02 July 2020

News Flash

श्री लक्ष्मी : मातृदेवता लक्ष्मी

दिवाळी २०१४ लक्ष्मी म्हणजे संपत्तीं, समृद्धीचं प्रतीक. प्राचीन वाड़मय, लेणींमधील पुरावे आदींच्या आधारे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या प्रथेचा घेतलेला आगळा वेध

| November 26, 2014 01:12 am

lp25दिवाळी २०१४
लक्ष्मी म्हणजे संपत्तीं, समृद्धीचं प्रतीक. प्राचीन वाड़मय, लेणींमधील पुरावे आदींच्या आधारे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या प्रथेचा घेतलेला आगळा वेध

।।श्री।।
हिरण्यवर्णां हरिणीं हिरण्यरजतस्रजां
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।।१।।
तां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ।।२।।
अश्वपूर्वा रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं
श्रियं देवीमुपहये श्रीर्मा देवी जुषताम् ।।३।।
कां सो स्म्तिां हिरण्यप्राकारामाद्र्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपये श्रियम् ।।४।।
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुंष्टामुदारां
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।।५।।
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्व:
यस्य फलानि तपसा नुदन्तु मायानारायाश्च बाह्य अलक्ष्मी: ।।६।।
उपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिना सह
प्रादुंर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ।।७।।
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहं
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ।।८।।
गन्धद्वारां दुराधर्षांं नित्यपुष्टां करीषिणीं
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ।।९।।
मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि
पशूनां रूपमन्नस्य मयि श्री:श्रयतां यश: ।।१०।।
कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम
श्रियं वासय मे कुले मातरं पद्मालिनीम् ।।११।।
आप:सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे
नि च देवीं मातरं श्वियं वासय मे कुळे ।।१२।।
आद्र्रां य:करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ।।१३।।
आद्र्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।।१४।।
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं
यस्यां हिरण्यं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहं ।।१५।।
य: शुचि: प्रयतो भूत्वा जुहुयावाज्यमन्वहं
सूक्तं पंचदशर्चं च श्रीकाम: सततं जपेत् ।।१६।।

श्री लक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होतो. मात्र इतरांच्या मानाने एकूणच तिच्याकडे बरेच दुर्लक्ष्य झालेले दिसते. त्याचे कारण असेही असू शकते की अगदी वेदकाळापासून आजपर्यंत अगदी अखंडपणे तिची उपासना-चालू आहे; तिचे स्वरूपही आपातत: तसेच राहिले आहे. देवतकथाशास्त्रदृष्टय़ा विद्वानांनी तिचा विचार न करण्यामागे असेही कारण असू शकते की, तिचे सूक्त म्हणून आलेले श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या गाभ्यातील सूक्तांपैकी नाही, त्याचा अंतर्भाव खिलात, परिशिष्टात आहे. त्यामुळे त्याची प्राचीनताही थोडी संदेहास्पद वाटते, पण शौनकऋषींच्या बृहद्देवतेमध्ये या सूक्ताचा विचार केला असल्याने आणि शौनकांचा काळ हा इ.स.पू.च्या आठव्या शतकाच्या अगोदरचा असल्याने पुरातत्त्वाच्या परिभाषेत बोलावयाचे झाल्यास द्वितीय नागरीकरणाच्या काळाचे हे सूक्त आहे हे निश्चित. हे लक्षात घेता आदी ऐतिहासिक कलेतील लक्ष्मीची प्रतिमा, तिची लाञ्छने यांचा विचार करावयाचा झाल्यास श्रीसूक्तातील संदर्भात बारकाईने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.

