टीम लोकप्रभा – response.lokprabha@expressindia.com

पंतप्रधानांनी तौक्ते चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची हवाई पाहणी करून गुजरातसह इतर ठिकाणच्या चक्रीवादळग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. ती सगळी प्रक्रिया यथासांग होईलच, पण सरकारी मदतीचा आजवरचा कुणाचाच अनुभव फारसा समाधानकारक नाही. प्रसारमाध्यमांमध्ये ते दोन तीन दिवस बातम्या येऊन जातात. सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. पण स्थानिकांची खरी कसोटी त्यानंतरच असते.

नारळ, आंबा, सुपारी, फणस, काजू आणि भात या कोकणातल्या महत्त्वाच्या उत्पादनांना तौक्ते वादळाने अक्षरश: झोडपलं आहे. त्यातही भातासारखं पीक दरवर्षी घेता येतं. पण नारळ, आंबा, काजू यांची झाडं वाडवडिलांनी लावलेली असतात, तेव्हा त्यांची १५-१५ वर्षांनी फळं मिळतात. गेल्या वर्षी निसर्ग आणि या वर्षी तौक्ते वादळाने कोकणवासीयांचे हे पूर्वसंचित अक्षरश: ओरबाडून फेकून दिले आहे. त्याशिवाय घरं, रस्ते या सगळ्यांचं नुकसान वेगळंच.

निसर्गसंपन्न कोकणाची या चक्रीवादळात काय अवस्था झाली आहे याचा आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी पाठवलेला ‘आँखो देखा हाल’ या परिसराच्या नुकसानीचा अंदाज देणारा आहे.

सिंधुदुर्ग : शेती आणि वीज वितरणाला तडाखा

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वेंगुर्ले, मालवण आणि देवगड हे तीन तालुके किनारपट्टी भागात, तर दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली तसेच वैभववाडी तालुके सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्य़ाच्या किनारपट्टीसह या आठही तालुक्यांना तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच घरांवर झाडे पडणे, छप्पर उडणे असे प्रकार झाले. शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांचे या वादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासन पातळीवर नुकसानीची मोजदाद सुरू आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला बसला आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचे या वादळात फार मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या वादळात जिल्ह्य़ातील मच्छीमार आंबा व काजू बागायतदार तसेच अन्य फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगून ते म्हणाले की, कृषी, महसूल या विभागांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्य़ातील शाळा, कॉलेजच्या इमारतीचे नुकसान झाले असेल तर त्यांचेही पंचनामे करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने जिल्ह्य़ातील बहुतांश विजेचे खांब पडल्यामुळे विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह दूरध्वनी आणि मोबाइल सेवा ठप्प झाल्या आहेत. विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक वसाहती तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांमधील तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या विद्युत पंपाचा पुरवठा खंडित असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्यभरातून १३० जणांची १३ पथके जिल्ह्य़ासाठी पाठविण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील ४० रस्त्यांवर झाडे पडली होती. हे रस्तेही आता वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील ८४ रस्ते झाडे पडल्यामुळे वाहतुकीस बंद झाले होते. त्यापैकी ६९ रस्त्यांवरील वाहतुक सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

शेती बागायतीचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्य़ातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. १७२ गावांमधील एक हजार ५९ शेतकऱ्यांच्या एकूण तीन हजार ३७५ पूर्णाक १६ हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात सर्वात जास्त बागांचे नुकसान देवगड तालुक्यात झाले असून त्यानंतर मालवण तालुक्यास फटका बसला आहे, तर सर्वात कमी बागांचे नुकसान वैभववाडी तालुक्यात झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागांचे झाले असून केळीच्या बागांचे नुकसान सर्वात कमी आहे. मालवण तालुक्यात काजू, नारळ, सुपारी, कोकमच्या बागांना सर्वात जास्त फटका बसला असून आंब्याचे सर्वात जास्त नुकसान हे देवगड तालुक्यात झाले आहे, तर केळीच्या सर्वात जास्त नुकसानीची नोंद दोडामार्ग तालुक्यात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून संबंधित नुकसानीच्या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

५५० जाळी गेली वाहून

जिल्ह्य़ात एकूण ५५० मच्छीमार जाळी वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज मत्स्य व्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ३३ लहान नौका आणि चार मोठय़ा नौकांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात ३०० मच्छीमार जाळी वाहून गेली आहेत. १५ लहान नौकांचे नुकसान झाले आहे, तर वेंगुर्ला तालुक्यात १५० जाळी वाहून गेली असून १२ लहान नौकांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात १०० जाळी वाहून गेली असून सहा लहान नौका आणि चार मोठय़ा बोटींचे नुकसान झाल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे.

