‘आता माझी सटकलीय् !’
श्री आईवर जोरात ओरडला! ..सुरुवातीला आईला वाटलं की, नवीन आलेल्या ‘सिंघम रिटर्न्स’चा परिणाम असावा. आताच कॉलेजमधून परत आलाय खरा.. पण बहुधा मनाने कॉलेजमध्येच असावा.. म्हणूनच तर अन्यथा श्री हा काही आईवडिलांवर अशा प्रकारे ओरडणारा मुलगा नक्कीच नाही.. आईच्या मनात विचार सुरू होते.
हे सारे सुरू असताना दुसरीकडे श्रीची थोडीशी आदळआपट सुरूच होती.. तोपर्यंत बाबाही घरी परत आले. बाबांचा चहा सुरू असताना श्री घरात असलाच तर त्यांच्यात नेहमीच चर्चा होत असे दिवसभरातील घडामोडींबद्दल. चहापूर्वीच आईने आज बाबांना श्रीचं डोकं सटकल्याची कल्पना दिली होती.. त्यामुळे बाबांनी आधी चहाचे दोन घोट व्यवस्थित घेतले आणि मग सहज सुरुवात केली, ‘आज काय विशेष?’
अगदीच कसनुसा त्रासलेला चेहरा करून श्री म्हणाला, ‘आजपुरतं नाही बोललं तर चालेलं का?’
बाबा म्हणाले, ‘का रे बाबा, काही प्रॉब्लेम? काही झालंय का कॉलेजमध्ये?’
आई म्हणाली, ‘आज तो सिंघम झालाय.. सटकलीय त्याची!’
‘सटकणार नाही तर काय?, लोकांच काय चाललंय कळत नाही. चुम्बळे काका म्हणत होते तेच खरंय.. शिक्षणासाठी विदेशात जायचं आणि तिथेचं स्थायिक व्हायचं, या देशात आता काही शिल्लक राहिलेलं नाही!’ – इति श्री.
‘अरे हो, थेट विदेशात जाण्याइतका राग का बरं आलाय, तुला?’ बाबांनी विचारलं
‘दुपारी कॉलेजमध्ये गेलो तर काय? मला वाटलं आजपासून कॉलेजमध्ये दांडिया असल्यामुळे मजा येणार.. तर नेहमी झ्ॉकपॅक येणाऱ्या कॉलेजमधल्या मुली तर सोडाच अनेक मुलंपण आज चक्क अनवाणी आलेली! मुंबईसारख्या शहरात हे असं कसं काय होऊ शकतं. एकवेळ हे गावाकडं झालं असतं तर मी मानलंही असतं. पण मुंबईच्या कॉलेजमध्ये? वर कारण पण काय सांगतात तर म्हणे देवी प्रसन्न होण्यासाठी! यांना मार्क मिळावेत म्हणून देवीने प्रसन्न व्हायचं. अभ्यास कोणी करायचा? बरं देवी का प्रसन्न होणार तर म्हणे यांनी अनवाणी चालण्याच्या वेदना सहन केल्या म्हणून. हे पटण्यासारखं कारण आहे का ? आणि हे सारं कोण करणार? तर आमच्यासारखी विज्ञान शाखेत गेलेली तरुण पिढी. यामधले काही जण उद्या डॉक्टर होणार आणि काही इंजिनीअर. मग यांनी केलेल्या उपचारांवर विश्वास कोणी आणि का ठेवायचा?’
श्रीच्या मनात कोंडून राहिलेल्या प्रश्नांची सरबत्ती ऐकल्यानंतर मात्र आई- बाबा दोघांनाही सटकण्यामागचं खरं कारण कळलं! आता पुढचा प्रवास कदाचित सोपा होता.. बाबा म्हणाले, अरे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपण लोकशाही राष्ट्रात राहतो. ज्याने त्याने आपापली श्रद्धा जोपासली तर अडचण काय आहे?’
‘लोकशाही जपायला आणि मतस्वातंत्र्याला मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग आपण बुद्धिनिष्ठ असल्याचा आव तरी आणू नये, असं माझं म्हणणं आहे. तुम्हीच सांगाना की हे पटतंय का तुम्हाला, की अनवाणी चालल्याने देवी प्रसन्न होते.’
‘अरे तू तरुण आहेस म्हणून तुला असे अनेक प्रश्न पडताहेत. तरुणपणी ऊर्जा खूप असते. आणि तेच वयं असतं बंडखोरीचं. प्रत्येक जण काही एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी कृती नसतो करत. काही वेळेस समाज करतो, मित्र करतात म्हणून अनुकरणातूनही ही कृती येते. आणि समाजामध्ये अशा गोष्टी वाढतात त्या त्या वेळेस असुरक्षिततेची भावना खूप मोठय़ा प्रमाणावर वाढलेली असते आणि माणूस काहीतरी एक आधार शोधत असतो.. असं लक्षात आलं आहे! आता अनवाणी चालण्याची प्रथा वाढली आहे, याचा संबंध समाजातील वाढलेल्या असुरक्षिततेशी असू शकतो. याची नेमकी उकल मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ करू शकतात. आपण पाहिजे तर डॉ. सावेंना विचारून घेऊ’
‘डोकं भणभणलंय माझं. यूथ फेस्टिवलमध्ये माझ्यासोबत कॉलेजचं प्रतिनिधित्व करणारी पूजा त्या वेळेस वादविवाद स्पर्धेत स्त्रीभ्रूणहत्या आणि महिलांची मागास मानसिकता यावर बोलली होती. महिला कशा विविध विषयांमध्ये, क्षेत्रांमध्ये पुढे आहेत. त्यांच्यामधील दुर्गा कशी जागृत झाली आहे, यावर तिनं चांगलं भाषणच केलं होतं. मीही प्रभावित झालो होतो. तिचं वाचनही चांगलं आहे, असं तिनेच दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात आलं होतं. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांची जागा दाखवून देणाऱ्या दुर्गाशक्ती नागपालचं उदाहरण दिलं होतं तिनं.. आणि आज.. आज तीच पूजा काकूबाई होऊन आली होती. नऊ दिवस म्हणे चप्पल नाही घालणार? मी तर भांडलोय आज तिच्याशी. मी तिला सांगून आलो, तुझे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत! काय विरोधाभास आहे हा!’
त्यावर बाबा शांतचित्ताने म्हणाले, ‘भारतासारख्या देशात हा विरोधाभास काही नवीन नाही! असं होणारच. अरे आपल्याकडचा समाज म्हणजे काही एकसाची नाही. हा तोच समाज आहे जिथे संपूर्ण देशभर मातृदेवता म्हणून देवीची पूजा होते. तिला शक्ती म्हटले जाते आणि स्त्रीगर्भ असल्याचे लक्षात आल्यावर भ्रूणहत्याही होते. हा तोच समाज आहे जिथे कामाचे तास वाढवावेत, रात्रपाळीही करण्याचा अधिकार मिळावा म्हणून शहरातील महिला हायकोर्टात जातात आणि गावातील महिला सायंकाळी लवकर निघता यावं म्हणून कोर्टाचा दरवाजा खटखटवतात.. प्रश्न असा पडेल की, यात खरे काय? दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. कारण शहराएवढे सुरक्षित वातावरण गावाकडे नाही, म्हणून तिथल्या महिलांनी लवकर सुटण्यासाठी कोर्टात अर्ज केला. दोन्हीकडे महिलांना उपलब्ध असलेल्या वातावरणात जमीनअस्मानाचं अंतर आहे. त्यामुळे आपल्या समाजात हा विरोधाभास राहणारच.. फक्त त्या त्या परिस्थितीत बुद्धिनिष्ठ राहून परिस्थितीला सामोरं जाणं हेच आपल्या हातात आहे! ’
‘आता मलाही बोलायचंय!’ एवढा काळ गप्प असणाऱ्या आईनेही एंट्री घेतली.. ती म्हणाली, ‘एका बाजूला देवीची पूजा करायची आणि दुसरीकडे मुलगी आहे असं लक्षात आल्यावर भ्रूणहत्या करायची हे वास्तव माझ्यासाठीही अस्वस्थ करणारंच आहे. आमीर खानच्या शोमध्ये तर एका महिला डॉक्टरवरच घरच्यांनी स्त्रीभ्रूणहत्या करण्यासारखी घटना घडल्याचं दाखवलं तेव्हा ‘डॉक्टरच्या घरातही?’ मग सामान्यांनी काय करावं असा प्रश्न पडला.. मला वाटतं यात फक्त शिक्षित- अशिक्षित असा फरक नाही तर सुसंस्कृत आणि असंस्कृत असा फरक आहे. शिकलेली माणसंही अनेकदा असंस्कृतपणे वागताना दिसतात. या साऱ्याचा संबंध समाजातील असुरक्षिततेशी आहे. मध्यंतरी साताऱ्यातील नकुशा मुलींच्या संदर्भात एक मोहीम राबवण्यात आली, तेव्हा मलाही वाटलं एका मुलीला आपण दत्तक घ्यायला हवं. कारण आपण विचार करतोय खरंय, पण आपण समाजाचा एक घटक म्हणून काय करणार हा प्रश्न आहे. आपला सहभाग काय? म्हणजेच श्री तू केवळ अस्वस्थ होणार, प्रश्न विचारणार की, मित्र-मैत्रीणींना परावृत्त करण्यासाठी काही प्रयत्न करणार? चर्चा तर अनेक जण करतात, पण मुद्दा मान्य करून परिवर्तनासाठी पावलं कितीजण टाकतात. आणि ती पावलं टाकणाऱ्यांमध्ये आपण असणार का?’
आईने तर थेट मुद्दय़ालाच हात घातला होता!
बाबा म्हणाले, ‘पण हे सारं करताना मूळ समजून घेऊया आधी! म्हणजे देवी किंवा मातृदेवता ही संकल्पना अस्तित्वात कशी आली इथपासून. सुरुवातीस तिच्या प्रजोत्पादनक्षमतेचे कोडे पडलेले होते. ती क्षमता केवळ ‘ति’ला प्राप्त झालेली होती म्हणून त्या आश्चर्यमुग्धतेतून ते देवीरूप प्राप्त झाले. आता तर त्याला अनेक कथा- दंतकथांचा आधार मिळालेला आहे. सर्वत्र स्त्री ही शक्तिरूपिणी म्हणून पाहिली जाते. पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यात सोयीने पाहण्यामध्येच आपला दांभिकपणा अधिक आहे! नियम सगळीकडे सारखाच असला पाहिजे. पण तिथे आपण सोयीचे तेवढे स्वीकारतो आणि बाकीचे नाकारतो! बुद्धिनिष्ठ वावरणे अनेकदा दाखवायला चांगले असते, पण आचरणात आणण्यासाठी कठीण. कारण मग आपल्याच अनेक प्रथा- परंपरांना छेद जातो, समजुतींना छेद जातो. ते सारे स्वीकारण्यासाठी धाष्टर्य़ असावे लागते. आणि अभ्यासाची जोड लागते. अन्यथा या स्वीकारण्या- नाकारण्याच्या नादात संभ्रमच अधिक निर्माण होतो. नाकारणे सोपे असते, पण पुढचा मार्ग सांगणे कठीण असते. समाजाला अनेकदा मार्गदर्शन करावे लागते. त्याची तयारी बुद्धिप्रामाण्य स्वीकारणाऱ्यांनी ठेवायलाच हवी! सर्वानाच सर्व जमेल असं नाही, पण आपल्याला एखादी गोष्ट पटली तर त्यातील एखादी जबाबदारी स्वीकारून आपण ती तडीस नेऊ शकतो. आज तुला पडलेल्या या प्रश्नाच्या निमित्ताने तू ती जबाबदारी घेतलीस तरी यंदाचा दुर्गोत्सव आपण चांगला साजरा केला असं होईल!’
‘नेमकं काय करणं अपेक्षित आहे?’
‘ही प्रथा मित्रांना नकारात्मकतेकडे नेणारी असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त कर! एवढं केलंस तरी पुरे. अगदी अधिक वाटलंच तर स्त्रीची मानहानी खाली मान घालून सहन न करण्याची शपथ आपण घेऊ शकतो. मी तर आजच आमच्या कार्यालयात आलेल्या नव्या महिला कर्मचाऱ्यांची गळचेपी करण्याविरोधात आवाज उठवला आहे. म्हटलं तर नोकरी पणाला लावली आहे. पण भूमिका ही भूमिका आहे. आणि तुम्ही पाहालच की, नियत मार्गाने लढा देत नोकरीत राहूनच मी त्यांना न्याय मिळवून देणार. मुद्दा आला म्हणून हे सांगितलं पण अशी कामं सांगण्यासाठी नसतात करायची ती मनातून खूप आतून वाटतं म्हणून करायची असतात. माझ्यासाठी तर हीच खरी दुर्गापूजा!’ एवढा काळ नकारात्मक भूमिकेत राहिलेल्या श्रीच्या चेहऱ्यावरही कणखर भाव झळकले, तो म्हणाला, ‘माझी दुर्गापूजाही ठरली आता!’ हे म्हणत असताना त्याने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सावेंना फोनही लावलेला होता!