कधी तुम्ही विचार केला आहे का, दुपारी १२ नंतर साखर टाळल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत शारीरिक आणि चयापचयासंबंधी अनेक बदल घडतात. दुपारनंतर साखरेच्या सेवनामुळे अनेकदा रक्तातील शर्करेच्या पातळीत झपाट्याने वाढ किंवा घट होते. हे टाळल्यास रक्तातील शर्करेची पातळी स्थिर ठेवता येते. अनेक लोकांना संध्याकाळी हलकेपणा जाणवतो, ऊर्जा अचानक कमी होण्याचे प्रमाण कमी होते आणि झोपही सुधारते.

“दुपारी साखर घेतल्यास अचानक रक्तातील शर्करेच्या पातळीत वाढ-घट होते, ज्यामुळे शरीरांचा कार्य करण्याचा वेग मंदावतो आणि थकल्यासारखे वाटते, ज्यामुळे काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते. पण, हे टाळल्यास शरीराला स्थिर ऊर्जा मिळते,” असे के आय एम एस हॉस्पिटल्स, ठाणे येथील मुख्य डायटीशियन डॉ. गुलनाझ शेख यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठीही हे फायदेशीर ठरू शकते. “दुपारी साखर टाळल्यास रक्तातील साखरेवर अधिक नियंत्रण मिळते, जे मधुमेह किंवा वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे,” असे झंद्रा हेल्थकेअरचे डायबेटॉलॉजी आणि वजन कमी करण्याचे तज्ज्ञ डॉ. राजीव कोव्हील यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, रात्री झोप सुधारण्यास मदत होते. “झोपेच्या जवळ साखरेची पातळी जास्त असते, तर मेलाटोनिनच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि सर्केडियन रिदम (शरीराचे उठण्याचे अन् झोपण्याचे चक्र) बिघडते, त्यामुळे लोकांना झोप येण्यासअडचण येत नाही आणि रात्रीचे जागरण देखील कमी होते,”असे डॉ. कोव्हील म्हणाले.

दुपारी साखरेचे किंवा गोड पदार्थांचे सेवन टाळल्यास वजन व्यवस्थापनासही फायदा होतो. “दुपारी घेतलेली साखर त्वरित ऊर्जा म्हणून वापरली जात नाही आणि जास्त प्रमाणात चरबी म्हणून साठू शकते. हे टाळल्यास अतिरिक्त कॅलरी कमी होतात आणि संध्याकाळी भूकही नियंत्रित राहते,” असे त्यांनी सांगितले.

साखरचे सेवन कमी केल्याने ऊर्जा स्थिर राहते, थकवा कमी होतो आणि मानसिक स्पष्टता वाढते. “फक्त दोन आठवड्यांत पोटफुगी कमी होणे, मूड स्थिर राहणे आणि संतुलित आहार पाळण्याची क्षमता वाढणे यासारखे बदल दिसू लागतात,” असे डॉ. कोव्हील यांनी नमूद केले.

साखरेचे सेवन टाळल्याने पचन सुधारते, पोटफुगी कमी होते आणि त्वचा नितळ राहते, कारण संध्याकाळी साखरेच्या सेवनामुळे होणारे हार्मोनल बदल या गोष्टींना बाधित करतात, असे डॉ. शेख यांनी सांगितले. “अनेकांना मूड स्विंग्स कमी होतात, कारण संध्याकाळची ऊर्जा स्थिर राहते,” असेही त्यांनी नमूद केले.

हे सर्वांसाठी सुरक्षित आहे का?

जास्तीतजास्त निरोगी लोकांसाठी हे सुरक्षित आहे. “फक्त मधुमेह किंवा हायपोग्लायसेमियाचा त्रास असलेल्या लोकांनी साखर सेवन काळजीपूर्वक करावे आणि अचानक बदल करू नये. सामान्य लोकांसाठी प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त संतुलित जेवणाबरोबर हे उत्तम परिणाम देते,” असे डॉ. शेख यांनी सांगितले.

काय लक्षात ठेवावे?

हे “त्वरीत उपाय” म्हणून नाही, तर एक ‘जीवनशैलीतील प्रयोग’ म्हणून करा. “दुपारी १२ नंतर साखर टाळणे म्हणजे खाण्याची सवय सुधारण्याचा, काहीतरी खाण्याची लालसा कमी करण्याचा आणि शरीरात हलकेपणा जाणवण्याचा एक सोपा मार्ग आहे. जर दोन आठवड्यांत फायदा दिसला तर ते दीर्घकालीन पद्धतीने सुरू ठेवणे योग्य ठरेल,” असे डॉ. शेख यांनी सांगितले.