दोघांना वाचविले

तौक्ते वादळामध्ये कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह गोवा तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे ३८ समुद्री मैलांवर असलेल्या वेंगुर्ला निवती रॉक दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. या दीपगृहाचेही चक्रीवादळात मोठे नुकसान झाले आहे. कोस्ट गार्ड एअर स्टेशन दमण येथून निघालेल्या कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर चेतकने सातपाटी जीएएल कन्स्ट्रक्टरच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या सर्व १३८ कर्मचाऱ्यांची सुटका केली.

– अभिमन्यू लोंढे

रत्नागिरी : फटका ‘कोकणच्या राजा’ला

एकीकडे साहसाला आव्हान देणारे सह्यद्रीचे उंच डोंगरकडे आणि दुसऱ्या बाजूला अथांग, अस्पर्शित सागर किनारे, यांच्या बेचक्यात पसरलेली, जेमतेम ४५ किलोमीटर रुंदीची चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण! जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक पातळीवरील संवेदनशील प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाट क्षेत्राचा ही पट्टी अविभाज्य भाग आहे आणि महाराष्ट्राच्याही नैसर्गिक विविधतेचा आकर्षण बिंदू आहे. एरवी नितांत रमणीय वाटणारा हा प्रदेश, निसर्गाचा कोप होतो तेव्हा पूर्णपणे बदलून जातो. निसर्गाच्या अशाच रौद्र रूपाचा अनुभव गेल्या आठवडय़ात या प्रदेशाने ‘तौक्ते’ या चक्रीवादळाच्या रूपानं घेतला. तसं वादळ काही तासांचंच होतं. पण त्याचा फटका बसलेल्या कुटुंबांना त्यातून सावरायला, पुन्हा पूर्वीचं स्थैर्य मिळवायला काही र्वष जावी लागणार आहेत.

२००९ च्या नोव्हेंबर महिन्यात आलेलं ‘फयान’ किंवा गेल्या वर्षी जूनमधील ‘निसर्ग’सारखं हे वादळ इथल्या किनारपट्टीवर आदळलं नाही, तर किनाऱ्यापासून सुमारे २०० ते २५० किलोमीटरवर अंतरावरून समुद्रातून मुंबई-गुजरातच्या दिशेने सरकलं. त्यामुळे ‘निसर्ग’ इतका दणका बसणार नाही, अशी अटकळ होती आणि ती बऱ्याच प्रमाणात खरीही ठरली. पण या वादळासोबत आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांनी किनारपट्टीच्या आत सुमारे पाच ते दहा किलोमीटपर्यंत मुसंडी मारत वादळाच्या तीव्रतेची चुणूक दाखवून दिली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यतील नऊपैकी खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या सात तालुक्यांमध्ये घरा-गोठय़ांसह महावितरण, सार्वजनिक मालमत्ता आणि बागायतीचं नुकसान झालं आहे.

आंब्याच्या बागांचं नुकसान दोन प्रकारचं आहे. या वादळासह आलेल्या, ताशी सुमारे ४० ते ५० किलोमीटर वेगाने वर्तुळाकार फिरणाऱ्या वाऱ्यांनी बागांमधील बहुतेक झाडे उभी चिरली जाऊन मोडली. पण यापेक्षाही यंदाच्या हंगामापुरतं झालेलं आर्थिक नुकसान जास्त आहे. म्हणजे, झाडे मोडण्यापेक्षा त्याची फळं गळून पडल्याने नुकसानीची तीव्रता अधिक आहे.

