आठवडय़ातून केवळ दोन वेळा व्यायाम केल्याने सौम्य संज्ञात्मक दोषाने (एमसीआय) पीडितांच्या विचार करण्याच्या क्षमतेत आणि स्मरणशक्तीत सुधारणा होत असल्याचे अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यॅूरोलोजीने त्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मांडले आहे.

वाढत्या वयानुसार सौम्य संज्ञात्मक दोषाचा त्रास लोकांना जाणवू लागतो. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. हा प्रकार स्मृतिभ्रंशाप्रमाणे नसून यामुळे  स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असल्याचे पुरावे समोर आले आहे. व्यायामामुळे लोकांच्या स्मरणशक्तीत सुधारणा होण्याची शक्यता असून, सर्व लोकांना याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे याचे इतरही आरोग्य लाभ आहेतच, असे अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यॅूरोलोजीचे सहकारी रॉनल्ड सी पिटरसन यांनी सांगितले. एमसीआयमुळे स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असल्याचे याचे निदान लवकर होणे आवश्यक आहे. या निर्देशकांनुसार डॉक्टरांनी एमसीआयपीडित लोकांना नियमित व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. या निष्कर्षांसाठी दीर्घकाळ अभ्यास करण्यात आला नसून सहा महिन्यांच्या अभ्यासात आठवडय़ातून दोनदा व्यायाम केल्याने स्मरणशक्तीत सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे आढळले.

दरम्यान एमआयसीपीडितांच्या विचार करण्याच्या क्षमतेत आणि स्मरणशक्तीत सुधारणा करण्यासाठी कुठल्या प्रकारचे औषधोपचार केले जावेत किंवा त्यांनी कुठला आहार घ्यावा याबाबत दीर्घकालीन, विश्वासार्ह अभ्यास अद्याप करण्यात आला नाही. परंतु एमआयसीपीडितांना डॉक्टर व्यायाम करण्याचा सल्ला देऊ शकत असल्याचे मार्गदर्शक निर्देशांमध्ये सांगितले आहे. हे मागदर्शक निर्देश न्यूरोलोजी नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.