आयफोन वापरणाऱ्या गेमप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. ‘मेड इन इंडिया गेम’ FAU-G (Fearless and United Guards) अखेर iOS च्या युजर्ससाठीही उपलब्ध झाला आहे.

आतापर्यंत हा अ‍ॅक्शन गेम केवळ प्ले-स्टोअरवर अँड्रॉइड युजर्ससाठीच उपलब्ध होता. पण आता हा गेम अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरही लाँच झालाय. अ‍ॅप स्टोअरवर 643MB इतक्या डाउनलोड साइजमध्ये हा गेम उपलब्ध झाला आहे. आयपॅड आणि आयफोन दोन्ही डिव्हाइसवर गेमची मजा घेता येईल. हा गेम डाउनलोड करण्यासाठी आयफोन युजरकडे किमान iOS 10.0 चा सपोर्ट असलेला किंवा त्याच्या वरचा डिव्हाइस आणि आयपॅड युजरकडे iPadOS 10.0 चा सपोर्ट असलेला किंवा त्याच्या वरचा डिव्हाइस असणं अनिवार्य आहे. यापेक्षा कमी व्हर्जन असलेल्या अ‍ॅपल युजर्सना मात्र हा गेम खेळता येणार नाही. गुगल प्ले-स्टोअरप्रमाणेच अ‍ॅप स्टोअरवरही हा गेम मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.

भारतीय सैनिकांवर आधारित :-
भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाला. त्यानंतर FAU-G गेमची घोषणा झाली होती. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे. लाँचिंगआधीपासूनच FAU-G बाबत गेमप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत होती. लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्टर केलं होतं. लाँच झाल्यानंतर प्ले-स्टोअरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केल्याचं समोर आलं होतं. अँड्रॉइड प्ले-स्टोअरवर हा गेम 460 MB डाउनलोड साइजमध्ये उपलब्ध आहे. FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झालंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

टक्कर कोणाला ?
हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.