डिजिटल तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सध्या छोटय़ा छोटय़ा दुकान आणि व्यवसायांनाही संगणक वापरणे आवश्यक ठरू लागले आहे. त्यासाठी उत्तम दर्जाचा संगणक खरेदी करणारे त्यातील ऑपरेटिंग सिस्टीम वा सॉफ्टवेअरबाबत मात्र फारसे गंभीर नसतात. अनधिकृत ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने आवश्यक कामे उरकण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र हा सौदा अनेकदा महागात पडतो.

सध्याची हायब्रिड (संमिश्र) कार्यपद्धती व्यवसायांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाची फेररचना करून अधिक गतिमानता आणण्यास मदत करत आहे. मात्र, जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडून देणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेशी निगडित आव्हानेही उभी राहात आहेत. अशा वेळी डिजिटल उपकरणांची आणि त्यात साठवल्या जाणाऱ्या माहितीची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा ठरतो. डिजिटल उपकरणांच्या वापरात दर्जा महत्त्वाचा मानला जात असला तरी, त्यातील अ‍ॅप, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर यांच्याबाबतीत हा कटाक्ष पाळला जात नाही. अनेकदा विंडोजच्या ‘अनधिकृत’ ऑपरेटिंग सिस्टीमसोबत काम भागवले जाते. आवश्यक सॉफ्टवेअरसाठी अधिकृत लायसन्स न घेता त्यांच्या ‘पायरेटेड’ आवृत्त्या वापरण्याकडे कल दिसतो. विशेषत: भारतीयांमध्ये हा प्रकार अधिक असून त्याचा परिणाम डिजिटल उपकरणे किंवा संगणक यांच्या सुरक्षेशी तडजोड होण्यात होतो. जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतीय व्यवसायांना रॅनसमवेअरचा १८० टक्के अधिक, मालवेअरचा ७९ टक्के अधिक, क्रिप्टोकरन्सी मायनिंगचा ३०० टक्के अधिक आणि ‘ड्राइव्ह बाय डाऊनलोड’ हल्लय़ाचा ११ टक्के अधिक धोका आहे.

‘सॉफ्टवेअर पायरसी’ म्हणजे सॉफ्टवेअरच्या एका अधिकृत प्रतीच्या असंख्य नक्कल प्रत बनवून त्यांची बेकायदा विक्री करणे. एकच सॉफ्टवेअर कोणत्याही परवान्याशिवाय अनेक संगणकांवर वापरणे किंवा अनेक व्यक्तींना देणे बेकायदा आहेच; पण त्याचे अनेक धोकेही आहेत. अनधिकृत सॉफ्टवेअरचा वापरही सर्वसामान्य चूक असून व्यवसायांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हायरस तुमच्या संगणकात शिरकाव करतात. संगणकातील अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे तो अशा व्हायरसच्या हल्ल्यांना बळी पडू शकतो. यातून वापरकर्त्यांची गोपनीय माहिती, आर्थिक तपशील, व्यावसायिक माहिती चोरीला जाणे, असे धोके संभवतात. छोटय़ा व्यावसायिकांसाठी संगणकाचे ‘जेन्यूइन’ अर्थात कायदेशीर सॉफ्टवेअर खरेदी करणे आर्थिकदृष्टय़ा न परवडणारे असू शकते. मात्र, दीर्घकालीन विचार करता, तोच सर्वात सुलभ पर्याय ठरतो.

 सुरक्षित राहण्याचे मार्ग

अनेकदा अस्सल सॉफ्टवेअरच्याऐवजी बनावट किंवा अनधिकृत सॉफ्टवेअरची विक्री करून वापरकर्त्यांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे ‘जेन्यूइन’ सॉफ्टवेअर खरेदी करताना खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

१. विश्वासार्ह विक्रेते आणि सॉफ्टवेअर रिसेलर्सकडूनच खरेदी करा : सॉफ्टवेअर खरेदी करताना ते विश्वासार्ह स्रोताकडून मिळत आहे, याची खातरजमा करा. विश्वासार्ह रिसेलर किंवा अधिकृत ऑनलाइन स्टोअर हे सर्वोत्तम पर्याय आहेत.