यंदा वातावरणातील बदलांमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन फारसे आलेच नाही. मोहोर उशिरा आल्याने १५ ते ३१ मे या शेवटच्या टप्प्यातील आंबा जास्त प्रमाणात तयार होत होता. या दणक्यामुळे कैरीपासून ते काढणीयोग्य आंब्यापर्यंतची सर्वच टप्प्यातील फळे खाली पडली. शिवाय, हा आंबा पडून आपटल्यामुळे कॅनिंगलासुद्धा घेतला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर यंदा आंब्याचे एकूण उत्पादन कमी असणं ही इष्टापत्तीच ठरली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यत सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. त्यापैकी सुमारे ७०-८० टक्के क्षेत्रावर आंब्याची लागवड आहे. त्यामध्ये व्यापारीदृष्टय़ा उत्पन्नाचे क्षेत्र कमी आहे. त्यातच यंदा आंब्याचे एकूण उत्पादन सरासरीच्या ३० ते ४० टक्केच राहिले आणि यापैकीही अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील आंबा बागांना वादळाचा मोठा फटका बसला आहे.

तसं पाहिलं तर अशी वादळं हा कोणत्याही सागरी प्रदेशाच्या दृष्टीने नियमित नैसर्गिक प्रक्रिया असते. त्या प्रदेशाच्या जीवनरहाटीचा जणू तो अपरिहार्य भाग असतो. आपल्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर याचा अनुभव नेहमीच येतो. गेल्या काही वर्षांंपूर्वीपर्यंत पश्चिम किनारपट्टी, विशेषत: कोकण प्रदेशाला मात्र त्याचा इतक्या सातत्याने उपद्रव होत नव्हता. पण २००९ मध्ये झालेलं ‘फयान’, गेल्या वर्षी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर, २-३ जून रोजीचं ‘निसर्ग’ आणि यंदा त्यापेक्षा सुमारे दोन आठवडे आधी, मान्सूनपूर्व वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर आलेल्या ‘तौक्ते’ने वातावरणातील बदल अधोरेखित केला आहे.

विशेषत:, लागोपाठ दोन वर्षे, ऐन हंगामात आलेल्या या चक्रीवादळांनी कोकणही ‘वादळप्रवण’ प्रदेश असल्याची जाणीव स्पष्टपणे करून दिली आहे. त्याची गंभीर नोंद घेत येथील किनारपट्टीच्या भागातील रहिवासी आणि आंबा किंवा नारळ-सुपारीच्या बागायतदारांनी आपल्या घरांची रचना आणि बागांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

– सतीश कामत

रायगड : चक्रीवादळाच्या दुष्टचक्रात

आधी निसर्ग आणि आता तौक्ते अशा दोन चक्रीवादळांचा वर्षभरात रायगड जिल्ह्यला तडाखा बसला. एका धक्कय़ातून सावरण्याआधीच दुसऱ्या तडाख्यामुळे जीवित हानीबरोबरच वित्तहानीही मोठय़ा प्रमाणात झाली. त्यामुळे आगामी काळात चक्रीवादळाचे धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे.

ताशी १०० किलोमीटर वेगाने आलेल्या या वादळाने जिल्ह्य़ाची मोठय़ा प्रमाणात वाताहत केली. अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यांना वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. वादळात चार जणांचा मृत्यू झाला. सात जण जखमी झाले. १० घरे पूर्णत: पडली, तर सहा हजार २६ घरांचे अंशत: नुकसान झाले. वादळामुळे जिल्ह्यतील एक हजार २९९ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. १६८ उच्चदाब वाहिनीचे विद्युत खांब, ४२६ लघुदाब वाहिन्यांचे खांब वादळात धारातीर्थी पडले, १२ रोहित्रांचेही वादळात नुकसान झाले. महावितरणच्या वतीने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले, मात्र अद्यापही ६६१ गावांचा वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. या गावातील जवळपास दीड लाख ग्राहक अजूनही अंधारात आहेत. पुढील तीन ते चार दिवसात हा वीज पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यतील बागायतींना बसला आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यत साधारणपणे पाच हजार हेक्टरवरील बागायतींचे नुकसान झाले आहे. उन्हाळी भातपिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १५० मासेमारी बोटींचे तर १२५ मच्छीमारांच्या जाळ्यांचे वादळात नुकसान झाले आहे. २७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जवळपास २०० शाळांचेही नुकसान झाले. वादळाची पूर्वसूचना वेळेत मिळाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना काहीसा कालावधी मिळाला.

वादळाचा तडाखा चार तालुक्यातील किनारपट्टीवरील ६० गावांना प्रामुख्याने बसेल असा अंदाज होता. त्याचबरोबर खाडी किनाऱ्यावरील १२५ गावांनाही वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन या गावांमधील कच्च्या घरात राहणाऱ्या सर्वांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आवश्यक होते. २४ तासात तब्बल आठ हजार ३८३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण, महाड, रोहा तालुक्यातील दोन हजार २६३ कुटुंबाचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी उपयुक्त ठरली.

