरथ किंवा पश्चात्तापदग्ध सुधाकर नोकरी शोधायला ‘बंडगार्डन’वर गेला असताना तिथे त्याला भेटलेले त्याचे सगळे परिचित. हे सारे तर रोज ‘आर्य मदिरा मंडळा’त जाऊन दारू पिणारे आणि तरीही चांगले सधन आणि प्रतिष्ठित गृहस्थ आहेत. एवढी साधी चूक प्रतिभावान गडकऱ्यांच्या लक्षात आली नसेल काय?

मला या नाटकाचा जो आशय दिसत होता तो वेगळाच होता. तो असा :

प्रत्येक माणसाच्या मनात सत् आणि असत्, शिव आणि अशिव, मंगल आणि अमंगल यांचा झगडा सतत चालत असतो. सामान्य माणसाच्या आयुष्यात या झगडय़ाचे स्वरूप फार तीव्र नसते. त्यामुळे सामान्य माणूस आयुष्यभर या झगडय़ात  पिचत सर्वसामान्य आयुष्य जगत राहतो. फार सुख किंवा फार दु:ख त्याच्या वाटय़ाला येतच नाही. काही थोडी मनस्वी माणसे अशी असतात की त्यांना असामान्यत्वाचा शाप असतो. त्यांच्या आयुष्यातला हा सत्-असत्मधला झगडा फार तीव्र स्वरूप धारण करतो. आणि या तीव्र झगडय़ात या माणसांची फार कुतरओढ होते. एक तर असत्ला शरण जाऊन सत्कडे संपूर्ण पाठ फिरवावी लागते किंवा मोठय़ा निर्धाराने असत्कडे पाठ फिरवून सत्चा अंगीकार करावा लागतो आणि तो मरेपर्यंत निभवावा लागतो! ही दोन्ही प्रकारची माणसे सुखी होतात!

तळीराम सुखी आहे, कारण तो असत्ला संपूर्णपणे शरण गेला आहे. त्याला दारूपुढे सगळे तुच्छ आहे! शेवटी प्राण जातानाही त्याचे मागणे एवढेच आहे की, ‘‘मरताना गंगाजलाऐवजी थोडी दारूच माझ्या तोंडात घाला आणि वर घट्ट बूच घालून टाका, म्हणजे मरताना उचकी लागली तरी दारू तोंडाबाहेर पडणार नाही!’’ ही ‘असत्’ला संपूर्ण शरणागती आहे. त्यामुळे मृत्यूच्या दु:खाचा लवलेशही नाही!

सिंधूही अशीच ‘सत्’ला संपूर्ण शरण गेली आहे. पातिव्रत्य हे तिने आयुष्यातले सर्वोच्च मूल्य मानलेले आहे. पातिव्रत्य ही तिची दारू आहे. त्याने ती इतकी झिंगली आहे, की शेवटी नवऱ्याने मारलेल्या काठीच्या तडाक्याने मृत्यूच्या दारात जाऊन पडल्यावर, शेजारीच पाळण्यात मरून पडलेल्या आपल्या स्वत:च्या मुलाचीही तिला क्षिती नाही. ‘अहेवपणी मरण येण्यापरते भाग्य नाही. ते मरण मला तुमच्या मांडीवर यावे,’ अशी भीक ती सुधाकरकडे मागते आहे! झाल्या सर्वनाशाबद्दल ना खंत, ना खेद!  कृतार्थतेच्या भावनेने ती मृत्यूच्या स्वाधीन झाली आहे.

खंत, खेद, प्रचंड दु:ख सुधाकरला आहे. कारण सत् आणि असत्मधला आयुष्यभर त्याला सतत छळणारा तीव्र संघर्ष सोडवता आलेला नाही. एका बाजूला सिंधू, आपलं बाळ, आपला संसार, आपली प्रतिष्ठा यांचे तीव्र आकर्षण आणि दुसऱ्या टोकाला दारू या दोन टोकांमध्ये तो एखाद्या लंबकासारखा भोवळ येईपर्यंत हेलकावे खात राहिला आहे आणि शेवटी त्यातच उद्ध्वस्त झालेला आहे. आणि ही त्याची शोकांतिका आहे. दारूचे व्यसनही नव्हे! त्याचा मृत्यू भीषण, शोकात्म आहे.

मला उमजलेला हा आशय प्रामुख्याने व्यक्त करायचा तर नाटकाची थोडी पुनर्रचना करून त्याची नवी रंगावृत्ती करणे भाग होते. आशयाशी संबंधित नसलेले भाग काढून टाकणे आवश्यक होते; नाटकातले काही प्रवेश मागे-पुढे करणे भाग होते; आणि मुख्य म्हणजे नाटकाच्या पाच अंकांची दोनच अंकांत मांडणी करणे आवश्यक होते. संगीतामुळे पाच-सहा तास चालणारे नाटक अडीच-तीन तासांत बसवणे जरुरीचे होते. आणि हे सारे जमत होते, आवश्यक होते.

या माझ्या सगळ्या अटी मान्य करून मला हे नाटक करू देणारा निर्माताही मला भेटला आणि तोही पुन्हा ‘रंगयात्री’चा मधुकर नाईक! ‘एकच प्याला’सारख्या मराठीतल्या एका ‘क्लासिक’ची अगदी नव्या पद्धतीने पुनर्माडणी करायला तयार असलेला व्यावसायिक निर्माता ही त्यावेळी मराठी रंगभूमीवरची एक अगदी अपवादात्मक घटना होती! आजही आहे! कारण जुन्या, गाजलेल्या नाटकांचे नव्याने प्रयोग करायचे म्हटले तर ते ‘गंधर्वाच्या काळी’ जसे केले जात असत त्याच पद्धतीने, अगदी जुन्या प्रयोगांचे रबरी शिक्के वाटावे याच पद्धतीने करावे लागत, केले जात. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही! इतका काळ मध्ये गेल्यानंतर, नव्या पिढीच्या दिग्दर्शकांना त्या नाटकांबद्दल नव्याने काही म्हणायचे असेल, काही नवा अर्थ त्या जुन्या नाटकात दिसत असेल तर त्यांना तो नव्या पद्धतीने मांडू दिला पाहिजे, आपण तो नव्या पद्धतीने ग्रहण केला पाहिजे असे अजूनही मराठी प्रेक्षकांना वाटतच नाही- दीडशे वर्षांहून अधिक परंपरा या रंगभूमीची असूनही!

(डॉ. श्रीराम लागू यांच्या लमाणया आत्मचरित्रातून साभार. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन)