करोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन झाल्याचा जबरदस्त फायदा व्हिडिओ कॉन्फर्सिंग सर्व्हिस अ‍ॅप Zoom ला झाला असून हे अ‍ॅप चांगलंच ‘डिमांड’मध्ये आलंय. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना ऑनलाइन मीटिंग्ससाठी झूम अ‍ॅपचा वापर प्रचंड वाढलाय. पण, अ‍ॅपल आणि स्पेस-एक्स या टेक क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅपचा वापर करण्यास सप्ष्ट नकार दिला आहे. याशिवाय अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही झूम अ‍ॅपचा वापर न करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅपलचे कर्मचारी घरुन काम करताना भविष्यातील प्लॅन आणि प्रोडक्टबाबतच्या मीटिंग्ससाठी कंपनीच्या स्वतःच्या फेसटाइम अ‍ॅपचा सर्वाधिक वापर करतायेत. याशिवाय, स्लॅक आणि Webex यांसारख्या अ‍ॅप्सचाही वापर करत आहेत. पण, झूम अ‍ॅपचा वापर करत नाहीत. एलन मस्क यांच्या अवकाश शोध घेणाऱ्या स्पेस-एक्स कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅपचा वापर न करण्यास सांगितले आहे. याबाबत स्पेस-एक्सने २८ मार्च रोजी एक मेमो देखील आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलाय. “मिटींगसाठी या टूलचा वापर करण्यापेक्षा फोन, इमेल किंवा मेसेजचा वापर करावा”, असे या मेमोमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, नासानेही आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅपचा वापर न करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. झूम अ‍ॅपच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत काही ऑनलाइन रिपोर्ट्समध्ये गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. तसेच, या अ‍ॅपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा अभाव ही एक मोठी चिंता असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कंपन्यांनी या अ‍ॅपचा वापर करण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, “पुढील ९० दिवस दिवस कंपनी कोणतेही नवीन फीचर न आणता त्याऐवजी सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांवर कार्य करेल. आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत”, अशी माहिती झूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक एस युआन यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.