जिल्ह्यत जवळपास दहा हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. वादळामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व रुग्णालयात जनरेटरद्वारे पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. प्राणवायूची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक रुग्णालयात दोन दिवस पुरेल इतका प्राणवायू उपलब्ध करून देण्यात आला होता. सर्व रुग्णालयात महावितरणची पथके तैनात ठेवण्यात आली होती.

जिल्ह्य़ातील तीन प्राणवायू निर्मिती प्रकल्प आहेत. ज्यातून ६५० मेगा वॅट प्राणवायू दररोज तयार केला जातो, जो राज्यात सर्वत्र पुरविला जातो. त्यामुळे या तीनही प्रकल्पांना आपत्तीच्या काळात सुरळीत ठेवणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र प्रकल्पांना सुरू असलेला वीज पुरवठा निरंतर सुरू ठेवणेही गरजेचे होते. वादळी वाऱ्यांमुळे प्रकल्पांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली. यामुळे या आपत्तीच्या काळातरही तीनही प्रकल्प सुरळीत सुरू राहिले.

वादळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी स्वत: रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते. संचार यंत्रणा कोलमडण्याची शक्यता लक्षात घेऊन बिनतारी संदेश वहन यंत्रणा, हॅम रेडिओसारख्या यंत्रणाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यतील सर्व मच्छीमार नौकांना तातडीने किनारपट्टीवर बोलविण्यात आले होते. या उपाययोजनामुळे जीवित हानी रोखण्यात बरेच यश आले.

कोकणाने आजवर अनेक वादळे पचवली आहे. मात्र निसर्ग आणि तौक्तेसारखी विनाशकारी वादळं आजवर झालेली नाहीत. त्यातून बोध घेऊन वादळाचे धोके कमी करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आता क्रमप्राप्त आहे.

– हर्षद कशाळकर

मुंबई : अस्मानी संकटाची झलक

अरबी समुद्रात वादळे तयार झाली तरी ती फारशी मुंबईत धडकत नाहीत, असे इतिहासातील दाखले दर्शवतात. गेल्या वर्षी कोकणाची धूळधाण उडवणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळही मुंबईपर्यंत पोहोचण्यापूर्वी शमले. यावेळी कर्नाटकपासून गुजरातपर्यंत प्रवास करणाऱ्या तौक्ते वादळाने मुंबईच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष न धडकताही मुंबईला तडाखा दिला.  वादळाची भीषणता अनेक वर्षांनंतर मुंबईने अनुभवली. करोना आणि वादळ या दोन्हीमुळे मुंबईकरांनी सोमवारी घरी बसणेच पसंत केले. त्यामुळे मोठी हानी आणि गोंधळ टळला. मात्र, देशातील आर्थिक उलाढालींचे केंद्र असलेली मुंबई अजूनही तीव्र स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

मुंबईचा १७ मेचा दिवस उजाडला तोच कुंद वादळी हवा, सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसासह. या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये २४ तासांत सरासरी २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईतील काही भागांत अगदी २५० मिमी पाऊस झाला. आतापर्यंतच्या मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. त्या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौक्तेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला.

तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून पश्चिमेकडे म्हणजे समुद्रात सरकेल आणि गुजरातकडे जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, १७ मे रोजी दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या किनारपट्टीपासून समुद्रात १२० किमी अंतरावर होते. वादळ पुढे सरकण्याचा वेग हा साधारण ताशी १५ किमी असल्यामुळे उशिरापर्यंत मुंबईत भागात वादळाचा परिणाम जाणवला. मुंबईत सरासरी १०८ किमी ताशी या वेगाने वारे वाहात होते. कुलाबा येथील अफगाण चर्च परिसरात दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग १११ किमी ताशी असा नोंदवला गेला. त्यानंतरही वादळाची तीव्रता वाढतच गेली आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथे ताशी ११४ किमी वेगाची नोंद झाली. गेल्या वर्षी निसर्ग वादळ अलिबागला धडकले तेव्हा तेथील वाऱ्यांचा वेग हा सरासरी १२० किमी ताशी नोंदला गेला होता. यावरून या वादळाची तीव्रता आणि मुंबईची परिस्थिती लक्षात यावी.

