पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे एका नव्या अभ्यासात समोर आले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कमी झोप मिळते त्या वेळी तो प्रतिकारशक्ती कमी होऊन आजारी पडण्याची शक्यता असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

संशोधकांनी कमी-अधिक प्रमाणात झोप घेणाऱ्या ११ जोडय़ांच्या रक्ताचे नमुने घेतले. यामध्ये जास्त झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी झोप घेणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी दिसून आली.

जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. सात किंवा त्यापेक्षा अधिक तासांची झोप चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्रसिद्ध लेखक नॅथानियल वॉटसन यांनी म्हटले आहे.

कमी झोपेमुळे शरीरातील दाहक मार्कर वाढतात आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती पेशी वाढतात. नैसर्गिक वेळेत पुरेशी झोप घेण्याचे अनेक फायदे असल्याचे विद्यापीठातील सायना घारीब यांनी म्हटले आहे.

हा अभ्यास झोप घेण्याच्या सद्य:स्थितीवर करण्यात आला असून प्रथमच कमी झोपेमुळे शरीरातील पांढऱ्या पेशींवर होणारा परिणाम आणि रोगप्रतिकारशक्ती यावर यामध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कमी झोपेमुळे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अमेरिकेमध्ये मागील दशकात झोपेचे प्रमाण हे प्रत्येक रात्री दीड ते दोन तासांनी कमी आहे. तसेच काम करणारी एकतृतीयांश जनता प्रत्येक रात्री सहा तासांपेक्षा कमी झोप घेते, असे वॉटसन यांनी म्हटले आहे.

आधुनिक समाज तसेच सर्वव्यापी तंत्रज्ञान, सतत वाढत असणारी स्पर्धा यामध्ये शरीरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या झोपेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे संशोधन झोपेसंबंधित असणाऱ्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.