lp18अटीतटीच्या वेळीही अतिशय शांत चित्ताने नेमकी व्यूहरचना करून विजय खेचून आणणाऱ्या धोनीच्या निवृत्तीनंतर आता आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असलेला विराट कोहली नेतृत्वाचा बॅटन कसा सांभाळतो यावर भारतीय क्रिकेटचे भवितव्य अवलंबून आहे.

‘भाकरी का करपली?’, ‘घोडा का अडला?’, ‘पान का सडले?’ या अकबराच्या प्रश्नांचे बिरबलाने एका वाक्यात उत्तर दिले होते, ‘न फिरवल्याने!’ कसोटी क्रिकेटमधील भारताचे परदेशातील अपयश हे सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बोर्डर-गावसकर मालिकेत पुन्हा प्रत्ययास आले. भारत का हरला? या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी अर्थातच कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीवरच येणार होती. त्याने बिरबलाप्रमाणेच हजरजबाबीपणा दाखवत मालिका संपण्याच्या आतच ‘निवृत्ती’ या एका शब्दात आपले उत्तर दिले. धोनीच्या जागी आता विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या बदलत्या स्थित्यंतरातून जातानाही भारताच्या कसोटी क्रिकेटमधील या मावळत्या आणि उगवत्या कर्णधारांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती बरेच काहीच सांगतात.
भारताला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थानावर घेऊन जाणारा संघनायक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. कालपरवापर्यंत महेंद्रसिंग धोनीचे गुणगान गायले जायचे. त्याच्या यशाचे पोवाडे रचले गेले. जसा हात लावेन तिथे सोने होईल, असे वरदान मिडास राजाला होते. तसेच ७ क्रमांक धारण करणाऱ्या धोनीसोबत यशाची ‘साथ’ होती; धोनीची शांत वृत्ती आणि डोक्यावर बर्फ ठेवून खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे त्याला ‘कॅप्टन कूल’ म्हटले जाऊ लागले. परंतु ‘उद्यापासून नोकरीवर येऊ नकोस, तुझी गरज संपली’ हे ऐकून घेणे हे अतिशय जड असते. धोनीने काळाची पावले ओळखत कुणीतरी आपल्याला निवृत्ती हो, असा सल्ला देण्याच्या आधीच गाशा गुंडाळला. सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूच्या कारकीर्दीतसुद्धा अखेरची तीन वष्रे ही कठीण गेली. प्रसारमाध्यमांनी त्याच्या झगडणाऱ्या कारकीर्दीचे विश्लेषण करून निवृत्तीचा तगादा लावला. आता भारतीय क्रिकेटच्या देव्हाऱ्यात आपण विराट कोहली नावाच्या शीघ्रकोपी दैवताची प्रतिष्ठापना केली आहे. कसोटी क्रिकेटच्या प्रांतात अजून तो पुरता स्थिरावलाही नाही. परंतु रांगत्या पावलांमध्ये भारताला उद्याचे नेतृत्व दिसले आणि त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. आता ‘विराट नामाचा रे टाहो..’ हा जप भारतीय क्रिकेटमध्ये होऊ लागला आहे. ‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी..’ या धर्तीवर धोनी कसोटी क्रिकेटमध्ये आता फक्त एक इतिहास झाला आहे.
क्रिकेटचा शांती दूत!
महेंद्रसिंग धोनी.. माही, एमएस, एमएसडी या टोपणनावांनी ओळखल्या जाणाऱ्या या रांचीच्या राजपुत्राचे आयुष्य एखाद्या परिकथेप्रमाणेच आहे. दोन विश्वविजेतेपदे, कसोटी क्रमवारीतील प्रतिष्ठेचे अव्वल स्थान याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला मिळाले; परंतु ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू ही अपयशाची. परदेशांमधील कसोटी सामन्यांत वारंवार पत्करावे लागणारे पराभव हे पिच्छा सोडत नव्हते. झारखंडसारख्या छोटय़ाशा राज्याला क्रिकेटच्या नकाशावर लोक ओळखू लागले ते धोनीमुळे. धोनीच्या यशोगाथेला प्रारंभ झाला तो २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाने. मग हा सोनेरी प्रवास कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येसुद्धा लक्षवेधी ठरला. २००९ ते २०११ या कालखंडात भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये शिखरावर होते. भारताने २०११मध्ये तब्बल २८ वर्षांची प्रतीक्षा संपवत धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देण्याची किमया साकारली.
गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास भारतीय क्रिकेटला मैदानावर आणि मैदानाबाहेर मोठय़ा आव्हानांना तोंड द्यावे लागले. गेल्या काही वर्षांत ‘फॅब फाइव्ह’ असे बिरुद मिरवणारे अनिल कुंबळे, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर हे भारताच्या कसोटी संघाचे आधारस्तंभ निवृत्त झाले. झहीर खान, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग पुन्हा कसोटी संघात स्थान मिळवतील, अशी सुतराम शक्यता दिसत नाही. या स्थित्यंतरामुळे भारताचा कसोटी संघ नखशिखांत कात टाकतो आहे, तर दुसरीकडे आयपीएलच्या सहाव्या हंगामानंतर स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे भारतीय क्रिकेटला हादरवले आहे. धोनी हा आयपीएल वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा संघनायक, तर इंडिया सीमेंट कंपनीचा उपाध्यक्ष. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीच्या या दोन्ही कंपन्या. आयपीएलप्रकरणी चौकशी करणाऱ्या न्या. मुकुल मुदगल यांच्या समितीनेही भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूचा उल्लेख केला होता. ती व्यक्ती कोण याचा उलगडा अद्याप झाला नसला तरी संशयाची सुई मात्र धोनीकडे आहे. याशिवाय धोनीची हिस्सेदारी असलेल्या ऱ्हिती स्पोर्ट्स या कंपनीसंदर्भातही हितसंबंधांचे आरोप मध्यंतरी धोनीवर झाले होते. प्रसारमाध्यमांनी तर कोहली आणि रवी शास्त्री यांच्या जवळिकीमुळे धोनीने निवृत्तीची वाट धरली, असा क्रिकेटमय त्रिकोणसुद्धा काढला. तूर्तास तरी नेमके कारण काय, याचा छडा लागलेला नाही.
आकडय़ांचा हिशेब केल्यास धोनीने ६० कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आणि यापैकी २७ सामने जिंकत आणि १८ सामन्यांत पराभव पत्करत यशाची टक्केवारी ४५ टक्के राखली; परंतु खरी चिंताजनक स्थिती ही परदेशात आहे. भारताबाहेर धोनीच्या नेतृत्वाखाली फक्त सहा कसोटी सामन्यात विजय, बाकी १५ पराभव आणि नऊ अनिर्णीत सामने धोनीच्या यशस्वी कारकीर्दीला डागाळणारे. धोनीची निवृत्ती ही तशी धक्कादायकच. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून मेलबर्न कसोटीनंतर पत्रकार परिषदेला सामोरा गेल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. सचिन तेंडुलकरप्रमाणे गाजावाजा नाही. निरोपाचे भाषण नाही. प्रश्नोत्तरे नाही. आभार वगैरे काहीच नाही. भारतीय रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून एके काळी काम करत असलेल्या धोनीची ही चित्तरकथा. लोकप्रियता आणि जाहिरात ब्रँडिंगमध्ये धोनीने थेट सचिनशी स्पर्धा केली. आपला आगळा लुक आणि मोक्याच्या क्षणी बदललेल्या केशरचना यांच्या बळावर त्याने क्रिकेटरसिकांच्या हृदयावर राज्य केले.
धोनीच्या वैचारिकतेतून जणू काही संघव्यवस्थापनाचे धडेच मिळायचे. तो म्हणायचा, ‘‘जर आम्ही यश मिळवले किंवा अपयश मिळवले, तर काय घडेल, याचा आम्ही फार विचार करीत नाही; कारण या दोन्ही गोष्टी आमच्या नियंत्रणात नसतात. क्रिकेटमध्ये काय घडेल याचा मी कधीच अंदाज वर्तवू शकणार नाही. आमचा एकमेकांवर भरवसा आहे आणि प्रक्रियेवर विश्वास आहे. आम्ही प्रत्येक सामना योग्य दृष्टिकोनातून पाहतो.’’
धोनीच्या नेतृत्वशैलीची आणि वृत्तीची अनेक उदाहरणे क्रिकेटजगतात आज आख्यायिका झाली आहेत. सौरव गांगुलीच्या कारकीर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नववा फलंदाज बाद झाल्यावर धोनीने गांगुलीच्या आदरार्थ त्याला नेतृत्व करायला सांगितले. याचप्रमाणे जेव्हा त्याला संधी मिळायची, तेव्हा तो आपल्या सहकारी खेळाडूंवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करायचा. जिंकण्याचे दडपण आपल्या खेळाडूंवर लादण्याऐवजी खेळाचा यथेच्छ आनंद लुटा, असा सल्ला द्यायचा. त्याने अनेक व्यासपीठांवर ‘वर्तमानात जगा, भविष्यकाळाची किंवा भूतकाळाची चिंता बाळगू नका’ असे आपले विचार मांडले. त्याच्या नेतृत्वशैलीत सांघिकता, समर्थपणा आणि आत्मविश्वास होता. धोनी संघातील प्रत्येक वरिष्ठ किंवा कनिष्ठ खेळाडूचा lp19योग्य वापर करून त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात तरबेज होता. तो प्रत्येक खेळाडूला सिद्ध करण्याची आणि आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम योगदान देण्याची संधी द्यायचा.