मोठे नुकसान टळले, तरीही…

मुंबईत अपवादात्मक एखादी घटना वगळता जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी भिंती कोसळल्या, तर अनेक ठिकाणी छताचे पत्रे उडाले. मुंबईत साधारण अडीच हजार वृक्ष किंवा मोठय़ा फांद्या पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. काही ठिकाणी वीजप्रवाहही खंडित झाला होता. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर फांद्या पडल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक बंद झाली. रस्त्यांवरही अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले.  वादळाच्या शक्यतेमुळे करोना उपचार केंद्रांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी हानी टाळली.

वादळाने धडा दिला…

अद्यापही पाणी तुंबण्यासारख्या पावसाळ्यातील मूलभूत समस्यांवरही मुंबईला उत्तर सापडले नसल्याचे पुन्हा एकदा दिसले. २६ जुलैचा पूर, दोन वर्षांपूर्वी आलेला पूर, गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळ, त्यानंतर ऑगस्टमध्ये समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे झालेली अतिवृष्टी अशा अनेक अनुभवांनंतर तरी व्यवस्थेने बोध घ्यायला हवा. दरवर्षी पावसाचा दणका मिळाल्यानंतर पुढील वर्षी परिस्थिती सुधारण्याच्या मोठमोठय़ा घोषणा होतात. मुंबईकर आशेने डोळे लावून बसतात आणि पुढील पाऊस, वादळात प्रशासन, नेत्यांच्या नावाने बोटे मोडत चिखल, पाणी तुडवत, जीव मुठीत घेऊन घर गाठतात. आरोप-प्रत्यारोप, एखाद्या प्रकल्पाच्या कागदोपत्री आराखडय़ानंतर चालणाऱ्या श्रेयवादाच्या लढाया यापलीकडे जाऊन मुंबईचा विचार अधिक वेळ न दवडता होणे आवश्यक आहे. समुद्रात १२० किलोमीटर अंतरावरील वादळाने दाखवलेला इंगा हा आताच गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. किनारपट्टीवरील मुंबईचा वाढता विस्तार आटोक्यात आणणे पूर्णपणे शक्य नसले तरी शहराच्या नियोजनाकडे पाहताना नागरी समस्या निर्मूलनाबरोबरच निसर्गाच्या इशाऱ्यांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हवामानाचा अचूक अंदाज हा कोणत्याही मोठय़ा, दाटीवाटीच्या शहरासाठी महत्त्वाची बाब. ज्यावेळी अचूक अंदाज मिळणे आवश्यक असते, त्याचवेळी मुंबईतील रडार ठप्प असतात याचा दाखला गेल्या वर्षी आणि यंदाही मिळाला.

आतापर्यंतची वादळे

अरबी समुद्रातील वादळे ही केरळ किंवा कर्नाटकजवळ तयार होतात. त्यानंतर बहुतेक वेळा ती ओमान किंवा गुजरातच्या दिशेने सरकल्याचा इतिहास आहे. मुंबईत यापूर्वी १३८ वर्षांपूर्वी म्हणजे १८८२ मध्ये मोठे चक्रीवादळ झाले होते. त्यानंतरही आलेल्या बहुतेक वादळांचा मोठा फटका मुंबईला बसला नाही.  २००९ मध्ये आलेल्या फयान चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम झाला. मात्र तेही मुंबईजवळून सरकले होते. २०१७ मधील ओखीची तीव्रता समुद्रातच कमी झाली होती. गेल्या वर्षीच्या निसर्ग  वादळाचीही मुंबईला विशेष तीव्रता जाणवली नाही.

