Causes and Symptoms of Bladder Cancer: आजकाल अनेकांना वारंवार लघवी लागणे, लघवी करताना जळजळ होणे अशा तक्रारी होत असतात. आपण हे मूत्रमार्गातील संसर्ग (Urine Track Infection) पाणी कमी पिणं किंवा हवामानामुळे होतंय, असं समजून दुर्लक्ष करतो. पण, हीच बेफिकिरी तुमच्या आरोग्यावर मोठं संकट आणू शकते. कारण- ‘मूत्राशयाच्या कर्करोगा’ची ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
मूत्राशयाचा कर्करोग (ब्लॅडर कॅन्सर) हा एक गंभीर आजार असून, सुरुवातीला त्याची लक्षणं अत्यंत सामान्य वाटतात. हा कॅन्सर पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो; विशेषतः ५५ वर्षांवरील वयात. ही स्थिती मूत्राशयाच्या ऊतींमध्ये कॅन्सर पेशींची वाढ झाल्यावर निर्माण होते. मूत्राशयाच्या कर्करोगाची सुरुवात मूत्राशयाच्या आतल्या पेशींपासून होते. कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. जास्तीत जास्त पुरुषांमध्ये वयस्करपणात हा आजार उद्भवतो. तर काही प्रमाणात महिलांनाही या आजाराचा सामना करावा लागू शकतो. महिलांना मूत्र विसर्जन करताना त्रास होणं, पेल्विक भागात वेदना, पाठीत वेदना, अशी सामान्य लक्षणं सुरुवातीला या आजारात दिसून येतात.
मूत्राशयाचा कर्करोग हा यूरोलॉजिकल कर्करोगाचा एक प्रकार आहे. हा कर्करोग मूत्राशयाच्या आत असलेल्या पेशींमध्ये सुरू होतो. या प्रकारच्या कर्करोगात अनियंत्रित पेशींची वाढ दिसून येते. उपचार न केल्यास, तो शरीराच्या इतर भागांमध्ये जसे की लिम्फ नोड्स, हाडे, फुप्फुसे आणि यकृतामध्ये पसरतो.
काय असतात सुरुवातीची लपलेली लक्षणं?
१. वारंवार लघवी लागणे
पाणी कमी पिऊनही सारखी लघवी लागणे, ती थांबवणे कठीण जाणे हे लक्षण काही आठवडे सतत जाणवत राहिले, तर सावध व्हा.
२. लघवी करताना जळजळ किंवा वेदना
ही लक्षणं मूत्रमार्गातील संसर्गा (Urine Track Infection) सारख्या आजारात असतात; पण जर अँटिबायोटिक घेतल्यावरही त्रास कायम राहिला, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. लघवीची भावना; पण मूत्र न येणे
मूत्राशयामध्ये गाठ असू शकते, जी मेंदूपर्यंत चुकीचे संकेत पाठवते. त्यामुळे लघवी लागते; पण मूत्र येत नाही.
४. खालच्या पाठीमध्ये किंवा पेल्विक भागात वेदना
सुरुवातीला सौम्य असलेल्या या वेदना जसजसे कर्करोगाचे प्रमाण वाढते, तसतशा त्या तीव्र होतात. या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका.
५. लघवीचा रंग बदलणे
मूत्रामध्ये स्पष्ट रक्त न दिसताही त्याचा रंग गडद, गंधयुक्त किंवा गढूळ वाटल्यास तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे.
साधी लक्षणंही लपवतात मोठा धोका
या लक्षणांचा संबंध फक्त मूत्राशयाच्या कर्करोगाशी असेलच, असं नाही; पण ती वेळेवर ओळखली गेल्यास एखाद्याचा जीव वाचवू शकतात. त्यामुळे कोणतेही लक्षण हलक्यात घेऊ नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन, तपासणी करून घ्या.