२००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना आठवतो. एका बेभरवशाच्या संघाविरुद्ध गोलंदाजी करायला हरभजन सिंग कचरला; परंतु आकडेवारी फारशी समाधानकारक नसणाऱ्या अननुभवी जोगिंदर शर्माकडे धोनीने अखेरचे षटक टाकायला दिले. धोनीच्या या निर्णयाप्रसंगी भारताने विश्वचषक गमावला, असे बऱ्याच जणांना वाटले. परंतु कर्णधाराचा विश्वास जोगिंदरने १२० टक्के सार्थ ठरवला आणि विश्वचषकावर भारताची मोहर उमटली. याचप्रमाणे इयान बेल धावचीत असतानाही खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत त्याने आपले अपील मागे घेतले होते आणि बेलला जीवदान मिळाले होते.
धोनीने कधीही पराभवाची मीमांसा करताना आपल्याकडे हे नाही, ते नाही, असे स्पष्टीकरण दिले नाही. उपलब्ध व्यक्तींचा त्याने योग्य रीतीने उपयोग केला. कठीण परिस्थितीला आपला संघनायक शांतचित्ताने सामोरे जात आहे, हे संघसहकारी पाहायचे, तेव्हा त्यांची उद्विग्नता नाहीशी व्हायची. गोलंदाजाकडून अंतिम फेरीच्या सामन्यातील अखेरच्या चेंडूला वाइड बॉल टाकला जावो किंवा फलंदाजाकडून महत्त्वाच्या षटकात अनेक चेंडू निर्धाव ठरो, धोनीचा शांतीमार्ग कधीच भंगला नाही.
बंदा ये बिनधास्त है!
कोहलीच्या नेतृत्वक्षमतेची दखल भारतीय क्रिकेटने तशी खूप आधी घेतली आहे. २००८मध्ये त्याने भारताला युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक जिंकून देण्याची किमया साधली होती. २०१०मध्ये तो भारताच्या एकदिवसीय संघात स्थिरावला, तर कसोटी संघात मात्र नेहमी तळ्यात-मळ्यात अशी त्याची स्थिती होती. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि नेतृत्व याची ग्वाही त्याने भारताकडून किंवा आयपीएल खेळताना दिली आहे; परंतु कसोटी क्रिकेटच्या बाबतीत मात्र अध्र्या हळकुंडाने पिवळे झाल्यागत त्याच्यावर फार लवकर विश्वास टाकण्यात आला. सचिन तेंडुलकरचे विक्रम एखादा भारतीय खेळाडूच मोडेल आणि तो कोहलीच असेल, अशा शब्दांत सुनील गावसकरने त्याच्यात भावी सचिन पाहिला, तर २०११च्या इंग्लिश भूमीवरील ‘हॉरर शो’नंतर (०-४ अशी मालिका गमावल्यावर) जेव्हा जेव्हा धोनीच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित केली गेली, तेव्हा तेव्हा कोहलीचाच पर्याय अग्रस्थानी होता.
अॅडलेड कसोटी सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि कर्णधारपद कोहलीकडे सोपवण्यात आले. कोहलीने दोन्ही डावांत शतके झळकावत संघाला विजयपथावर पोहोचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. फक्त ४८ धावांनी ही कसोटी भारताने गमावली. स्वाभाविकपणे त्याच्या क्षमतेकडे भावी नेतृत्व म्हणून पाहिले गेले. पाहता पाहता भारताने मालिका गमावली; परंतु झालेल्या तीन कसोटी सामन्यांत कोहलीची फलंदाजी आणि मायकेल जॉन्सनसहित ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंना तोडीस तोड उत्तर देण्याची भिडस्त वृत्ती सर्वाना भावली. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंडसारख्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध हीच वृत्ती जोपासून खेळावे लागते, त्यामुळे नव्या दमाच्या या नवनायकावर साऱ्यांचाच विश्वास बसला.
