जीवनशैलीशी निगडीत अनेक चुकीच्या सवयींमुळे आपल्याला आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. पण जीवनशैलीमध्ये काही ठराविक बदल केल्यास हे त्रास निश्चितच दूर होऊ शकतात. सध्या लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखी, पित्त या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप, व्यायाम आणि त्याबरोबरच आपण घेत असलेल्या आहाराचीही महत्त्वाची भूमिका असते. आहारातील काही सवयी मोडल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पाहूया काय आहेत या सवयी…

जेवणानंतर गोड खाणे टाळा

अनेकांना जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते. एखाद दिवशी अशाप्रकारे गोड खाणे ठिक आहे. मात्र दररोज जेवणानंतर गोड खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर गोड खाणे टाळा. एखादा खास प्रसंग, सेलिब्रेशन असल्यास गोड खाण्यास हरकत नाही. परंतु, त्याचे प्रमाण मर्यादित असावे.

जेवणानंतर लगेच झोपणे टाळा

शिक्षण किंवा नोकरी करणाऱ्यांना दुपारी जेवणानंतर झोपणे अवघड असते. पण घरात असणाऱ्या अनेकांना जेवणानंतर झोपण्याची सवय असते. जेवण झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. तसेच यामुळे रक्तातील साखर वाढून लठ्ठपणा वाढतो.

उशिरा जेवणे

आपल्याला भूक लागते तेव्हा जेवणे गरजेचे असते. भूकेची वेळ गेल्यावर जेवल्यामुळे शरीरावर त्याचे विपरित परिणाम होतात. पण the International Journal of Obesity च्या अहवालानुसार जे लोक दुपारी ३ नंतर जेवण घेतात त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे वेळच्या वेळी जेवणे गरजेचे आहे.

जेवणानंतर चहा, कॉफी घेणे चुकीचे

अनेकांना ऑफीसमध्ये जेवण झाल्यानंतर झोप येत असल्याने चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच अॅसिडिक पदार्थ घेणे त्रासदायक ठरू शकते. चहा किंवा कॉफीमधील साखरेमुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. तसंच जेवल्यानंतर लगेचच कॉफी घेतल्यास कॉफीत असलेल्या कॅफेनमुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला चहा किंवा कॉफीची तल्लफ आलीच असेल तर साधारण तासाभराने घ्यावे.