सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पाच टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सची निवड केली आहे.

पीपललिंक युनिफाईड कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद), सर्व वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड (जयपूर), टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (अलाप्पुझा), इन्ट्रिव्ह सॉफ्टलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड (चेन्नई) आणि साउलपेज आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) या पाच कंपन्यांची मंत्रालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी निवड केली आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, या पाचपैकी टॉप तीन स्टार्टअप्सना प्रत्येकी २० लाख रुपये, तर अन्य दोन स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप डेव्हलप करण्यासाठी दिले जातील.

पाचपैकी एका प्रोडक्टची सरकारकडून निवड केली जाणार आहे. विजेत्याला एक कोटी रुपये अ‍ॅपसाठी दिले जातील. तसेच पुढील तीन वर्षांपर्यंत त्या अ‍ॅपच्या देखभाल-दुरुस्तीसाठी अतिरिक्त १० लाख रुपये दिले जातील. गेल्या महिन्यात यासाठी १० स्टार्टअप्सची निवड झाली होती,त्यातून आता पाच स्टार्टअप्स वगळण्यात आल्या आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रोडक्ट डेव्हलप होण्याची शक्यता आहे.