– रसिका मुळ्ये

ठाणे : भरून न निघणारे नुकसान

मुंबईपासून तासाभरावर असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात ‘तौक्ते’ने हाहाकार माजवला. करोनाच्या काळात रोजगार नाहीत, त्यात वादळी पावसाची नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने मित्र-नातेवाईकांकडून पैसे जमवून घरे दुरुस्ती करण्याची अनेकांवर वेळ आली. काही भागांत ४८ तास उलटूनही वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत झाला नव्हता. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने मुंब्रा, दिवासारख्या भागांत नद्यांप्रमाणे नाले ओसंडून वाहात होते. अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले. ठाण्यात अनेक महागडय़ा वाहनांचा वृक्ष कोसळून चुराडा झाला. ग्रामीण भागांत वादळामुळे फळबागांचे नुकसान झाले. अवघ्या २४ तासांच्या या वादळी पावसाने जिल्ह्य़ातील जनजीवन विस्कळीत केले आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा प्रकोप इतका होता की, जिल्ह्य़ात २४ तासांमध्ये ९४३ झाडे उन्मळून पडली. ५५९ घरांचे किरकोळ नुकसान झाले, तर सात घरांचे मोठे नुकसान झाले. असेच नुकसान नवी मुंबईतील दिघा येथे राहाणाऱ्या आदिनाथ शिंदे यांच्या घराचे झाले. वर्षभरापूर्वी त्यांनी घर बांधले होते. रविवारी रात्री ते कुटुंबासह झोपलेले असतानाही सोमवारी पहाटे अचानक त्यांच्या घरांचे छप्परच उडून गेले. घराच्या भिंतींना तडे गेले. घरातील वस्तू, पैसे भिजू नये म्हणून मिळेल त्या पद्धतीने त्याचे रक्षण करत होते. करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आदिनाथ यांना मित्रांकडून पैसे घेऊन घराचे पुन्हा काम करण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ तालुक्यात १७ कुटुंबांचे निवारेच या वादळाने हिरावून घेतले. त्यामुळे या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने आता इतरत्र हलविले आहे. जिल्ह्य़ात विद्युतपुरवठाही मोठय़ा प्रमाणात खंडित झाला होता. अनेक भागांत वृक्ष महावितरणच्या विजेच्या तारांवर पडले होते. सोमवारी सकाळपासून खंडित झालेला विद्युतपुरवठा ४८ तास उलटूनही पूर्णपणे सुरळीत झाला नव्हता. अंबरनाथ आणि बदलापूर येथे १२० विजेच्या खांबांची पडझड झाली, तर १५ रोहित्रे निकामी झाली. उल्हासनगर शहराला वीजपुरवठा करणाऱ्या आणि अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या टाटा वीज प्रकल्पाचा मोठा टॉवर अंबरनाथमध्ये सोमवारी कोसळला. स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे शहराला पाणीपुरवठा होता. येथीही विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ठाणे शहरात पाणीपुरवठय़ाविना नागरिकांचे हाल झाले होते. घोडबंदर येथील अनेक उच्चभ्रू संकुलांमध्ये पाण्याविना नागरिकांना दिवस काढावा लागला.

या वादळाने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे केले. जिल्ह्य़ातील १८६ हेक्टर क्षेत्रांतील आंबा, चिकू, काजू आणि केळीच्या झाडांचे मोठे नुकसान झाले. अंबरनाथ तालुक्यात ४१ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या तालुक्यातील १३१.४५ हेक्टर क्षेत्राला वादळाचा तडाखा बसला आहे, तर कल्याण तालुक्यातील २९.७० हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ मुरबाड तालुक्यातील १५ गावांना वादळाचा फटका बसला असून २५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना त्याची झळ बसली आहे. मुरबाड तालुक्यातील खुटल येथील रोपवाटिकेतील आंबा, शेवगा, साग, काजू, सीताफळ, जांभूळ, पपई यांची तब्बल तीन हजार २०० रोपे आणि कलमांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. तर भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा तालुक्यातील रोपवाटिकेतील चार हजार ४५० रोपे आणि कलमांचे नुकसान झाले आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर र्निबधांमुळे जिल्ह्य़ातील विविध भागांतून आंबा इतर शहरांत पाठविण्यात अडचणी येत आहे. त्यात या पावसामुळे आंबे खराब होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. काही शेतकऱ्यांनी त्यांचे आंबे अल्प दरात विकण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्य़ातील इतर भागांतही अशाच प्रकारे नागरिकांचे नुकसान झाले आहे. दोन दिवस उलटूनही अनेक भागांत रस्त्याकडेला वृक्ष पडलेले दिसत आहेत. विद्युतपुरवठय़ाअभावी कामे ठप्प आहेत. हे नुकसान भरून न निघणारे असल्याने नागरिक आता शासनाच्या मदतीची वाट पाहात आहेत.

