Kharik Health Benefits for Females सुका मेवा म्हणजे काजू, बदाम आणि खारका असा आपला एक समज असतो. पण सुक्या मेव्यामध्ये अनेक फळांच्या बियांचाही समावेश होतो आणि त्यादेखील तेवढ्याच गुणकारी असतात, त्याविषयी…
काकडीचे बी
महाराष्ट्रात काकडी कोशिंबिरीकरिताच जास्त वापरली जाते. एक काळ महाराष्ट्रात मावळी काकडी खेडोपाडी मिळायची. ती बऱ्याच वेळा कडू असायची. आता मिळणाऱ्या काकडी व्यतिरिक्त आणखी एक लवचिक, चटकन वाकणारी काकडीची जात पुणे-मुंबई रस्तोरस्ती खवय्यांना खुणावत असते. काकडीच्या बियांचा वापर आम्हाला मुळी माहीतच नाही. उत्तर हिंदुस्थानात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळ्या नावाच्या काकड्यांच्या बिया वाळवून त्यांच्या मगजाचा वापर पौष्टिक म्हणून केला जातो.
एड्सच्या दुर्धर विकारातही उपयुक्त
काकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. मासिक स्त्रावाचा दाह, रक्त फार जाणे, कष्टाने रक्तस्त्राव होणे या तक्रारी तसेच लघवी कमी होणे, अडखळत होणे या तक्रारीत बियांचा चांगला गुण येतो. काकडीच्या बियांमधील मगज व मनुका एकत्र वाटून तांदळाच्या धुवणाबरोबर घ्यावे. त्यामुळे लघवीची तिडीक कमी होते. एड्स या गंभीर रोगावस्थेत ज्या स्त्री-पुरुषांना मूत्रेंद्रियांचा दाह होतो, जखम असते, उपदंशाची लक्षणे आहेत त्यांनी काकडीच्या बियांचा वापर वरील प्रकारे करून पाहावा. चीनमध्ये एक प्रकारच्या मोठ्या काकडीच्या बिया व मुळांचा एड्स विकारांकरिता उपयुक्त म्हणून प्रयोग चालू आहे.
पित्त कमी करतात
काकडीच्या बिया या मूत्रवह स्रोते सतत मोकळी ठेवतात. शरीरात कांती सुधारते. रक्तामध्ये जोश आणतात. आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात. शोष पडणे किंवा खूप तहान लागत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्या. कडकीवर काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्याबरोबर घ्याव्या. कडकी कमी होते. काकडीच्या बियांचा वाटून केलेला शिरा फारच पौष्टिक असतो. हिवाळ्यामध्ये वजन वाढविण्याकरिता त्याचा उपयोग होतो. खिरा किंवा खजुराच्या बियांच्या मानाने काकडीच्या बिया कमी पौष्टिक आहेत. पण त्या पित्त कमी करण्याचे कार्य चांगले करतात. काकडीच्या बियांचा वाटून केलेला लेप चेहऱ्याची त्वचा सुधारतो. काकडीच्या बिया या उत्साहवर्धक आहेत. शुक्र धातूचे उत्साह वाढविणे, टिकविणे हे कार्य काकडीच्या बिया चांगले पार पाडतात. कृश व्यक्तींचा आवाज बसणे या विकारात खिरा या जातीच्या काकडीच्या बिया वाटून मधाबरोबर खाव्या, आवाज सुधारतो. उन्हाळ्यात अंगावर उष्णतेचे फोड उठणे, उबाळू, उन्हाळी ताप या तक्रारींत खिरा, काकडीच्या बियांचे सरबत उत्तम काम देते.
खरबूजाचे बी
खरबूज हे मेंदूतील फाजील उष्णता, गरम डोके थंड करण्याकरिता फार उपयुक्त आहे. खरबुजाच्या बियांचा मगज दीर्घकाळच्या तापावर उपयुक्त आहे. काकडी, खरबूज, कोहळा, कलिंगड व दुध्याभोपळा अशा पाच प्रकारच्या बियांचा अष्टमांश काढा कडकी, जुनाट ताप यावर हमखास गुण देतो. या काढ्यामुळे नुसतीच कडकी कमी होते असे नसून वजन वाढण्यास मदत होते. खरबुजाच्या बिया गरम केल्यास त्यातून तेल निघते. तेल अडलेली लघवी मोकळी करण्यास उपयुक्त आहे. दहा-पंधरा थेंब तेल घेतले की लघवी साफ होते.
