Waking Up Middle Of The Night Causes And Remedies : रात्री एकदा झोपल्यानंतर वारंवार जाग येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यात ताणतणाव, चिंता, झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहाचं सेवन, औषधांचे सेवन, हार्मोनल बदल अशी कारणं असू शकतात. विशेषत: महिलांमध्ये मासिक पाळी किंवा मेनोपॉज, अॅसिड रिफ्लक्स, दमा किंवा मूत्राशयासंबंधित समस्या यांसारखी कारणं असू शकतात, अशी माहिती मुंबईतील परळमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटल इंटरनल मेडिसिन सिनियर कन्सल्टंट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी दिली.
डॉ. अग्रवाल म्हणाल्या की, रोज वेळेवर न झोपणे हे देखील मुख्य कारण असू शकते. झोपेच्या चुकीच्या सवयी जसे की, रात्री उशिरा झोपणे आणि झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, यामुळेही रात्री झोपेतून वारंवार जाग येऊ शकते, यामुळे तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो; कारण तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी झोप फार गरजेची असते, यामुळे तुमचे शरीर विश्रांती अवस्थेत जाते. पण, सतत जाग येत असल्याने झोपेत अडथळा येतो. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी तुमच्या मूडवरदेखील होतो, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा, चिडचिडपणा आणि मूड स्विंग्स होत राहतात.
जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर यातून तुमचे शरीर तुम्हाला सांगत असते की, काहीतरी अडचण आहे.
यामुळे जाणवणाऱ्या अनेक छोट्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, ज्या वेळीच सुधारता येऊ शकतात. झोपेसंबंधित कोणतीही समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य निदानासाठी नेमके कारण जाणून घेण्यासाठी तुमच्या रोजच्या झोपेच्या स्थितीचे मूल्यांकन करा. झोपेचे एक वेळापत्रक प्लॅन करा, चहा, कॉफी पिणे टाळा. ताणतणावाचे व्यवस्थापन करा आणि रोज संतुलित आहार खा, तसेच जीवनशैलीत उपयुक्त बदल करा, असे डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले.