शिल्पा पटवर्धन – response.lokprabha@expressindia.com

#करोनाशीदोनहात

तर झालं असं की, २१ मार्चपासून आम्ही म्हणजे मी, २४ वर्षांची माझी दोन्ही जुळी मुले सागर- समीर आणि माझे ८७ वर्षांचे वडील  गोपाळ भागवत पूर्णपणे घरात होतो. सोसायटीने भाजी, फळे यांची सोय केलेली असल्याने कुठेही बाहेर पडण्याची गरज नव्हती आणि पती संजयला मात्र बँकेत जावं लागत असल्याने आम्हाला थोडी भीती वाटत होती. अगदी आमच्या समोरच्या घरातही न जाणे आणि गेले तरी कुठल्याही गोष्टीला हात न लावणे हे आम्ही पाळत होतो. सगळं सुरळीत चालू असताना अचानक २६ एप्रिलला संजयला ताप आला. लगेच सोसायटीतील डॉ. अनघा यांचं औषध आणलं. पूर्ण काळजी घेऊनसुद्धा ताप का आला या विचाराने आधी हतबलता आली, मग राग आणि चीडही, पण तीन दिवसांतच त्याचा ताप गेला आणि २९ ला मला ताप आला. मला रोज संध्याकाळी सहा-सव्वासहाला घडय़ाळ लावल्याप्रमाणे ताप येत होता.. ४ मेपर्यंत. पुन्हा संजयला २ मेला ताप आला. आता मात्र डॉक्टरांनी सीबीसी, मलेरिया व काळजी म्हणून कोविड चाचणी करायला सांगितली. भीती वाटली, पण घेतली करून आणि दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कुठेही जागा नसल्याने वाट बघून तो ३० तासांनी  म्हणजे ५ मे रोजी रहेजा हॉस्पिटलमध्ये  दाखल झाला.

तो पॉझिटिव्ह आल्याने आमचीही घाईने टेस्ट करावी लागली. रुपारेलमध्ये थॉयरोकेअरच्या कॅम्पमध्ये पाच तास प्रतीक्षा करत टेस्टचं दिव्य पार केलं. ताप, सर्दी, खोकला काही नसल्याने रिपोर्ट निगेटिव्ह येईल असं वाटत होतं, पण दुर्दैव. आमचे सगळ्यांचे रिपोर्ट दोन दिवसांनी म्हणजे ८ मे रोजी पॉझिटिव्ह आले. तोपर्यंत बाबांना ताप आला होता. वेडय़ासारखं वागत होते. खाणंपिणं बंद केलं. थरथरायला लागले. लक्षणं नसली तरी आम्ही सगळे पॉझिटिव्ह होतो आणि संजय हॉस्पिटलमध्ये. संदीप देशपांडे यांच्या मदतीने रातोरात सेव्हन हिल्समध्ये अ‍ॅडमिट झालो. वाटलं आता हॉस्पिटलमध्ये आलो, आता सगळं चांगलं होईल; पण छे. आम्हाला बेड मिळायला पहाटेचे ५ वाजले. तेसुद्धा एका झोपलेल्या माणसाला उठवून बाबा आणि सागरला एका ठिकाणी जागा दिली आणि मला एका ठिकाणी. खरं तर बुकिंगपासून आम्ही सांगत होतो, आम्हाला एकत्र ठेवा. त्यातलं काही होईना. बाबा तर अजूनच वेडय़ासारखं करायला लागले, हातपाय आपटायला लागले, उभे राहून तिथेच लघवी करायला लागले आणि मग मात्र सागर आणि मी गोंधळलो. काय करायचं काहीच सुचत नव्हतं. प्रायव्हेटमध्ये कुठेच जागा नव्हती. ते ‘हेल्प डेस्क’वरचे म्हणायला लागले, चार-पाच तास थांबा, आम्ही अ‍ॅडजस्ट करून देतो, पण तेही होईना. त्यात आमच्या वॉर्डच्याच एका माणसाने आत्महत्या केली आणि आमची पुरती वाट लागली. यातच ९ मेचा दिवस सरला.

