टीव्ही पाहणे ही अनेकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे दिवसातला कितीतरी वेळ या कामात वाया जातो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांना तासन् तास या टीव्हीसमोर बसण्याची सवय असते. लहान मुलांना तर अनेकदा कार्टून पाहताना आजुबाजूच्या जगाचे भान राहत नाही. त्यांच्या कार्टून पाहण्यात काही व्यत्यय आला तर ते प्रमाणाबाहेर भडकतात. अशावेळी त्यांच्या डोळ्यांची पापणीही लवत नाही आणि त्यांना घरातील कोणी हाक मारली तर तीही ऐकू येत नाही. वय वाढते तशी ही टीव्ही पाहण्याची सवयही वाढतच जाते. मग अभ्यासात मागे राहणे, कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे, लठ्ठपणा आणि डोळ्यांचे विकार अशा तक्रारी उद्भवतात. पाहूयात टीव्ही पाहण्याची सवय कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील…
अगदी आवडणारे दोनच शो निवडा
टीव्हीला चिकटून राहण्यापेक्षा तुम्हाला आवडणारे एक किंवा दोनच शो निवडा आणि तेवढेच शो पाहा. मात्र ठराविक शो निवडा आणि ते फॉलो करा. नाहीतर पुन्हा पहिल्यासारखी वेळ यायला नको.
एखादा छंद जोपासा
घरी गेल्यावर सर्वात आधी हातात टीव्हीचा रिमोट घेण्याची सवय अनेकांना असते. मात्र ही सवय चुकीची असून अशा लोकांना टीव्हीशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. अशा लोकांनी टीव्हीशिवायही आयुष्य असू शकते याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र टीव्ही नसेल तर कोणती गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त आनंदी करु शकते ती गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. मग पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे किंवा तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करा.
फिरायला जा
ज्या लोकांना सतत टीव्ही बघायची सवय असते त्यांना टीव्ही जेच सर्वस्व वाटत असते. मात्र प्रत्यक्षात तसे नसून बाहेर अनेक गोष्टी तुमची वाट पाहत असतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे टीव्ही सोडून थोडे बाहेर गेलात तर असंख्य गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्यामुळे बाहेर पडा आणि स्वत:ला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा.
प्रत्यक्ष जगण्याला टेलिव्हीजन पर्याय असू शकत नाही
टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात आणि तेच खरे जग आहे असे आपल्याला वाटत असते. मात्र त्याशिवायही जगात अनेक गोष्टी असतात ज्यांचा आपण जगण्यातून आनंद घेऊ शकतो. त्यामुळे टीव्ही हे व्हर्चुअल असून माध्यम असून त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी कोणताही संबंध नसतो. त्यामुळे या माध्यमापासून काही काळ दूर राहून प्रत्यक्ष जगण्याचा आनंद घ्या.
कुटुंब आणि मित्रमैत्रीणींमध्ये मिसळा
टीव्हीमुळे अनेकदा आपण एकमेकांशी बोलणेही विसरतो. अनेकदा घरात गेल्यावर आपण कोणाशीही न बोलता सतत टीव्हीसमोर बसून राहतो. या गोष्टीमुळे संवाद हरवत चालला आहे. टीव्हीमुळे आपण घराबाहेर पडून मित्रमैत्रीणींना भेटण्याचे प्रमाणही कमी होते. तसेच फोन आले तरी आपण आवडीच्या सिरीयलची वेळ असल्याने फोन कट करतो. मात्र त्यामुळे आपण इतर जगापासून वेगळे पडण्याची शक्यता असते. म्हणून काही काळ टीव्हीपासून दूर राहून कुटुंबातील व्यक्तींशी आणि मित्रमैत्रीणींशी संवाद वाढविण्याची आवश्यकता असते.