How to control Blood Sugar : सण कोणताही असो, प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थांचा बेत आखला जातो. कारण- गोड पदार्थ करून सण साजरा करणे, ही भारतीय संस्कृती आहे. होळीला काही ठिकाणी गुजिया; तर काही ठिकाणी मालपुआ केला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळी केली जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, सणावाराला अतिगोड खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर द इंडियन एक्स्प्रेसने अपोलो हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट प्रियंका रोहतगी यांच्या हवाल्याने काही खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवून तुम्ही होळीला गोड पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

गोड पदार्थ टाळताना सुरुवातीला गोड कमी खाण्याची सवय लावा. पूर्णपणे गोड खाणे बंद करण्यापेक्षा थोड्या प्रमाणात खा. त्यामुळे तुम्ही होळीला बिनधास्त गोड खाऊ शकता. गोड पदार्थ खाताना प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या आणि चवीवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे खूप गोड खाण्याची तुमची इच्छा कमी होऊ शकते.

कॅलरीज मोजा

जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खात आहात, तेव्हा कॅलरीज मोजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढ्या कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ले, तेवढा व्यायाम करा. तळलेले पदार्थ, अल्कोहोल घेणे टाळा. विशेष म्हणजे संतुलित आहार घ्या.

पौष्टिक पर्याय निवडा

होळीला पारंपरिक खाद्यपदार्थ बनविताना पौष्टिक पर्याय निवडा. जर तुम्ही साखरेऐवजी गूळ, मध किंवा खजूर वापरू शकता. असे गोड पदार्थ फक्त चविष्ट नसतात, तर तितकेच ते आरोग्यासाठी पौष्टिकसुद्धा असतात.

ऋतूनुसार फळे खा

होळीबरोबर वसंत ऋतूचे आगमन होते. यादरम्यान ताजी फळे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. साखरयुक्त पदार्थ खाण्याऐवजी मिश्र फळांची थाळी किंवा ताज्या फळांची कोशिंबीर बनवा. फळे चवीला गोड असतात आणि शरीरास मुबलक प्रमाणात पाणी पुरवतातच; त्याशिवाय आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व फायबरसुद्धा देतात. त्यामुळे संपूर्ण उत्सवादरम्यान तुमचा उत्साह टिकून राहील.

हेही वाचा :Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

भरपूर पाणी प्या

होळी खेळताना पाणी पिणे विसरू नका. ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि साखरयुक्त पेये टाळण्यासाठी शरीराला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता भासू शकते. अशात पाण्याची बाटली बरोबर ठेवा आणि पाणी प्या. त्याशिवाय तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये चांगल्या चवीसाठी लिंबू, काकडी, पुदिन्याची पाने इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता.

प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

भूक लागू नये म्हणून होळीच्या मेजवानीमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. चणे मसाला, पनीर टिक्का व मसूरची कढी यांसारखे पदार्थ शरीराला ऊर्जा पुरवतात आणि त्यामुळे आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.

स्वत:ला व्यग्र ठेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर होळीदरम्यान तुम्ही शारीरिक हालचाल करीत स्वत:ला व्यग्र ठेवत असाल, तर तुम्हाला गोड पदार्थ कमी खाण्यास मदत होईल. हे वाचताना तु्म्हाला विचित्र वाटू शकते; पण याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. होळीदरम्यान मित्र वा कुटुंबासह क्रिकेट खेळा किंवा नृत्य वा संगीताचा आनंद घ्या. त्यामुळे तुमच्या कॅलरीज फक्त कमीच होणार नाहीत, तर तुमचा मूडदेखील सुधारेल.