अॅसिडीटीचा त्रास होतोय? हे उपाय करा

जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता

जीवनशैलीत वेगाने होत असणारे बदल आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. अवेळी खाणे, झोपण्याच्या वेळा, जंक फूड, आहारातील कमी होत असलेले मूल्य यांसारख्या गोष्टी आरोग्याचे गणित बिघडण्यासाठी कारणीभूत असतात. कामाचा ताण आणि एकूणच वाढता वेग यामुळे पचनाशी निगडीत समस्याही निर्माण होतात. यामुळे अॅसिडीटीचा त्रास होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. मग कधी अॅसिडीटीच्या गोळ्या खाऊन तर कधी आपल्याला माहीत असलेले उपाय करुन यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. कधी ही अॅसिडीटी इतकी वाढते की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याशिवाय पर्यायच नसतो. अॅसिडीटी दूर करण्याचे काही सोपे उपाय पाहूयात…

आपली पचनशक्ती लक्षात घेऊनच खा

प्रत्येकाने आपल्या पचनशक्तीनुसार आहार घेणे आवश्यक असते. परंतु तुम्ही तसे न केल्यास तुमच्या शरीराला न पचणारे पदार्थ अॅसिडीटी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अनेकदा आपले वयही आपल्याला साथ देत नाही. वय वाढले की पचनशक्ती कमी होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे भान राखून आपण खायला हवे हे नक्की.

योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे

शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. मात्र कामाच्या नादात किंवा इतर गोष्टींमुळे आपण पाणी कमी पितो. याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. आपण खाल्लेल्या पदार्थांमुळे पोटात अनेक आम्लपदार्थ तयार होतात. पाणी पिल्याने शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला फायदा होतो.

व्यायाम आवश्यकच

व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतो. शरीर सुदृढ राहण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते. व्यायामामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत होऊन शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. पेशींमध्ये नवी उर्जा निर्माण करण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. व्यायामाने खाल्लेले अन्न आहे ते पचायला मदतही होते.

ताण दूर करा

दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमुळे आपल्याला ताण येत असतो. हा ताण आपल्या शरीरातील गोष्टींवर परिणाम करतो. त्यामुळेही अॅसिडीटी आणि गॅसेसचे त्रास होतात. मात्र या ताणावर नियंत्रण मिळविल्यास अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते. योग, ध्यान, छंद जोपासणे यांसारख्या गोष्टी करण्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. ताण कमी झाला की अॅसिडीटीचा त्रास होण्याचीही शक्यता कमी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: If you have problem of acidity follow this things