शेफ वरुण इनामदार

प्रतीक्षा.. हा शब्द इतका अस्वस्थ करणारा आहे, की तो प्रत्यक्ष कृतीत आणायचा झाला की मन आणि शरीर या दोघांचीही परीक्षा लागते. प्रतीक्षा मग ती सेकंदाची, मिनिटाची, तासाची, दिवसाची, महिन्याची वा पुढे वर्षांची अशी वाढत जाते. आजपासून बरोबर तीन दिवसांनी म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या रात्रीला म्हणजे १२ ठोक्याला नवे वर्ष अवतरलेले असेल. दरवर्षी हे असं होतंच. वर्ष येतं आणि सरतं. या वर्षांतला प्रत्येक दिवस उगवला आणि मावळला. मग वर्षांच्या शेवटच्या दिवसाचे असे खास काय आहे. तसे काहीच नाही. माझ्या मते तर उगवणारा प्रत्येक दिवस हा आशेची आणि नव्या संधीची किरणे घेऊन येतच असतो. तरीही मावळत्या वर्षांने दिलेले कटू-गोड अनुभव, नवी नाती, संधी आणि नव्या प्रेरणा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी एकत्र जमायचे असते.. म्हणूनच थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबर प्रत्येकासाठी वेगळा असतो.

ख्रिसमसपासून सणांचे बाजार सजतात. नवनव्या खूप साऱ्या सवलती मॉल, हॉटेले, दुकानदार देऊ करतात. तशी खरेदीही केली जाते. ख्रिसमस संपून वर्षांला निरोप देण्याचा दिवस उजाडतो. हा दिवस थोडा जबाबदारीचाही असतो. का विचाराल तर देशभरात याच दिवशी शरीरात अल्कोहोलचे प्रमाण वाढविण्यासाठीचे वातावरण चोहो बाजूला तयार झालेले असते. तसं डिसेंबर सुरू झाला, की माणसं कामातून थोडी फुरसत काढून फिरायला बाहेर पडतात. निवांतपणा शोधू लागतात आणि आनंदी वातावरणात स्वत: हरवून जातात. वर्षभराचा कामाचा भार थोडा हलका करून मोकळं करण्यासाठीचा हा महिना म्हणायला हरकत नाही.

पण मनात आलं म्हणून सांगतो किंवा हा लेख लिहिण्यामागचं कारणच ते आहे, की माणूस जसा कामाच्या आहारी जातो, तसा तो नंतर अल्कोहोलच्या आहारीही जाऊ शकतो. म्हणजे डिसेंबर महिना म्हणून पोटात जास्त अल्कोहोल गेले तर चालते. असे नको व्हायला! म्हणजे अतिपिण्याने इतर महिन्यांत जे परिणाम व्हायचे तेच डिसेंबरमध्येही होणारच आहेत. गेले वर्षभर मी दारू अर्थात जगभरातील आणि प्रामुख्याने भारतातील वाइन, व्हिस्की, रम आणि व्होडका अशा विविध जाती आणि त्यांच्या निर्मात्यांविषयी सांगितले. पण हे सारे दारूज्ञान फक्त कुतूहलापोटी होते. पण ते अनियंत्रित प्या, असे सांगण्यासाठी नक्कीच नव्हते. पुन्हा एकदा सांगतो, अतिपिणे म्हणजे आरोग्याला घातकच, हेच मला सांगायचेय!!

भारतात दारूविषयीची प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत. किंबहुना काहींनी ती स्वत:साठी संस्कृतीच बनवून घेतलेली असते. त्याला आपल्या सभोवतालची प्रसारमाध्यमे खतपाणी घालीतच असतात. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? पण सरकारी नियमांमुळे दारूची जाहिरात  टीव्हीवर नाही करता येत कंपनीवाल्यांना. मग ते स्वत:चा सोडा बनवतात. आणि दारूचं लेबल सोडय़ाला लावून आमचा सोडा कसा चवदार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. सोडा हो..आम्हाला काही कळत नाही होय? म्हणून जरा जपूनच मित्रांसोबत ‘बसा’. कारण पिण्यासाठी निव्वळ कारणे लागतात. मग कारणे संपतात आणि केवळ पिणं उरतं. म्हणूनच सांगतोय जबाबदारी आणि जपून प्या. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्या.