श्री/ लक्ष्मीची नावे, शारीर वैशिष्टय़े व लाञ्छने
श्रीच्या लक्ष्मी या नावाबरोबरच तिचे आद्र्रा व हिरण्मयी हे नावही तितकेच महत्त्वाचे असावे असे दिसते. नंतरची दोन नावे वास्तविक पाहता विशेषण स्वरूप व त्या अर्थाने बिरुदे म्हणून मानता येतील. तिच्या वर्णाबाबत वारंवार उल्लेख येतात. सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती ही नावे तिच्या पदमगौर, तेजस्वी अंगकान्तीविषयीच नाही, तर पदम (रक्तकमल), सूर्य आणि चंद्राशी असलेली जवळीकही सूचित करतात. तशीच अर्थगर्भ बिरुदे म्हणून पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतस्र्रजा यांचा उल्लेख करता येईल. पद्मेस्थिरता ही ती कमळावर उभी असल्याचे दाखविते, अश्वपूर्वा, रथमध्या आणि हस्तिनादप्रबोधिनी ही बिरुदे तिच्या प्रभूशक्तीची निदर्शक आहेत, तर नवव्या ऋचेतील गंधद्वारा, नित्यपुष्टा करीषिणी ही बिरुदे तिच्या व्यक्तिमत्त्वातील भूदेवीचा पैलू उलगडून दाखवतात व भूतमात्रांवरील प्रभुत्वाचा (ईश्वरी सर्वभूतानां) स्पष्ट उल्लेख करतात.
श्रीचा स्वत:चा परिवार आहे, त्यात देवसखा (भाष्यकारांच्या मते कुबेर), कीर्ति आणि मणि (म्हणजे यक्ष मणिभद्र) यांचा समावेश आहे. स्तवनकर्ता ऋषी देवसख्याच्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की तो या दैवतांचा निवास असलेल्या राष्ट्रातच जन्मलेला असून देवसख्याने त्यास कीर्ति आणि समृद्धीचे दान द्यावे. तपापासून उत्पन्न झालेला बिल्व वृक्ष हा श्रीचा वृक्ष आहे, त्याच्या प्रभावाने बाह्य़ म्हणजे भौतिक आणि आंतर म्हणजे मानसिक अलक्ष्मींचा नाश होतो. परिवारातील आणखी महत्त्वाचे सदस्य म्हणजे चिक्लीत आणि कर्दम हे तिचे पुत्र. सर्व प्रजांचा जन्म होतो तोच मुळी कर्दमामुळे आणि जलतत्त्वातूनच स्निग्ध द्रवांचे सर्जन होते, त्याला कारणीभूत लक्ष्मीचा चिक्लीत हा पुत्र. ११ व १२ या ऋचांचा स्थूल अर्थ जरी लक्षात घेतला तर चिखलातून उगवणाऱ्या, फुलणाऱ्या आणि फळणाऱ्या वनस्पतींचा आणि दुधामुळे पोसल्या जाणाऱ्या प्राणिमात्रांच्या, कर्दम आणि चिक्लीत यांच्या माध्यमातून पोषणाच्या सृष्टीकडे येणाऱ्या स्र्रोताचे मूळ lp26लक्ष्मीमातेपर्यंत जाते, आणि म्हणूनच स्तवनकर्त्यां ऋषीची या दोघांना प्रार्थना आहे की माझ्या कुळात माता श्रीचा निवास होईल असे तुम्ही करा (श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्!).
लक्ष्मीच्या प्रभावाची खरी जाण होते ती तिच्या सृष्टीला सुजलाम् सुफलाम् करण्याच्या प्रयत्नामध्ये खीळ घालणाऱ्या ज्येष्ठा अलक्ष्मीमुळे. अलक्ष्मीच्या स्वरूपाची नीट कल्पना असल्याशिवाय लक्ष्मीचे खरे व्यक्तिमत्त्व प्रकट होऊ शकत नाही. सूक्तकारांची इच्छा लक्ष्मीच्या आश्रयाने अलक्ष्मीचा नाश व्हावा अशी आहे (ऋचा ५) तिच्या आणि तिच्या परिवारातील देवतांच्या साहाय्याने घशाची कोरड, पोटात उसळणारा भुकेचा डोंब आणि मळ, तसेच दारिद्रय़ आणि दैन्य यांची हकालपट्टी करण्याचा सूक्तकर्त्यांचा उद्देश आहे.
लक्ष्मीच्या दोन रूपांचाही उल्लेख सूक्तामध्ये आलेला आहे (ऋचा १३-१४) ती रूपे म्हणजे सूर्या आणि चंद्रा लक्ष्मी. चन्द्रा अथवा ‘चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं’ आणि आदित्यवर्णा हे इतरत्र सूक्तात आलेले उल्लेख तिच्या आदित्य आणि चंद्राशी असलेल्या जवळिकीचे निदर्शक आहेत याचा निर्देश यापूर्वी आलेला आहेच. सूर्याचा पर्जन्याशी संबंध असल्याचे उल्लेख अनेकवेळा ऋग्वेदात आलेले आहेत, तर चन्द्रामध्ये सोमरूपी अमृत असल्याची कथा तर सर्वज्ञात आहे. १०व्या मंडळातील सूर्यासूक्ताचा पाठ विवाहविधीत केला जातो, कारण सूर्या म्हणजे सूर्यकन्या धरित्री विवाहसोहळय़ाचे त्यात वर्णन आले आहे. या सृजनाशी व सुफलत्वाशी संबंधित असलेल्या प्रतीकांचा सूर्यालक्ष्मी आणि चन्द्रालक्ष्मी या नावावर प्रभाव असावा असे वाटते.