त्वचाविकार, व्यंग व फोड यावर गुणकारी
खरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक आहे. कॉडलिव्हर ऑइल इत्यादी महागडी तेले उष्ण असतात. खरबुजाच्या बियांचे तेल थंड गुणाचे आहे. पौष्टिक आहे. मूतखडा, यकृतवृद्धी, मूत्रेंद्रियाची सूज, पाळीतील रक्तस्त्राव अडखळत होणे या तक्रारीत खरबुजांच्या बियांचा वाटून तांदळाच्या धुवणाबरोबर उपयोग करावा. या इंद्रियांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन लघवी, रक्तस्त्राव व पित्ताचे मार्ग मोकळे होतात. अति तीव्र उन्हाळ्यात अंगावर फोड आल्यास किंवा सनस्ट्रोकसारख्या अवस्थेत खरबुजाच्या बियांचा मगज फार हितकर आहे. शारीरिक सौंदर्य, त्वचाविकार, व्यंग, फोड याकरिता खरबुजाच्या बिया वाटून लावाव्या. त्वचा नितळ व स्वच्छ होते.
खसखस
अफूच्या बोंडातील बी म्हणजे खसखस हे बऱ्याच जणांना माहीत नाही. दिवाळीमध्ये अनारसे करण्याकरिता ते वापरले जाते. बाळंतिणीला या खसखशीची लापशी द्यावी, एवढीच माहिती बहुतेकांना आहे. अतिसार, कॉलरासारखे वारंवार जुलाब होणे, जुनाट ग्रहणी, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतड्यातील रक्तस्राव, शुक्रदौर्बल्य इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे. खसखशीचे कार्य मधुर रसासारखे पण उष्ण आहे. स्निग्ध व मलावष्टंभ आहे. कफ पित्त वाढवून वातशमन करणाऱ्या पदार्थात खसखस जास्त उपयोगी आहे. कारण त्याच्या वापराने जुलाब होत नाहीत. खसखशीबरोबर साखर, बदाम, बेदाणा, चारोळी, खारीक, मनुका इत्यादी पदार्थ वापरून लापशी करावी. खूप जुलाब होत असल्यास खसखशीच्या बिया वाटून त्याची लापशी किंचित जायफळ व सुंठ चूर्ण मिसळून घ्यावी. खूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळ्यात खसखस लापशी जरूर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा.
खसखशीची लापशी
आमातिसार, पोट दुखून जुलाब होत असल्यास खसखस ताकात वाटून चवीपुरते मीठ मिसळून घ्यावी. खूप नशापाणी, धूम्रपान करणाऱ्यांच्या सर्दी, पडसे, खोकला, दमा या विकारात खसखस दुधात शिजवावी. या दुधात थोडे केशर व वेलची चूर्ण मिसळून घ्यावे. काही कारणाने डोके काम करीत नसेल, मेंदूचा थकवा आला असेल तर बदाम व खसखस वाटून त्याची लापशी घ्यावी. बदाम पचायला जड पडू नयेत म्हणून खसखशीचा उपयोग होतो.
खारीक- अनियमित मासिक पाळीवर रामबाण उपाय
बाजारात सामान्यपणे दोन प्रकारची खारीक मिळते. साखरी खारीक व कोरी खारीक. साखरी खारीक चावायला मऊ व थोडी तुलनेने अधिक गोड असते. कोरी खारीक खूप कडक व कमी गोड चवीची असते. खारीक ही खजुराच्या जातीतील असली तरी स्त्रियांकरिता त्याचे वेगळे विशेष स्थान आहे. ज्या मुलींची मासिक पाळी व्यवस्थित येत नाही त्यांनी नियमितपणे खारीक चूर्ण तुपाबरोबर खावे किंवा किमान एक खारीक रोज खावी. दोन-तीन महिने असा प्रघात ठेवला तर मासिक पाळी नियमित होते.
गर्भधारणेसाठी उपयुक्त
मासिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस राहतात. खारीक खाल्ल्यामुळे वजन वाढेल असे नाही, पण खारकेसारखे शरीर खुटखुटीत व ताठपणे काम करणारे बनते. खारकांचे बारीक तुकडे व तितकेच आल्याचे लहान तुकडे, भरपूर लिंबाचा रस व त्यात अष्टमांश प्रमाणात सुंठ, मिरे, पिंपळी, जिरे व बडीशेप असे चूर्ण, चवीपुरते मीठ व तुपावर भाजलेला हिंग असे लोणचे मुरल्यावर खावे. उत्तम रुची येते. भूक लागते. रक्तपित्त विकारात खारीक व तूप खावे. लहान मुलांचे दात बळकट व्हावयास हवे असतील तर रोज एक खारीक चावून, चघळून खावयास लावावी. चॉकलेट व केकपेक्षा हा खुराक उत्तम.