Benefits of Drinking Bhindi (Okra) Water: हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. भेंडी खाणे बहुतेक सर्वांनाच आवडते. ही भाजी प्रत्येक हंगामात बाजारात सहज उपलब्ध असते. अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. त्याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळेच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. पण, फक्त भेंडीची भाजीच नाही, तर त्याचे पाणीदेखील खूप फायदेशीर असते, असे काही तज्ज्ञ सांगतात. पोषणतज्ज्ञ व वेलनेस कोच ईशा लाल यांनी दररोज मधाबरोबर भेंडीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

दररोज सकाळी मधासह भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त

पचनशक्ती सुधारण्यासाठी भेंडीचे पाणी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचन, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो, त्यांनी काही दिवस नियमितपणे भेंडीचे पाणी घ्यावे. भेंडीचे पाणी नियमित प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया सुधारते. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत

भेंडीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. भेंडीमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 

त्वचेत सुधारणा

भेंडीचे पाणी प्यायल्याने त्वचेसाठी अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते मुरमे कमी करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी भेंडीच्या पाण्याच्या सेवनाने त्वचा तेजस्वी होते.

वजन नियंत्रित

भेंडीमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी, सी, फॉलिक ॲसिड, फायबर इत्यादी असतात. हे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. सकाळी मध घेतल्यास चयापचय वाढवते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

भेंडीमध्ये अशी संयुगे असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. भेंडीचे पाणी हृदयाला निरोगी ठेवते. यातील पॅक्टिनमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. भेंडीतील विघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत

पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक आवश्यक अँटिऑक्सिडंट्स असतात, जी शरीराला संक्रमण आणि रोगांपासून वाचवण्यास मदत करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक गोष्ट लक्षात ठेवा, भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे भरपूर असले तरी प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. भेंडीचे पाणी सामान्यतः वापरण्यासाठी सुरक्षित असले तरी त्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात. भेंडीची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी भेंडीचे पाणी टाळावे. हे धोके कमी करण्यासाठी भेंडीचे पाणी कमी प्रमाणात सेवन करावे, असेही पोषणतज्ज्ञ सांगतात.