scorecardresearch

लसूणपात

आज आपण ज्या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे लसूणपात. तिचे शास्त्रीय नाव आहे Allium tuberosum.. ही वनस्पती लसणेचीच एक जात आहे;

lp75आज आपण ज्या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे लसूणपात. तिचे शास्त्रीय नाव आहे Allium tuberosum.. ही वनस्पती लसणेचीच एक जात आहे; परंतु या वनस्पतीला आपल्या नेहमीच्या लसणेसारखा कंद नसतो. तसे असेल तर मग या लसूणपातचा काय उपयोग, असे तुम्हाला खचितच वाटेल. हिच्या पानांचा स्वाद हुबेहूब लसणेसारखाच असतो. ही एकदा लावली की वर्षभर आपल्यास तिची हिरवीगार पाने मिळण्याची सोय होते. लसूणपातच्या पानांची चटणी केली तर तिला अगदी लसणेच्या पानांच्याच चटणीची चव व स्वाद येतो. नेहमीच्या लसणेसारखी ही सुप्तावस्थेतही जात नाही, हा तिचा आणखी मोठा फायदा.
लसूणपात वनस्पतीची लागवड जमिनीवरील वाफ्यात किंवा कुंडीतही करता येते. हिची रोपे नर्सरींतून उपलब्ध असतात. हिला जरी कंद नसले तरी लावलेल्या एका रोपास अनेक धुमारे जमिनीतून फुटत राहतात. ही रोपे विभागूनही लसूणपातची अभिवृद्धी करता येते. हिवाळ्याच्या सुमारास हिला कांद्याच्या फुलांसारखाच पण आकाराने छोटा फुलोरा येतो. फुलोऱ्यात उमललेली, छोटुकली, ताऱ्याच्या आकाराची धवल फुले मनमोहक दिसतात. फुले वाळून गेल्यानंतर फुलोऱ्यावर लहान फळे/ शेंगा लागतात. ह्या फळांत साधारण तिळाच्यापेक्षा जरा लहान आकारमानाच्या बिया असतात. या बिया लावूनही आपण लसूणपातची लागवड करू शकतो.
लागवडीसाठी बागकामाची माती व शेणखत यांचे समप्रमाण मिश्रण करून घ्यावे. बिया पेरून लागवड करायची असल्यास पसरट, उथळ थाळीसारख्या कुंडीत बिया पेराव्यात. बिया खूपच लहान असल्याने त्यावर फक्त १ सें.मी. मातीचा थर द्यावा. बिया साधारण ६ ते ७ दिवसांत उगवून येतात. रोपे ३ ते ५ सें.मी. उंचीची झाली की त्यांची पुनर्लागवण करावी. पुनर्लागवण करण्यासाठी वरीलप्रमाणेच खत-मातीचे मिश्रण करून घ्यावे. २० सें.मी. आकाराच्या कुंडीत ४ ते ५ रोपे लावावीत. पुनर्लागवणीनंतर कुंडीतल्या रोपांना कडक, दुपारच्या, उन्हापासून वाचवावे; त्यानंतर मात्र कुंडी उन्हातच ठेवावी.
नर्सरीतून रोपे मिळाल्यास तीही वरीलप्रमाणे कुंडीत लावून घ्यावीत. वर्षभरात एका रोपापासून, जमिनीतून धुमारे फुटू लागतात. आपली परसबाग असली तर गादी वाफा करून त्यावरही लसूणपातची लागवड करणे श्रेयस्कर होईल. लागवड केलेल्या कुंडीतील किंवा वाफ्यातील माती ओलसर राहील इतकेच पाणी द्यावे. जरुरीपेक्षा जास्त पाणी हानीकारक ठरू शकते. पाण्याचा निचराही सत्वर होईल याची काळजी घ्यावी. एक पिठय़किडे सोडले तर लसूणपातला दुसरा कसलाही उपद्रव नसतो. कुंडीतल्या रोपांची वाढ होऊन फार गर्दी झाल्यास रोपांची वाढ खुंटते; असे झाले तर रोपे मुळांसकट, काळजीपूर्वक मातीतून काढून घ्यावीत. रोपांचे मुळांसकट विभाजन करावे. विभाजन केलेल्या रोपांची विरळ लागवड करावी.
पानांची भरपूर वाढ झाली की ती मातीच्या स्तरापर्यंत कापून त्यांची छान चटणी करता येते. वाटण करायच्या मसाल्यातही, लसणीऐवजी ही पाने घालता येतात.
नंदन कलबाग -response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Garlic form

ताज्या बातम्या