१० मे पुन्हा नवीन आव्हाने घेऊन उभा होता. बाबांचं अस्थिर असणं सुरूच होतं. खूप वैतागलो होतो. बरं ज्यासाठी हॉस्पिटलमध्ये घाईने आलो ते उपचार होतच नव्हते. कारण बाबांचा ताप उतरला होता आणि त्यांना जे काही होत होते ते मानसिक विकारामुळे ज्याचा कोविडशी काहीही संबंध नव्हता. तोपर्यंत जे काही होईल ते होवो, पण जिथे मदतनीस मिळेल अशा ठिकाणीच बाबांना ठेवलं तर आम्ही लवकर बाहेर पडू आणि त्यांना लवकर बरं वाटेल अशी मनाची तयारी झाली.

सगळ्या वरिष्ठ पातळीवरील ओळखींचा वापर करूनही काही होईना. शेवटी मनाची तयारी केली की, इथेच राहायचं आहे आता १४ दिवस. ओळखींमुळे बाबांना एक रिलॅक्सेशनसाठी गोळी मिळाली आणि बाबा थोडे सावरले आणि आम्हीही दोघं थोडे शांत झालो. कोविडची परत टेस्ट केली. हळूहळू सावरून घेतले.

त्यात आनंदाची गोष्ट कळली म्हणजे संजयचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याला रात्री १० वाजता डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे आम्ही थोडे अजून निवांत झालो. सोसायटीमधील शेजारी आनंदाने नाश्ता, जेवण पुरवत होते म्हणून संजय आणि समीरची काळजी नव्हती. आम्हाला काही स्तोत्रं ऐकायला सांगितली. फोन करून, मेसेज करून सकारात्मक गोष्टींकडे मन वळवायचा प्रयत्न करत होते.

म्हटलं तर नंतरच्या काळात हॉस्पिटलमध्ये सोय चांगली होती. प्रत्येकाला स्वतंत्र बेड, दोन वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण, सतत गरम पाणी सगळं मिळत होतं. जो स्टाफ राऊंड घेण्यासाठी यायचा तो खूप छान बोलत होता. प्रेमाने चौकशी करत होते, पण आपल्या लोकांना सुविधा कशा वापरायच्या ते कळत नाही. एवढं चांगलं मिळूनसुद्धा टॉयलेट, बाथरूम साफ ठेवता येत नव्हतं. त्या सगळ्याचा कंटाळा आला.

आम्ही ज्या मजल्यावर होतो तिथल्या अंदाजे १२० जणांपकी ३ जणांना ऑक्सिजनची गरज होती. बाकी जवळ जवळ ८० जण बाधित होते. अगदी दहा-बारा जण थोडे खोकत होते. बाकी काही नाही आणि अचानक हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून फोन आला- तुमच्या घरात संडास-बाथरूम आहे का? किती बेडरूमचा फ्लॅट आहे? तर मी सांगितलं, दोन बेडरूम आहेत, दोन टॉयलेट्स आहेत. मग ते म्हणाले, तुम्ही तुमची घरी सोय करू शकता का? म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना आम्ही हॉस्पिटलमध्ये आणू शकू. आत्ताच्या नवीन नियमानुसार आम्ही देऊ का डिस्चार्ज? मग पुन्हा डॉ. अनघाताईंचा सल्ला घेतला आणि म्हणाले, द्या डिस्चार्ज. आणि मग आम्ही घरी आलो. कारण ट्रिटमेंट खूप काही  अशी नव्हतीच. एचसीक्यू टॅबलेट्स,  मल्टिव्हिटॅमिन टॅबलेट्स, सी व्हिटॅमिन टॅबलेट्स, पॅन४० एवढंच. एवढं घरी राहूनपण करू शकत होतो. एचसीक्यू टॅबलेटचा मात्र थोडा त्रास होतो. पोट थोडे बिघडल्यासारखे झाले, घसा खवखवणे वाढले आहे, पण ती गोळी पाचच दिवस घ्यायची आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. लवकर बरं वाटेलच. पुढचे चौदा दिवस होम क्वारंटाइन राहायचं आहे. पुन्हा निगेटिव्ह टेस्ट लवकर येवोत आणि या कोविड-१९ मधून आम्ही पूर्णपणे बाहेर पडू, अशी प्रार्थना.

तेव्हा कोविड-१९ ला घाबरू नका. गरम पाणी, लिंबूपाणी, सुंठ पावडर, काढा यांचा मारा ठेवा. बातम्या बघून घाबरून जाऊ नका. हात धुवा. घाबरून जाऊ नका. साधं सात्त्विक जेवण जेवा. काळजी घ्या, करू नका.

(छायाचित्रे प्रातिनिधिक)