भारतीय कलेतून घडणारे श्री/लक्ष्मीचे दर्शन
ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला तो मौर्य-शुङग काळात आणि मुख्यत्वे सांची भारहूत येथील बौद्ध कलेतून, यक्ष-यक्षींच्या भीमकाय पाषाणप्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यांसारख्या प्रतिमांतून. प्रत्यक्ष श्री/लक्ष्मीच्या बाबतीत म्हणावयाचे झाल्यास भारहूतच्या स्तूपावरील यक्ष-यक्षींच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कठडय़ावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठावात या पाषाण प्रतिमा आढळतात. त्यात विशेषकरून सिरिमा, चंदा यखी आणि कुपिरो (कुबेर) यखो अशा ओळख करून देणाऱ्या अभिलेखांसह आढळणाऱ्या यक्षप्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कुपिर म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला यावरून या देवता सामान्यजनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचासुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूजाविष्कारात खंड पडलेला नव्हता. अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे ‘श्री ही वैदिक देवता’ म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार यास्कांच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृतिक देवाचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्याचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चन्द्रा लक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखिलेले श्रीचे स्वरूप चन्द्रा यखी म्हणूनही पुजिले जात असे. परंतु श्री/लक्ष्मी विषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळय़ा रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली सांची येथे पाहावयास मिळते. ते दोन-तीन उदाहरणांतून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. दोन हातांत दोन कमळे घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे, तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळे आहेत. पद्मेस्थिता आणि पद्मिनी या तिच्या दोन्ही बिरुदांत अभिप्रेत असलेला अर्थ कलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो, तर हस्तिनाद-प्रबोधिनी या बिरुदाशी पहिल्या चित्रणाचा संबंध दिसतो. काही कलामर्मज्ञांच्या मते हत्ती हे मेघाचे व पर्यायाने पर्जन्याचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती उभी असलेले कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत. अशाच प्रकारच्या पण कमलासीन अभिषेकलक्ष्मीचे एक ठळक चित्रण पितळखोरे (इ.स.पू. पहिले शतक) येथील विहाराकडे जाणाऱ्या सोपानाच्या शीर्षांवर आहे. आणखी एक वेगळय़ा प्रकारचे श्रीचे चित्रण सांची येथील तोरणावर आहे. येथे ती कमलासीन असून तिचे हात कमळमुद्रेत वक्षासमोर धरले आहेत. भरतनाटय़ातील परंपरेप्रमाणे या मुद्रेचा अर्थ पूजा असल्याने लक्ष्मी भगवान बुद्धाला वंदन करते आहे असाच घेतला पाहिजे. श्री/लक्ष्मी ज्याप्रमाणे बौद्ध धर्मात स्वीकारली गेली तशी ती जैन धर्मातही आढळते. यावरून स्पष्ट होते की, काही प्रतीके (Symbols), प्रयोजने (Motifs) आणि दैवते (Deities) ही lp27लोकमानसात इतकी दृढमूल झालेली असतात की तत्त्वचिंतनामुळे अथवा विचारमंथनामुळे धार्मिक आचारविधीत बदल झाले तरी काही प्रतीके व प्रयोजने, क्वचित थोडाफार फेरबदल होऊनही नवीन संप्रदायात समाविष्ट होतात.
