Superfoods for Cancer Prevention: कर्करोग (कॅन्सर) हा केवळ एक आजार नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्याला हादरवून टाकणारी भीती आहे. आजच्या धकाधकीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. कॅन्सर हा शब्द उच्चारताच माणसाच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते आणि ती केवळ रुग्णापुरती मर्यादित राहत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाला आपल्या विळख्यात घेते. या आजाराच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात. या विकाराचा शरीरासह मनावरही अपार ताण येतो आणि बराच काळ आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. म्हणूनच आज गरज आहे ती कर्करोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याची. जीवनशैलीत काही साधे-सोपे बदल आणि आहारात काही विशिष्ट घटकांचा समावेश केल्यास कर्करोगाचा धोका टाळता येतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक आजारांनी आपलं रोजचं आयुष्य पोखरायला सुरुवात केली आहे. त्यातही कर्करोग ही अशी एक जीवघेणी व्याधी आहे, जी शरीराला हळूहळू आतून नष्ट करीत जाते. मात्र, योग्य आहार घेतल्यास कर्करोगासारख्या धोकादायक आजारापासून सहज बचाव करता येऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. दिल्लीतील मणिपाल हॉस्पिटलचे कॅन्सर एक्स्पर्ट डॉ. अमन रस्तोगी यांच्या मते, आहाराचा कॅन्सरच्या प्रतिबंधात खूप महत्त्वाचा वाटा आहे. कोणताही एक पदार्थ कर्करोग थांबवू शकत नाही; पण काही विशिष्ट सुपरफूड्स नियमित खाल्ल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
फक्त ‘हे’ ३ सुपरफूड खा आणि कॅन्सरचा धोका ठेवा दूर
१. ब्रोकोली
ब्रोकोली ही एक हिरवी, फुलकोबीसारखी दिसणारी भाजी आहे. ब्रोकोली ही पौष्टिक भाजी असून, ती भाजी अनेक आरोग्यदायी फायदे देते. या भाजीमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. ते कर्करोगाच्या सर्व पेशींचे नुकसान होण्यापासून रोखण्याचे काम करतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचा शक्तिशाली घटक आढळतो, जो शरीरातील सुरक्षात्मक एंझाइम्स वाढवतो आणि कर्करोगजन्य पदार्थ बाहेर टाकतो. त्यामुळे प्रोस्टेट, कोलन व मूत्राशय यांच्या कॅन्सरपासून बचाव होतो. डॉक्टरांच्या मते, ब्रोकोलीला जास्त उकळू नये; ती वाफवून किंवा थोड्या ऑलिव्ह ऑइलसोबत हलकीशी परतवून खाल्ली तर त्याची पोषणमूल्यं टिकून राहतात.
२. ब्ल्यूबेरी
ब्ल्यूबेरी (Blueberry) हे एक पौष्टिक फळ आहे. ते लहान, गोल, निळ्या रंगाचे फळ आहे आणि ते अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. ब्ल्यूबेरीमध्ये व्हिटॅमिन, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ब्ल्यूबेरीजमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनॉईड्स असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. तसेच, इम्युनिटी वाढवतात आणि सूज कमी करून शरीराला विविध आजारांपासून संरक्षण देतात. तज्ज्ञांच्या मते, दररोज अर्धी वाटी ब्ल्यूबेरी खाल्ल्यास आरोग्यदायी परिणाम दिसून येतो.
३. टोमॅटो
आपल्या रोजच्या जेवणात असणारा टोमॅटो केवळ चवच वाढवत नाही, तर लायकोपिन नावाचा अँटीऑक्सिडंट कॅन्सरच्या जोखमीपासूनही वाचवतो. टोमॅटो खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. कारण- टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, जे एक कॅरोटिनॉईड आहे. टोमॅटो कॅन्सरविरोधात किमो प्रिव्हेंटिव्हप्रमाणे काम करतो. त्यामुळे टोमॅटोचा तुमच्या आहारात समावेश केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. लायकोपिन फुप्फुस आणि प्रोस्टेट कर्करोगापासून बचाव करते. कच्चे किंवा पक्के कोणत्याही स्वरूपात टोमॅटो खाल्ला तरी ते फायदेशीर ठरते.