अक्षर हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो, पण आपण चांगले कपडे घातले तर जसा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो, तसाच आपलं अक्षर सुंदर आणि सुवाच्य असतं तेव्हाही पडतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

मुंबई विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना काढली आहे की अक्षर वाचता आले नाही तर शून्य गुण मिळतील. साधारण महिन्यापूर्वी पुणे विद्यापीठाची एक प्रश्नपत्रिका ऐन वेळी हाताने लिहावी लागली होती. ती वृत्तपत्रात छापून आली होती. त्यातील अक्षर सुमार दर्जाचे होते. २-३ महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कॅपिटल अक्षरात लिहावे अथवा संगणकावर तयार करून द्यावे, असे वृत्त आले होते. अक्षरसुधारणेकरिता नाशिकमध्ये एक शाळा कार्यरत असूनदेखील २५ टक्के विद्यार्थ्यांचे अक्षर खराब आहे. इतरत्र काय परिस्थिती असेल, याची कल्पना येईल. मुंबई विद्यापीठाला अशी सूचना काढावी लागली, याचा अर्थ बाकी ठिकाणी परिस्थिती आशादायक आहे, असा मुळीच नाही. अशा खराब अक्षराचे विद्यार्थी पुढे वकील, डॉक्टर, शिक्षक, सरकारी खात्यात कर्मचारी म्हणून काम करू लागले तर त्याची परिणाम इतरांना कसे भोगावे लागतील, याची ही झलक आहे. ही अवस्था येण्याची दोन कारणे. या विषयाकडे दिवसेंदिवस होणारे वाढते दुर्लक्ष. संबंधित घटकांचे खोलवर रुजलेले गैरसमज, हे दुसरे कारण. 

४०-५० वर्षांपूर्वीपर्यंत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टाकाने लिहावे लागे. पेन वापरू देत नसत. आठवीनंतर बॉलपेन वापरू देत नसत. तेव्हा जेल पेन आलेले नव्हते. शाईच्या पेननेच लिहावे लागे. पाचवीपर्यंत अक्षरासाठी रोज एक तास असे कित्तावह्य असत. पहिलीच्या अगोदर जवळपास कोणी शाळेत जात नसे. सध्या बहुतांश मुले पहिलीच्या अगोदर २-३ वर्षे शाळेत जातात, तरीही अक्षराची ही अवस्था आहे. बालवर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना हा विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवावा याचे सखोल व विस्तृत शिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे. शिक्षणावर अब्जावधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाला, शिक्षणाचा आत्मा असलेल्या या महत्त्वाच्या विषयावर काही पावले टाकावीत, असे का वाटत नाही? ज्या शाळांच्या वह्य कव्हर्स स्वतंत्र असतात, त्यांनी अक्षराबद्दल मौलिक माहिती त्यावर छापावयास हवी.
अक्षर दैवी देणगी आहे या गैरसमजामुळे प्रयत्न होत नाहीत. रोज लिहून अक्षर आपोआप सुधारते या गैरसमजामुळे वर्षांनुवर्षे लिहिले जाते, पण सुधारणा नसते. बालवयातच अक्षर सुधारते अशा गैरसमजामुळे वरच्या वर्गाचे विद्यार्थी व प्रौढ काही प्रयत्न करीत नाहीत. अक्षर सुधारायला खूप कालावधी लागतो या गैरसमजामुळेही प्रयत्न होत नाहीत. डावखुऱ्यांचे अक्षर सुधारत नाही, या गैरसमजापोटी प्रयत्नांच्या वाऱ्यालाही ही मंडळी उभी राहत नाहीत.
वास्तविक ‘कोणाचेही अक्षर, योग्य मार्गदर्शनाने फक्त २५ तासांत आमूलाग्र सुधारते’ हे वास्तव संबंधितांनी समजून घ्यावे व आचरणात आणावे.
विद्यार्थ्यांचे अक्षर खराब आहे, याचे खापर त्यांच्या माथ्यावर फोडणे योग्य नाही. त्यांना हा विषय व्यवस्थित शिकविला गेला पाहिजे, म्हणजे अक्षराबद्दलचा मुलांचा न्यूनगंड नाहीसा होईल. सध्या १५ टक्के जण असे आहेत की त्यांना आपले अक्षर दुसऱ्याला दाखविण्याची लाज वाटते. त्याच्याही पुढची पायरी खालील समर्पक सुभाषितात आहे.
वाचयति नान्यलिखितं लिखितं अनेनापि वाचयति नान्य:।
अयम परोऽस्य विशेष: स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति॥
अर्थ- (एक विवाहिता नवऱ्याबद्दल दुसऱ्या विवाहितेस) दुसऱ्याने लिहिलेले याला वाचता येत नाही, तर याने लिहिलेले दुसऱ्याला वाचता येत नाही. (दुसरी म्हणते, हे काहीच नाही) माझ्या नवऱ्याचा हा तर विशेष आहे की तो स्वत: लिहिलेलेदेखील वाचू शकत नाही.
दुर्दैवाने वरील परिस्थिती येऊ घातली आहे. अजूनही युद्धपातळीवर प्रयत्न केले तर परिस्थिती बदलू शकते. शासन, संस्था, शिक्षक, पालक, विद्यार्थी, हस्ताक्षरतज्ज्ञ एकोप्याने हस्ताक्षराची नाव पैलतीराला सुरक्षित नेऊ शकतात.
महात्माजींचे ‘खराब अक्षर, सदोष शिक्षण’ हे वचन गांभीर्याने लक्षात घेऊन ‘हस्ताक्षर सुधारणा अभियान’ सुरू करावयास हवे.