२.   परवानायुक्त सॉफ्टवेअरचा वापर करा : अधिकृत विंडोज असो वा ऑफिस, ते योग्य परवाना घेऊन खरेदी केलेले सॉफ्टवेअर आहे, याची काळजी घ्या.

३. खोटय़ा सवलतींपासून सावधान : सवलती आणि स्वस्त सॉफ्टवेअर पॅकेजच्या सापळ्यात अडकू नका. गमावलेली माहिती पुन्हा मिळवण्यासाठी किंवा बनावट सॉफ्टवेअरच्या संदर्भात कायदेशीर बाबींवर तुम्हाला कितीतरी अधिकपटीने खर्च करण्याची वेळ येऊ शकते.

४. ‘प्रोडक्ट की’ स्रोत तपासून घ्या : सॉफ्टवेअर डिजिटल माध्यमातून डाऊनलोड केल्यानंतर ‘प्रोडक्ट की’ विश्वासार्ह विक्रेते आणि सॉफ्टवेअर वितरकाकडूनच मिळत आहे का, याची माहिती करून घ्या. अनोळखी ऑनलाइन फोरम किंवा त्यावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या वेब लिंकच्या जाळय़ात अडकू नका.

५. पॅकेजिंग तपासून पाहा : प्रत्यक्ष दुकानातून सॉफ्टवेअर खरेदी करतानाही उत्पादनाचा लोगो, होलोग्राम, नाव आदी माहिती नीट तपासून घ्या. उत्पादनाचे पॅकेजिंग आधीच उघडलेल्या अवस्थेत नाही ना, याची खात्री करा.

७. अद्ययावत राहा : सॉफ्टवेअर नियमित स्वरूपात अद्ययावत केल्यास संभाव्य हॅकर्स आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यास तुम्हाला मदत मिळते.

नकली प्रतकशी ओळखायची?

एखाद्या सॉफ्टवेअरची नकली प्रत ओळखण्यासाठी पुढील तीन गोष्टी नेहमी

लक्षात ठेवा.

* उत्पादनाच्या खोक्यावरील तपशील तपासून पाहा. नकली प्रत असल्यास खोक्यावरील अक्षरे धूसर किंवा अस्पष्ट असतात. लोगोही चुकीचे किंवा भलत्याच ठिकाणी असतात.

* ऑनलाइन सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना मूळ संकेतस्थळाचा स्रोत तपासून पाहा. ऑक्शन साइट्स टाळा आणि पीअर टु पीअर फाइल शेअरिंग साइट्सही टाळा.

* मायक्रोसॉफ्टच्या कायदेशीर प्रतीसोबत

नेहमी ऑथेंटिसिटी प्रमाणपत्र, एम्बेडेड होलोग्राम आणि प्रोडक्ट की असते. याबाबत नेहमी दक्ष राहा.

पायरेटेड सॉफ्टवेअरचे धोके

* ‘पायरेटेड’ सॉफ्टवेअर वापरणे, हा कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही अशा सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याचे आढळून आले तर, तुमच्यावर सॉफ्टवेअरच्या मूळ किमतीपेक्षा कैक पट दंड आकारण्यात येऊ शकतो. प्रसंगी तुम्हाला कारावासही भोगावा लागू शकतो.

* सॉफ्टवेअरच्या नकली प्रतींच्या माध्यमातून मालवेअर तुमच्या संगणकात सहज प्रवेश करू शकतात. असे मालवेअर तुमच्या संगणकीय यंत्रणेला धोका निर्माण करतात.

ल्ल  काही सॉफ्टवेअरची नकली प्रत जाणूनबुजून पसरवली जाते व त्याद्वारे वापरकर्त्यांच्या यंत्रणेत शिरून त्याची गोपनीय माहिती, आर्थिक तपशील चोरला जातो.

* ‘पायरेटेड सॉफ्टवेअर’ना मूळ कंपनीकडून वेळोवेळी अपडेट उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हे सॉफ्टवेअर कालांतराने कालबा होतात.