माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष. त्यामुळे वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. परंतु काळानुसार माणसाच्या गरजा बदलल्या आहेत. अनेक गावांमध्ये शहरीकरण झालं आहे. या आधुनिक युगामध्ये उंचच्या उंच इमारती बांधण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात येते. त्यामुळे झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत आहेत. परंतु झाडे हे मानवासाठी अत्यंत उपयुक्त असून त्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये डेरेदार वृक्षांचा सर्वाधिक फायदा होत असतो. वड, पिंपळ, आंबा, उंबर आणि गुलमोहर या झाडांचे अनेक गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे या झाडांपासून केवळ सावलीच मिळत नाही तर त्याचे अन्यही फायदे आहेत. यामध्ये पिंपळ हे झाडं सर्वांगाने उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊयात पिंपळाच्या झाडाचे फायदे.
१.श्वास घेण्यास त्रास होणे –
अनेकांना श्वसनासंदर्भातील आजार असतात. या आजारामध्ये पिंपळाचं झाडं हे अत्यंत उपयुक्त ठरतं. पिंपळाच्या झाडाची साल वाळवून त्याचं चुर्ण तयार करावं. या चूर्णाचं सेवन केल्यामुळे श्वसनाच्या आजारापासून काही काळ आराम मिळू शकतो. त्याप्रमाणेच पिंपळाची पाने दूधात उकळून ते प्यावे, यामुळे दमा असलेल्या व्यक्तींना आराम मिळतो.
२. अॅसिडीटी आणि गॅसेसची समस्या –
अनेकांना वेळीअवेळी खाल्ल्यामुळे अॅसिडीटीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे जळजळ होणं, छातीत दुखणं या समस्या वरचेवर जाणवू लागतात. तर अनेकांना पित्ताचा त्रास असतो. अशा व्यक्तींनी पिंपळाच्या पानांचा रस काढून तो दररोज सकाळी प्यावा. यामुळे पित्ताची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
३.दातदुखी –
दातांची पकड मजबूत करण्यासाठी आणि दातांशी निगडीत समस्यांचं निराकरण करण्यासाठी पिंपळ बहुगुणी ठरतो. १० ग्रॅम पिंपळाची साल, चुना आणि दोन ग्रॅम काळी मिरी घेऊन यांचं चूर्ण तयार करावं. या चूर्णाने दररोज दात घासावेत. यामुळे दातदुखी, दातातील किड या सारख्या समस्या दूर होतात.
४. विषबाधा झाल्यास –
अनेक वेळा आपल्या नकळतपणे एखादी विषारी जीव किंवा प्राणी आपल्याला दंश करतो. अशावेळी तात्काळ उपचार म्हणून पिंपळाच्या पानांचा रस हळूहळू करुन रुग्णाला पाजावा.
५. त्वचारोग –
काही जणांची त्वचा ही सेंसेटीव्ह असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टींची त्यांना लगेच अलर्जी होते. यामध्ये मग शरीरावर डाग येणे किंवा खाज सुटणे या समस्या होता. अशा समस्यांवर उपाय म्हणून पिंपळाची कोवळी पाने खावीत किंवा त्याचा रस करुन तो प्यावा. तसंच शरीराव फोडं, पुरळ उठत असतील तर त्यावर पिंपळाच्या पानांची साल घासावी.
६. जखम झाल्यास –
जखम झाल्यानंतर त्या जागेवर पिंपळाचं पान थोडसं गरम करुन त्याचा शेक द्यावा. तसंच रोज या पानांचा लेप करुन तो जखम झालेल्या जागेवर लावाला. दरम्यान, हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा आवर्जुन सल्ला घ्यावा.