‘ताई आणि दादा’ हा अग्रलेख (२९ नोव्हेंबर) वाचला. वास्तविक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात, सारेच पक्ष लोकांच्या गरजेची कामे करण्याऐवजी लोकांच्या भावनेला हात घालून आपापल्या सोयीचे राजकारण करीत आहेत. भले ती भावना देशप्रेमाची असो, धर्मप्रेमाची असो किंवा कधी मोठय़ा व्यक्तींच्या जयंती वा स्मृतिदिनप्रसंगापुरती दिसणारी, कधी लष्करी जवानांच्या शौर्यगाथेची असो. हे आजवर कसे तरी चालून गेले. यापुढे भावनेऐवजी अतिवेगवान पद्धतीने अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याची गरज आहे. ओला-कोरडा दुष्काळ निवारणे, पूरनियंत्रण, सार्वजनिक वाहतुकीचे रखडलेले प्रकल्प, पिण्याच्या पाण्याची सार्वत्रिक उपलब्धता, पाण्याचे समान वाटप, शेतमालाच्या किमती, तसेच औद्योगिक मंदी या साऱ्याच प्रश्नांना नावीन्यपूर्ण, वास्तववादी रीतीने भिडण्याची गरज आहे. भारतात सर्व क्षेत्रांतील बुद्धिवंत, शास्त्रज्ञ आहेत; पण त्यांच्या कल्पक योजनांना केराची टोपली दाखविली जाते. सत्तेला भावनांचा खेळ थांबवण्याचे शहाणपण आले नाही, तर देश अत्यंत कठीण अवस्थेतून जाणार आहे. याच निमित्ताने, ‘मन की बात’ या पंतप्रधानांच्या कार्यक्रमातही भावनेला अधिक महत्त्व दिले गेल्याचे माझे निरीक्षण आहे, हे नमूद करावे लागेल.

– भास्करराव म्हस्के, पुणे</strong>

माध्यमस्वातंत्र्याची ग्वाही

‘ताई आणि दादा’ हा अग्रलेख वाचताना जाणवत होते की, गेल्या पाच वर्षांत एवढी कठोर व रोखठोक भाषा प्रथमच वाचावयास मिळते आहे. अर्थात, शब्द तोलून वापरण्याच्या आणि टीका केली तरीसुद्धा ती हातचे राखून करण्याच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात अग्रलेखांकडून कठोर भाषेची अपेक्षाच नसणेही साहजिक होते. ‘ताई आणि दादा’ या धारदार अग्रलेखाने, आताचे सरकार माध्यमस्वातंत्र्याची गळचेपी करणारे नाही याची ग्वाहीच दिली आहे!

– स्वप्निल गणपतराव पाटील, करंजवडे (ता. वाळवा, जि. सांगली)

राज्य कारभार राबडीदेवींनीही केलाच..

‘उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही, ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारचा कारभार कसा हाकणार?’ असा प्रश्न काही पत्रलेखकांनी (लोकमानस, २९ नोव्हेंबर) सूचकपणे विचारला आहे. पूर्वी बिहारमध्ये मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे ते पद सोडावे लागले, तेव्हा ज्या तोपर्यंत निव्वळ गृहिणी होत्या, त्या लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आले. राबडीदेवी जर कारभार हाकू शकल्या; तर उद्धव ठाकरे राजकारणात त्यांच्यापेक्षा नक्कीच हुशार आहेत. ते निश्चितच चांगला कारभार करतील. आघाडीतील इतर पक्षांनी सहकार्य केले आणि केंद्र सरकारने दिल्ली सरकारला/ केजरीवालांना सुरुवातीला नामोहरम करण्याचा हरतऱ्हेचा प्रयत्न केला-तसे नाही केले, तर सरकार चांगले काम करू शकेल.

– माधव ल. बिवलकर, गिरगाव (मुंबई)

उपदेशाची निकड होतीच!

वरवर क्षुल्लक वाटणारा प्रसंग, पण त्यातून डोकावू शकणारा एक अपायकारक परिणाम ‘ताई आणि दादा’ या अग्रलेखातून (२९ नोव्हें.) वेळीच मांडला आहे. तशा उपदेशाची निकड  होतीच. शपथविधीच्या वेळी आमदार पुत्र आणि मुख्यमंत्री यांची व्यासपीठावरील गळाभेट पाहून जे वाटले, ते नेमके आतील पानावर अग्रलेखात वाचावयास मिळाले!

