भारतात सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या करोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. लवकरच लसीकरणाला सुरूवात होणार असून लसीकरणाच्या प्रक्रीयेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका CoWIN या मोबाइल अ‍ॅपची असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 लसीकरणासाठी कोविन (CoWIN App) नावाचं एक अ‍ॅप बनवलंय. लसीकरणाच्या सर्व प्रक्रीयेवर CoWIN या अ‍ॅपद्वारे नजर ठेवली जाईल. पण या अ‍ॅपबाबत आता मंत्रालयाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

CoWIN नावाने अ‍ॅप स्टोअरवर अनेक फेक अ‍ॅप्स आले आहेत. ते अ‍ॅप्स डाउनलोड करु नका किंवा तुमची माहितीही त्यावर शेअर करु नका. CoWIN प्लॅटफॉर्म लॉच होईल त्यावेळी सरकारकडून अधिकृत माहिती दिली जाईल. असं आरोग्य मंत्रालयाने ट्विटरद्वारे सांगितलं आहे. लस नोंदणीसाठी अद्याप कोणतेही अ‍ॅप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे कोविन नावाच्या कुठल्याही अ‍ॅपला बळी पडू नका. अ‍ॅपवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. अशा प्रकराच्या कुठल्याही प्रकारचे अ‍ॅप लाँच करण्यापूर्वी पुरेशी माहिती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


Co-WIN या अ‍ॅपमध्ये लसीकरणाच्या प्रक्रीयेपासून प्रशासकीय कामं, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि लस घेणाऱ्या नागरीकांची माहिती अशाप्रकारचा सर्व डेटा स्टोअर केलेला असेल. नोंदणीनंतर लस घेण्यासाठी कुठे जायचं आहे आणि शिबिराची माहिती अ‍ॅपवरून दिली जाईल. या अ‍ॅपमध्ये सेल्फ-रजिस्ट्रेशनचाही पर्याय मिळेल. CoWIN हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. पण, अद्याप हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध झालेलं नाही.

दरम्यान, देशात करोनावरील लसीकरण मोहीम पुढच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितलं होतं. करोनावरील लसीला मंजुरी दिल्यानंतर दहा दिवसांत लसीकरण मोहीम सुरू होऊ शकेल, असं ते म्हणाले होते.