– किशोर कोकणे

पालघर : कृषी क्षेत्राला सर्वाधिक झळ

यापूर्वी अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळांचा पालघर जिल्ह्यला थेट फटका बसला नव्हता. तौक्ते चक्रीवादळात मात्र पालघर जिल्हा हा वादळाच्या तडाख्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर असला तरी जिल्ह्यला या वादळाची मोठय़ा प्रमाणात झळ पोहोचली. या वादळामध्ये तीन नागरिकांना प्राण गमवावे लागले असून कृषी क्षेत्राचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळ प्रत्यक्ष दाखल होण्यापूर्वी म्हणजे १६ मे रोजी सायंकाळपासून जोरदार वारे वाहू लागले. १७ मे दुपारपासून १८ मेच्या दुपापर्यंत विशेषत: पालघर, डहाणू, वसई, तलासरी आणि वाडा या तालुक्यांना जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. तर पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यात २४ तासांत २०० ते ५०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

चक्रीवादळामुळे वसई तालुक्यातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून दुरुस्तीच्या कामात असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांचा देखील अपघाती मृत्यू झाला. याखेरीज शेकडो घरांच्या छपरांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांचे, इमारतींचे वादळात नुकसान झाले. ताशी १०० ते १२० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हजारोंच्या संख्येने झाडे मोडून पडली. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतुकीसाठी तयार केलेले पर्यायी मार्ग मुसळधार पावसात वाहून गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. उमरोळी उपनगरीय रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सव्वा तास ठप्प झाली होती.

जिल्ह्यतील उन्हाळी भात कापणीला आला होता. कापणी झालेल्या तसेच शेतात उभ्या पिकाची या वादळात नासाडी झाली. डहाणू तसेच पालघर तालुक्यात होणारे मिरची, भोपळी मिरची आणि इतर भाजीपाला उत्पादन बाधीत झाले. भाजीपाल्याचे मांडव, शेडनेट कमानी, कुक्कुटपालन शेड यांची मोठय़ा प्रमाणात मोडतोड झाली. आंबा, चिकू, जांभुळ तसेच केळीचे सुमारे ११ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र या वादळी वातावरणामुळे प्रभावित झाले. आंबा आणि चिकू या दोन फळांचे प्रत्येकी तीन हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता असून कृषी क्षेत्रातील नुकसान काही कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या मिठागरांच्या उत्पादनाचा हा महत्त्वाचा हंगाम असतो. तशात साठवलेल्या मिठाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यत असणाऱ्या ५०० पेक्षा अधिक वीटभट्टय़ांमध्ये तयार होत असलेल्या, तसेच मातीच्या कच्च्या विटांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असताना मासेमारीसाठी गेलेल्या ५५० बोटींना माघारी यावे लागले. त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला.

वादळामुळे प्रभावित झालेल्या तीन तालुक्यांमध्ये औद्योगिकीकरण मोठय़ा प्रमाणात असून वीजपुरवठा ४८ ते ६० तास खंडित राहिल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. या भागात नोकरदार वर्ग लक्षणीय प्रमाणात असून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नागरिकांना तीन दिवस वीज, पाणी तसेच इंटरनेट सुविधेपासून वंचित रहावे लागले. जिल्ह्यतील ग्रामीण भाग देखील सरासरी ६० तास अंधारात राहिल्याने विविध ठिकाणचा संपर्क तुटला होता. महावितरणने दुरुस्तीसाठी आणलेल्या कंत्राटी कामगारांच्या घरांची चक्रीवादळात नासधूस झाली. त्यामुळे वादळ शमल्यानंतर हे कर्मचारी गैरहजर राहिल्याने विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यास अडचणी येऊन विलंब झाला. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कृती दलातील पथकांच्या जिल्ह्यतील उपस्थितीचा लाभ करून घेतला नाही. जिल्ह्यतील शासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये येणाऱ्या अवकाळी पावसामुळे विविध क्षेत्रांतील उत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्याची झळ यंदा अधिक प्रमाणात बसली असून चक्रीवादळ म्हणजे नेमके काय याची झलक जिल्ह्यतील नागरिकांना प्रथमच खऱ्या अर्थाने मिळाली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने मान्सूनच्या पूर्वतयारीबरोबरच घरांचे, शेती-बागायतीचे तसेच इतर पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान अल्पावधीत पूर्वपदावर आणण्याचे आव्हान नागरिक तसेच प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

– नीरज राऊत