सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष संथगती शनी आणि कार्यशक्तीचा कारक मंगळ यांच्या केंद्र योगामुळे कामातील संघर्ष वाढतील. शांत डोक्याने विचार करावा.  नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची नाराजी पत्करावी लागेल. सहकारी वर्ग अपेक्षित काम वेळेत पूर्ण करून दिलासा देतील. जोडीदाराचे व्यवहारचातुर्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपयोगी पडेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवा. प्राणायाम आवश्यक! इतरांना मदत करण्यापूर्वी स्वत:चे आरोग्य सांभाळा.

वृषभ बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे संशोधन कार्याला वेग येईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. सहकारी वर्गाच्या अडचणींमुळे कार्यपूर्तीमध्ये दिरंगाई होईल. पर्यायी यंत्रणा उपयोगी पडेल. जोडीदाराच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना स्वीकारणे त्याला जड जाईल. कुटुंब सदस्यांना शिस्तीसह प्रेमाचा आधार द्याल. डोळे चुरचुरणे , लाल होणे असा त्रास संभवतो. वेळेवर काळजी घ्यावी. डोळ्यांना विश्रांती द्यावी.

मिथुन चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे कामाच्या नव्या स्वरूपामुळे बुद्धीला चालना मिळेल. नवी आव्हाने स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाच्या चुका, त्रुटी दाखवण्यापेक्षा त्या सुधारण्याकडे आपला कल असेल. स्वयंशिस्तीचा अवलंब लाभदायक ठरेल. जोडीदाराच्या कामातील समस्यांवर चर्चा कराल. मार्ग सुचवाल. कौटुंबिक वातावरण कंटाळवाणे होऊ न देता कुटुंब सदस्यांच्या कलागुणांना उत्तेजन द्याल. पित्ताचा त्रास होईल.

कर्क शुक्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे कला, लेखन, काव्य, सादरीकरण यांसाठी नवस्फूर्ती मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाच्या कागाळ्यांकडे फारसे लक्ष न देता ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करावी. जोडीदाराचे नकारात्मक विचार दूर करून त्याला नवा दृष्टिकोन द्याल. कौटुंबिक वातावरण  हलके फुलके ठेवण्याचा प्रयत्न कराल. नातेवाईकांच्या समस्या डोकेदुखी ठरेल. शारीरिक अशक्तपणा घालवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा.

सिंह रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे  हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. रवीची ऊर्जा चंद्राच्या क्रियाशीलतेला उत्तेजन देईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ नव्या जबाबदाऱ्या सोपवतील. कायद्याच्या कामांमध्ये पुढचे पाऊल टाकाल. मानपान बाजूला ठेवा. अंतिम निर्णय सबुरीने  घ्यावा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. रक्तदाब व रक्तातील साखर यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे! यासाठी आहार व व्यायामाकडे लक्ष पुरवावे.

कन्या गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.  नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. आपल्या मतांचा विचार केला जाईल. सहकारी वर्गाकडून कामातील खाचाखोचा समजून घ्याल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची पत वाढेल. एकमेकांना भावनिक आधार द्याल. कुटुंब सदस्यांच्या समस्या हळुवारपणे सोडवाल. गळू, उबाळू झाल्यास त्यात पू साठू देऊ नका. सांधेदुखी बाळावेल.

तूळ चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे ओळखीतल्या होतकरू तरुणांना मदत कराल. उत्साहाने समाजकार्य कराल. नोकरी-व्यवसायात कामाचा सपाटा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. सहकारी वर्गाची समयसूचकता कामी येईल. नुकसान टळेल. जोडीदाराच्या स्वभावाचे नवे पैलू अनुभवाल. कामाच्या विचारांनी त्याची होणारी चिडचिड समजून घ्यावी. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल. जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या जोशात विश्रांतीची गरज भासेल.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे सामाजिक भान ठेवून आपल्या कार्यशक्तीचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. प्रगती होईल. सहकारी वर्गाच्या मदतीला धावून जाल. आजारी व्यक्तींची सेवा कराल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्याला योग्य सल्ला द्याल.  ज्येष्ठांना आनंद मिळवून द्याल. उत्सर्जनसंस्थेचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्यात दिरंगाई नको.

धनू गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे कर्तव्याला विशेष प्राधान्य द्याल.  नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून फारशा सहकार्याची अपेक्षा न ठेवता पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. त्याची गरज भासेल. जोडीदार त्याच्या कामात आपल्या गुणांची विशेष चुणूक दाखवेल. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी येतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आधार मोलाचा ठरेल. युरिन इन्फेकशन, मूत्रपिंडाला सूज असे त्रास अंगावर काढू नका.

मकर शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शनीची चिकाटी आणि चंद्राची क्रियाशीलता यांचा सुरेख मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात आर्थिक बाजू हळूहळू बळावेल. वरिष्ठांना चुकीच्या प्रथा निदर्शनास आणून द्याल. सहकारी वर्गाची मंजुरी मिळेल. त्यांच्या अडचणी दूर करताना अनेक संघर्ष पार पाडाल. जोडीदाराच्या संमतीने महत्त्वाचे निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरणात शिस्त आणि प्रेम दोन्ही असावे. खांदे, पाठ, मणका यावर ताण आल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

कुंभ चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे  कला आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालाल. नोकरी-व्यवसायात बुद्धीला चालना आणि आव्हान देणारे प्रसंग लीलया हाताळाल. सहकारी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी व्यवस्थापकांशी बोलणी कराल. जोडीदाराला त्याच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद नक्की मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मित्रमैत्रिणींकडून सहकार्याची अपेक्षा न ठेवणे बरे ! पचन आणि उत्सर्जनाच्या तक्रारी वाढतील. घरगुती उपाय करावेत.

मीन गुरू-शुक्राच्या समसप्तम योगामुळे कलेला ज्ञानाची उत्तम जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या प्रश्नांना, शंकांना शांतपणे आणि धीराने त्याला तोंड द्याल. सहकारी वर्गाला चांगले प्रशिक्षण द्याल. जोडीदाराच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करावा. फक्त वैचारिक पातळीवरून सर्व प्रश्न सुटणार नाहीत. कुटुंब सदस्यांना भावनिक आधारही महत्त्वाचा ठरेल.