जपून टाक पाऊल जरा

’ स्वत:चे स्वत:च कौतुक करा. का, तर तुम्ही नववर्षांपासून एकतर दारूला रामराम केलेला असेल किंवा पिताना जिभेला ‘ब्रेक्स’ लावूनच पिईन यासाठी तुम्ही पाऊल टाकलेलं असेल. कारण दारू सुटली तर बरेच फायदे होतात. त्यातील पहिला म्हणजे झोप बरी लागते आणि कामात मन लागते. त्यामुळे स्वत:ची पाठ थोपटायला हरकत नाही.

’ दारू ओसंडून वाहणाऱ्या मेजवान्या टाळा. कारण पंचविशीतच किती प्यायची हे एकदा ठरवलं की कोणी कितीही आग्रह केला तरी तुमचं मन पुन्हा भरलेल्या ग्लासात बुडण्यास तयार होणार नाही. ते तसे झाले नाही, की मग उगाच जुन्या आठवणी काढून मित्रांसमोर भावविवश होण्याची वा रागाने उसळण्याचीही वेळ येणार नाही. शेवटी रिकामा ग्लास हातावेगळा झाला की मग कसं पार्टीचा उद्देश पूर्ण झाल्याची गोडीही तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील.

’ तरीही मेजवानीत तुमची काळजी घेणारे मित्र आजूबाजूला आहेत का, याचा कानोसा घ्या. कारण तुम्ही नाजूक मानसिक अवस्थेतून जात असाल तर दारूच्या आहारी जाण्यासाठीची परिस्थिती पुन्हा नव्याने तयार होऊ शकते. त्यामुळे पार्टीत केवळ काही लाभदायी पेये घेताना तुमच्यासोबतच्या समजूतदार मित्र, नातेवाईक वा कुटुंबीयांची मदत तुम्हाला होऊ शकते.

’ त्या भयानक मानसिक धक्क्यातून तुम्ही आता सावरला आहात. तुमचं मन आता कुठे कशात तरी रमू लागलं आहे. मग अशा वेळी पुन्हा पिणाऱ्यांच्या परिघात येऊ नका. त्याऐवजी नाटकाला जा. सिनेमा बघा नाहीतर निव्वळ गप्पा मारण्यासाठी एखाद्या जवळच्या मित्राला गाठा.

’ मनाचे सोबत जसे प्रत्यक्षात भेटतात, तसे ते ऑनलाइनवर आहेत. ज्याला आपण ‘रिकव्हरी जर्नी’ म्हणतो म्हणजे जबर मानसिक धक्क्यातून किंवा दारूच्या अतिसेवनाच्या आहारी गेलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘वेबिनार ’??????? होतात. यातून सकारात्मक विचार आणि मानसिक स्थिती सावरण्यासाठीचे अनेक सल्ले दिले जातात.

हे करा

* जर तुम्हाला दारू पिताना त्रास होत असेल तर समोरच्या व्यक्तीला स्पष्ट नकार द्या.

* दुसऱ्या दिवशी तुम्हाला कामावर जायचे असते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे पिणे लवकर थांबवा.

* रात्रीच्या दारूचा अंमल टाळण्यासाठी सकाळी उठून फळांचा रस प्या. लिंबाचा रस किंवा दोन्हीचे मिश्रण एकत्र करून प्यायल्यास उत्तमच. याशिवाय केळी खा. किवी फळही अशा वेळी उपयोगी ठरते. अल्कोहोल सेवनानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ती कसर भरून काढण्यास ही दोन्ही फळे उपयोगी पडतात.

* काही तास पुन्हा दारूचा ग्लास हाती धरू नका आणि हँगओव्हर घालवायचा असेल तर दूध न घातलेला कडक चहा वा कॉफी घ्या.

हे टाळा

* रिकाम्या पोटी दारू पिऊ नका.

* मेजवान्यांमध्ये महिलांनी पिण्याच्या बाबतीत पुरुषांशी स्पर्धा टाळावी.

* दारूसोबत स्निग्ध पदार्थ खा. त्यामुळे दारू पोटात गेल्या गेल्या लगेच रक्तात मिसळत नाही.

* हँगओव्हर टाळण्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे दोन पेगमधील अंतर वाढल्यास त्या कालावधीत पाणी प्या. अन्यथा दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं जड वाटण्याची शक्यता अधिक असते.

पुन्हा भेटूच नवी स्वप्ने आणि कल्पनांसोबत !!

(अनुवाद :  गोविंद डेगवेकर)

viva@expressindia.com