14 November 2019

News Flash

नाती जपणारी ‘चिल्लर’!!

आज सकाळी कामावर निघायला उशीर झाला अन् घाईत निघाल्याने खिशात पैसे घेण्याचे विसरून गेलो. उशीर झाल्याने नेहमीची सव्वासातची ट्रेन आज मिस झाली अन् स्टेशनला पोहोचल्यावर

| April 17, 2015 01:13 am

आज सकाळी कामावर निघायला उशीर झाला अन् घाईत निघाल्याने खिशात पैसे घेण्याचे विसरून गेलो. उशीर झाल्याने नेहमीची सव्वासातची ट्रेन आज मिस झाली अन् स्टेशनला पोहोचल्यावर खिशात पैसे न घेतल्याची जाणीव झाली. नशिबाने ट्रेनचा पास माझ्या नेहमीच्या बॅगमध्ये असल्याने तशी जास्त धास्ती नव्हती, परंतु जोगेश्वरी स्टेशनवरून ऑफिसला जाण्यासाठी शेअर रिक्षाचे नऊ रुपये हाती असणे गरजेचे होते. नेहमीची ट्रेन मिस झाल्याने आजूबाजूच्या गर्दीत दहा-वीस रुपये कुणाकडून उसने घेण्यासारखे कुणी हक्काचे नव्हते. मी सहज म्हणून बॅगच्या एका खिशात हात घातला, त्यात काही चिल्लर मला दिसली. मी खिशात हात घालून चिल्लर वर काढली तर त्यात एक पाच रुपयाचे नाणे अन् बाकी एक रुपयाची चिल्लर मला दिसली. पाच रुपयाचे नाणे पाहून मला खूप हायसे वाटले.

जोगेश्वरी स्टेशनला ट्रेनमधून उतरून मी ब्रिजवर चढलो. रिक्षात बसण्यापूर्वी चिल्लर मोजावी म्हणून ब्रिजवर चालता चालता मी ती चिल्लर बॅगमधून बाहेर काढायला गेलो अन् दुर्दैव माझे की पाच रुपयाचे नाणे अन् बाकी दोन-तीन कॉइन्स माझ्या हातातून खाली निसटले. मला काही कळायच्या आत हातातील पाच रुपयाचे नाणे घरंगळत ब्रिजच्या खाली असलेल्या केबिनच्या छतावर जाऊन पडले. दुष्काळात तेरावा महिना जे काही सांगतात तसे माझ्या बाबतीत त्या क्षणाला घडत होते. जोगेश्वरी पूर्वेला स्टेशनजवळ अळट नसल्याने आज पायी जावे लागेल की काय, असे क्षणभर माझ्या मनात आले. मी हातात उरलेले कॉइन मोजू लागलो अन् सुखद धक्का बसला. दोन रुपयांची तीन अन् एक रुपयांची चार नाणी असे एकूण दहा रुपये माझ्या मुठीत होते. मला क्षणभर ‘दुनिया मुठ्ठी में’ वाटू लागले. बॅगच्या खिशात अनेक दिवस अडगळीत पडलेली चिल्लर आज कामी आली होती. ज्या पाच रुपयाच्या नाण्यावर विश्वास ठेवून मी विरारहून निघालो होतो, त्यानेही ऐन वेळेला दगा दिला होता.
आयुष्याचं पण असंच असतं नाही? मोठय़ा नोटांसारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्ठित, वलयांकित माणसे आपल्याला हवीहवीसी वाटतात. त्यांच्या सहवासात आपला उद्धार होईल असे मनोमन वाटते. सुंदर, चकाचक दिसणारी, उंची वस्त्रे परिधान करणारी ही मोठी माणसे संकटात आपल्याकरिता पटकन धावून येतील असे वाटते. दुसऱ्या बाजूने विचार करता पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची माणसे आपल्या आयुष्यात असूनही तशी आपल्या खिजगणतीतही नसतात. आपल्या दृष्टीने ती चिल्लर असल्याने त्यांच्या असण्याची, त्यांच्या जगण्याची आपण योग्य ती दखल घेत नाही, त्यांना पुरेसा वेळ अन् सन्मान देत नाहीत, पण वास्तव काय आहे? अडीअडचणीला कोण धावून येतात? मोठय़ा नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्ठित, वलयांकित माणसे की पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची चिल्लर माणसे? वर नमूद केलेल्या एका घटनेने एक शाश्वत वास्तव पुन्हा अधोरेखित केलं होतं अन् ते म्हणजे नाती अन् मैत्री जोडताना श्रीमंत, प्रतिष्ठित, वलयांकित या ‘दिखाऊ ’ निकषावर न भाळता, नि:स्वार्थीपणे अडीअडचणीला धावून येणारी चिल्लर पण ‘टिकाऊ ’ बिनचेहऱ्याची माणसे आयुष्याच्या एका खिशात जपणे गरजेचे आहे. छोटी असली तरीही तीच खरी नाती जपतात.
सचिन मेंडिस, वसई

First Published on April 17, 2015 1:13 am

Web Title: bloggers katta 14