कोहलीच्या आक्रमकतेची झलक काही प्रथमच ऑस्ट्रेलियात दिसत नाही. २०११-१२च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हुर्यो करणाऱ्या क्रिकेटरसिकांना त्याने मधले बोट दाखवून वाद निर्माण केला होता. त्यानंतर ‘ट्विटर’वर कोहलीने स्पष्टीकरण दिले होते की, ‘‘जर कुणी तुमच्या आई-बहिणीवरून शिवीगाळ करू लागले, तर तुम्ही ऐकून घ्याल का?’’ क्रिकेटचाहत्यांशी पंगा घेण्याचा प्रकार त्याने आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवरही केला होता. याशिवाय त्याच्याच दिल्लीमधील सहकारी खेळाडू गौतम गंभीरशी मैदानावर हमरीतुमरी करताही त्याने त्याच्या मानाचा मुलाहिजा बाळगला नाही. ब्रिस्बेनच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शिखर धवनने फलंदाजीला उतरण्यास नकार दिल्यामुळे कोहलीला नाइलाजास्तव फलंदाजीला जावे लागले होते. त्याआधी ड्रेसिंग रूममध्ये कोहली आणि धवन यांच्यात चांगलीच जुंपली होती.
कसोटी संघासाठी धोनीचा वारसदार म्हणून कुणीच खेळाडू नाही, ही वस्तुस्थिती आहे. अॅडलेड कसोटी सामन्यात आर. अश्विनऐवजी करण शर्माला संघात स्थान देण्याचा कोहलीचा निर्णय चुकला होता. परंतु त्याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत प्रामाणिकपणे त्याची कबुली दिली. एखाद्या कर्णधाराने थातुरमातुर उत्तर देऊन हा प्रश्न सीमारेषेपार भिरकावला असता. परंतु कठीण प्रसंगात भडक माथ्याचा हा संघनायक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकेल का? आपले खेळाडू चुकले तरी तो त्यांच्या पाठीशी उभा राहील का की त्यांचे वाभाडे काढेल? तो आपल्या निर्णयांची जबाबदारी घेईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत आपल्याला मिळतील.
धोनी व कोहली यांची तुलना
धोनीच्या निवृत्तीनंतर सध्या कोहलीकडे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, परंतु एकंदर परिस्थितीत या पदावर आणखी कुणाचीही दावेदारी नाही. त्यामुळे भारताचा कसोटी कर्णधार कोहली आणि माजी कर्णधार धोनी यांच्यातील नेतृत्वक्षमतेबाबत तुलना होणे स्वाभाविक आहे. धोनी हा शांत वृत्तीचा, तर कोहली आक्रमक हे जसे सर्वश्रुत आहे, तसेच आणखीही काही मुद्दे चर्चेत येणे आवश्यक आहे. धोनी हा यष्टिरक्षक-कर्णधार होता, तर कोहली फलंदाज-कर्णधार आहे. फलंदाज चेंडूला सामोरा जात असताना धोनीला संपूर्ण मैदानावरील परिस्थितीचा अंदाज असायचा. त्यानुसार क्षेत्ररक्षणात बदल करणे आणि गोलंदाजीचा वापर करणे त्याला सोपे जायचे. कोहली हा फलंदाजाच्या नजरेतून सामन्याकडे पाहतो. सामन्यातील परिस्थितीनुसार गोलंदाजांच्या गरजेनुसार क्षेत्ररक्षणाचा वापर करतो. याचप्रमाणे क्रिझवरील फलंदाजाला वेसण घालण्यासाठी कोणती क्लृप्ती वापरता येईल, याचा विचार करतो. परंतु ही तुलना करण्याची खूप घाई होते आहे. कारण कोहलीने काही एकदिवसीय सामन्यांचे आणि एकमेव कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळले आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून तो नवखा आहे. कोहलीने सहा वष्रे भारताचे कसोटी कर्णधारपद सांभाळले आहे. तशी दोघांमध्येही नेतृत्वक्षमता ठासून भरली आहे. फक्त दृष्टिकोन वेगळा आहे.
तात्पर्य
नेतृत्वक्षमता आणि दृष्टिकोन यांची कसोटी लावून कोहलीचे मूल्यमापन करण्यापेक्षा सध्या तरी त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्याची पुरेशी संधी द्यायला हवी. संघसहकाऱ्यांच्या मनात विश्वास आणि आदर तो कसा निर्माण करतो, हे या प्रक्रियेत पाहता येईल. धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार झाला तो नेतृत्वाच्या कौशल्यामुळे किंवा नशिबाने साथ दिल्यामुळे नव्हे, तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्याप्रमाणेच संघातील युवा संघसहकाऱ्यांचाही विश्वास आणि पाठिंबा मिळवल्यामुळे. कोहलीचा दृष्टिकोन जरी स्वतंत्र असला तरी त्याला धोनीचा हा कित्ता गिरवावा लागणार आहे. त्यामुळेच कॅप्टन कूलकडून मिळालेला हा कर्णधारपदाचा बॅटन कॅप्टन हॉट कसा सांभाळतात यावरच भारतीय क्रिकेटचं भवितव्य अवलंबून आहे.
प्रशांत केणी