– अवटी व्यंकटरमण, औरंगाबाद</strong>

भारतात राजेशाही, लोकशाही की घराणेशाहीच?

‘ताई आणि दादा’ हा अग्रलेख वाचला आणि मनात असा प्रश्न निर्माण झाला की, भारतातील राज्यव्यवस्था नक्की आहे तरी कशी-राजेशाही, घराणेशाही की लोकशाही? लोकशाही आहे का? तर आहे; कारण निवडणुका होतात. घराणेशाही आहे का? तर आहे; कारण राजकीय पक्षांत ठरावीक घराण्यांतील मुले, भाचे-पुतणे, पती-पत्नी, सुना-नातवंडे यांची रेलचेल दिसून येते. राजेशाही आहे का? तर आहे; कारण राजानंतर राजपुत्राने राज्य करायचे, ही कल्पना लोकांच्या मनातून गेलेली नाही. ही गोष्ट नैसर्गिक असल्याप्रमाणे किंवा नाइलाजाने लोकांनी स्वीकारलेलीच आहे.

पंडित नेहरूंवर घराणेशाहीचा आरोप करणारे लोक आपल्यावर वेळ आली, तेव्हा घराणेशाहीच करताना दिसतात. एकनाथ खडसेंसारख्या नेत्याला बाजूला करण्यासाठी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन घराणेशाहीचा वेगळ्याच प्रकारे वापर होतानाही दिसतो. दोन-तीन दशके एखाद्या पक्षासाठी काम करूनही जेव्हा पक्षातली वरची पदे देताना कार्यकर्त्यांना डावलले जात असेल आणि दोन-चार वर्षे काम केल्यानंतर किंवा बऱ्याचदा दादागिरी केल्यानंतर नेत्याच्या नातलगाला एकदम बढती मिळत असेल, तर त्याने कार्यकर्त्यांना किती नराश्य येत असेल याची कल्पनाच करवत नाही.

या घटनांचे मूळ बहुधा आपल्या संस्कृतीत, सामाजिक परिस्थितीत आणि अर्थरचनेत आहे. पाकिस्तानातही अशी परिस्थिती आहे; पण याबाबतीत पाकिस्तान आपल्यापेक्षा वेगळा नाहीच. परदेशात हे प्रमाण कमी आहे. (जॉर्ज बुशना विसरून कसे चालेल?) कारण परदेशात मुले खूप लवकर कुटुंबापासूनच वेगळी होतात आणि स्वत:ची ओळख स्वत: निर्माण करतात. भारतात मात्र कुटुंबव्यवस्था सांभाळायची म्हणून ही चमत्कारिकपणे विस्तारित कुटुंबे सुखाने घराणेशाही राबवताना दिसतात. यावर जागरूकपणे काही तरी उपाय शोधायला हवा.

– सुनेत्रा मराठे, पुणे

लहानग्यांवरील लेखनसक्तीला पालकच जबाबदार!

‘मेंदूशी मैत्री’ या सदरातील ‘वयानुसार लेखन’ हे स्फुट (२७ नोव्हेंबर) मोठय़ा अक्षरांत पुनर्मुद्रित करून सर्व बालवाडींतील मुलांच्या पालकांना वाटले पाहिजे. माझी नात बालवाडीत असताना तिला एकदा १ ते १०० आकडे संख्येत आणि अक्षरी (इंग्रजीत) लिहिण्याचा गृहपाठ दिला होता आणि तो पुरा न झाल्यामुळे ती घाबरून शाळेत जायला तयार नव्हती. मी तिच्या शिक्षिकेला भेटून शिक्षणतज्ज्ञ डॉ. रमेश पानसे यांनी असे न करण्यासाठी दिलेली कारणेच तिला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘अहो, आम्ही तरी काय करणार? पालकच- ‘दुसऱ्या शाळेत पाहा, मुलांना रंग ओळखता येतात आणि लिहितासुद्धा येतात. तुम्ही हे शिकवणार नसाल तर शाळा बदलतो..,’ असा धाक दाखवतात.’’ याचा अर्थ लहानग्यांवरील लेखनसक्तीला पालकच जबाबदार आहेत. त्यांचे आधी प्रबोधन करायला हवे.

– डॉ. शरद अभ्यंकर, वाई