5 Foods That Help Reduce Uric Acid Levels: आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोक युरिक अॅसिडच्या समस्येने त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेप्रमाणेच शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढणे हेही आरोग्यासाठी धोकादायक आहे. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. युरिक अॅसिड वाढल्यामुळे बहुतेक लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. वाढलेलं युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याविषयी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या डॉ. जी. सुषमा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
डॉ. जी. सुषमा सांगतात, “आजची व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना हाय युरिक ॲसिडची समस्या भेडसावत आहे. युरिक ॲसिडची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, सूज आणि किडनीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आहार आणि जीवनशैलीत बदल करून ही समस्या नियंत्रणात राहते,” त्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल त्यांनी सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया…
युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
१. केळी
कच्ची केळी जी फार कमी खाल्ली जातात. मात्र, त्यांच्यात अधिक प्रमाणात पौष्टिक घटक असतात. हे बहुमुखी फळ युरिक अॅसिडची पातळी, रक्तातील साखर आणि अगदी रक्तदाब नियंत्रित करण्यासह अनेक बाबतीत लाभदायक आहे. युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक केळं खाल्ल्याने तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी होऊ शकते. केळींमध्ये जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात आढळतात. सांधेदुखीसारख्या गंभीर समस्यांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर आहे.
२. कमी चरबीयुक्त दूध आणि दही
दूध आपल्या पोषणासाठी एक महत्त्वाचा पदार्थ आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे असतात. कमी चरबीयुक्त दूध आणि कमी चरबीयुक्त दही तुमच्या युरिक अॅसिडवरची पातळी कमी करण्यास मदत करु शकतात. एवढेच नाही तर ते तुमच्या शरीरातून युरिक अॅसिडला बाहेर काढण्यास मदत करते.
३. कॉफी
कॉफीचे नियमित सेवन असल्यास, युरिक अॅसिड रक्तात मिसळण्यापूर्वीच शरीराबाहेर फेकण्याचे काम कॉफी करते. कॉफीमध्ये काही असे एन्झाइम आढळतात, जे शरीरातील प्युरीन तोडण्याचे काम करते. यामुळे युरिक ॲसिडचा वेग कमी होतो आणि लोकांना युरिक अॅसिडच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत मिळते. तसंच कॉफीमध्ये शरीरात युरिक अॅसिड व्यवस्थित गाळून घेण्याची क्षमताही असते, यामुळे कॉफीच्या मदतीने युरिक ॲसिड स्तर नियंत्रणात राहतो.
४. लिंबूवर्गीय फळे
लिंबू तुमच्या शरीरात अल्कलाइनचा प्रभाव वाढवून युरिक अॅसिड कमी करण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी यूरिक ॲसिडची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. आवळा, लिंबू, संत्री, पपई आणि अननस यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून ते नैसर्गिकरित्या युरिक अॅसिडची उच्च पातळी कमी करण्यास मदत करतात.
५. चेरी
चेरी यूरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.चेरीचे सेवन युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. चेरी युरिक ॲसिड कमी करते, कारण त्यात अँथोसायनिन्स असतात, जे चेरींना त्यांचा रंग देतात. ज्या लोकांना युरिक ॲसिड जास्त आहे, त्यांनी चेरीचे सेवन करावे.