Parth Samthaan Weight Loss Secret : ‘कसौटी जिंदगी की २’, ‘कैसी ये यारिया’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता पार्थ समथानने अलीकडेच त्याच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत वयाच्या १६-१७ व्या वर्षी त्याचे ११० किलो वजन असल्याचा खुलासा केला होता. “लहानपणी माझे वजन ११० किलो होते. माझी उंची खूप कमी होती, नंतर माझ्यात बदल झाला. चार महिन्यात मी ३२ किलो वजन कमी केले. हे सर्व कार्डिओमुळे झाले. त्यावेळी अॅरोबिक्स होते. मी त्यावेळी खूप अॅरोबिक्स केले. जिम नव्हती, त्यामुळे मी धावायचो आणि डाएट करायचो,” असे ३४ वर्षीय पार्थने कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये संवाद साधताना सांगितले.
पार्थ सांगतो की, अॅरोबिक्समुळे त्याची उंचीही वाढण्यास मदत झाली. “माझी उंची ५’७” होती, त्यानंतर माझी उंची थेट ६’६’११” पर्यंत वाढली; मी तेव्हा १६-१७ वर्षांचा होतो, त्यामुळे मी १५-१८ वयोगटातील अनेकांना कार्डिओ, सायकलिंग, पोहण्यास प्रोत्साहन देतो. माझ्या कुटुंबातील सर्वांच्या सरासरी उंचीनुसार, माझी उंची ५’९”- ५’१०” असायला हवी होती, पण यामुळे मला ६’११” उंची गाठण्यास मदत झाली,” असे पार्थने सांगितले.
याविषयी अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
चार महिन्यात ३२ किलो वजन कमी करणे अतिशय कठीण आहे, पण अशक्य नाही, असे इव्हॉल्व्ह फिटनेसचे संस्थापक वरुण रतन सांगतात. खूप जास्त कॅलरीजची कमतरता आणि कठोर व्यायामामुळे लवकर वजन कमी होऊ शकते. पण, यामुळे अनेकदा स्नायुंचे वजन, चयापचय शक्ती मंदावणे, पौष्टिक कमतरता आणि मानसिक तणाव इत्यादी समस्या उद्भवू शकतात, असे न्युट्रिशनल सायन्समध्ये तज्ज्ञ असलेले वरुण रतन सांगतात.
वरुण रतन सांगतात , “सर्वात दिशाभूल करणारी गोष्ट म्हणजे अॅरोबिक्समुळे पार्थची उंची वाढली, असा दावा केला आहे.” “किशोरावस्थेत उंची ही आहार, हार्मोन्स आणि हाडांमधील वाढीच्या प्लेट्सच्या नैसर्गिकरित्या बंद झाल्याने नियंत्रित करता येते. व्यायाम केल्याने हार्मोन्सला उत्तेजित करून नैसर्गिक उंची वाढण्यास मदत होऊ शकते. पण, ही उंची तुमच्या अनुवांशिक ब्लूप्रिंटला किंवा डीएनएला मागे टाकू शकत नाही. ४ ते ५ महिन्यात ५ ते ६ इंच वाढणे असामान्य आहे, पण जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा विशेषतः मुलांमध्ये हे शक्य आहे. पण, अॅरोबिक्समुळे अचानक उंची वाढणे, हा दिशाभूल करणारा दावा आहे,” असेही रतन सांगतात.
रतन यांनी पुढे असेही सांगितले की “असे दावे करणारा मेसेज अतिशय चिंतेचा विषय आहे.” “खूप जास्त कार्डिओमुळे फक्त वजन कमी होत नाही तर उंचीसुद्धा वाढू शकते, असे जर गृहीत धरले तर अति वजन असलेल्या तरुणांना हानिकारक सवयी लागू शकतात. शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता असेल तर अति कार्डिओ केल्याने ऊर्जेची कमतरता जाणवू शकते”, असे रतन सांगतात.
तुम्ही कितीही वेळ अॅरोबिक्स करत असाल, पण त्यामुळे तुमची उंची वाढणार नाही, असे ते शेवटी सांगतात.