यक्षांच्या बाबतीतही ही गोष्ट तितकीच खरी आहे हे कुबेराच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. वास्तविक कुबेर हा यक्ष- राक्षसांचा राजा, पौराणिक कथांनुसार विश्रवस मुनि आणि राक्षसीचा मोठा मुलगा, रावणाचा अग्रज, त्याला बौद्ध देवकुला (ढंल्ल३ँील्ल) मध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले त्याच्या धनाधिपत्यामुळे, पण त्याला बौद्ध संप्रदायात लोकपालाचे पद मिळाले. अर्थात त्याचे महत्त्व वाढले ते त्याच्या धर्मरक्षणाच्या कर्तव्यामुळे, आणि याच कारणामुळे उदीच्या बौद्ध धर्मात त्याला इतके वेगळे स्थान प्राप्त झाले की तिबेट, चीन, कोरिया व जपान या सर्व देशांमध्ये श्री/ लक्ष्मीच्या बरोबरीनेच कुबेराशी उपासना दृढमूल झाली व आजही प्रचलित आहे.
यासंदर्भात मूर्तिपूजा व देवतांचे मूर्त स्वरूपात प्रतिमा म्हणून अंकन/चित्रण याबाबत काही स्पष्टीकरण आवश्यक आहे. भगवान बुद्ध हा कुबेर आणि सिरिमा यांना पूज्य होता, पण त्या दोघांप्रमाणे प्रतिमा स्वरूपात त्याचे चित्रण (मौर्य-शुंग काळात) समकालात झालेले दिसत नाही. सांचीच्या एका तोरणावर भगवान बुद्धाच्या आयुष्यातील प्रव्रज्या, मारधर्षण हे प्रसंग कथनात्मक शिल्प स्वरूपात चित्रित केले आहेत. त्याच्या आयष्यातील इतर प्रसंगांच्या चित्रणांत गौतम शाक्यमुनीचे मानवी स्वरूपात चित्रण नसून पावलांचा ठसा, घोडय़ावरील छात्र-चामरे, बोधिवृक्ष, धर्मचक्र अशा प्रतीकांच्या साह्यने त्याचे प्रसंगातील अस्तित्व सूचित केले आहे. अमरावती येथील एक शिळापट्टावर तर किशोर गौतमाचा निष्क्रमण संस्कार चितारताना त्याला गावातील पारावरच्या यक्षाच्या दर्शनाला नेल्याचे दाखविले आहे. पारावरच्या यक्षाची पूजा तो निवास करीत असलेल्या वृक्षाच्या रूपात केली जात असे. किशोर गौतमाचे अस्तित्व त्याला लपेटलेल्या दुपट्टय़ावर पदचिन्हे कोरून सूचित केले आहे. प्रत्यक्ष भगवंत आपल्या दर्शनाला आले आहेत हे लक्षात येताच यक्ष स्वत: अंजलिमुद्रेत वृक्षातून प्रकट होऊन नमस्कार करतो. यावरून असे स्पष्ट होते की, यक्षाची पूजा करण्यासाठी त्याच्या प्रतिमेची आवश्यकता भासत नव्हती, त्याचे निवासस्थान असलेला वृक्ष अथवा त्या वृक्षाला टेकून पारावर ठेवलेली पूजाशिला पुरेशी होती. या सर्व विवेचनाचे सार असे की, भगवान बुद्धासारख्या निर्वाणप्राप्ती झालेल्या दिव्य विभूतींचे चित्रण मानवी स्वरूपात करणे अशक्यप्राय समजले जात होते, तर त्यामानाने निम्नस्तरावरील यक्षनागादिकांसारख्या देवतांचे मानवी स्वरूपात चित्रण करणे अयोग्य समजले जात नव्हते. मात्र त्यांचेही चित्रण अथवा पूजा प्रतीक स्वरुपात केली जात असे. वैदिक परंपरेतील यज्ञविधीत मूर्तीच्या पूजनाची कल्पना अन्तर्भूत नव्हती. अंथरलेल्या दर्भा (बर्हिस) वर देवतांना पाचारण करून त्यांना स्थानापन्न करण्याची प्रथा होती. त्यांच्या मूर्ती नव्हत्या. देवताना अर्पण करावयाचे हविद्र्रव्य अग्नीत समर्पण करून अग्नि (हुतवह) ते त्यांना पोहचवील अशी अपेक्षा होती. देवतांच्या वर्णनावरून त्याना मानवसदृश देह होते अशीच यज्ञकर्त्यांची धारणा होती. भारतीय देवतांचे म्हणजे शिव, विष्णु, वासुदेव-संकर्षण, बुद्ध व काही वैदिक दैवतांचेही प्रथम चित्रण गान्धार देशात इ.स.पू. दुसऱ्या शतकांपासून झालेले दिसते. यौधेयादि गणांच्या नाण्यांवर (इ.स. तिसरे शतक) इष्टदेवतांचे चित्रण प्रतीक स्वरूपातच प्रचलित होते. भगवान शिवाची पूजा तर लिंग या स्वरूपातच केली जात असे. लोकदैवतांची मूर्तिपूजा भारतात मौर्यपूर्व काळापासून प्रचलित होती. पण महत्त्वाच्या वैदिक व पौराणिक देवतांबाबत मूर्तिपूजेची प्रथा प्रचलित होण्यास काही काळ लागला. उत्तर-उपनिषदांच्या (उदा. मुण्डक, श्वेताश्वतर) काळांत तसेच सर्वास्तिवादींच्या करुणेच्या संकल्पनेचा प्रभाव वाढल्यानंतर वैदिक धर्मात, विशेषकरून आगम धर्मात मूर्तिपूजेची प्रथा रूढ झाली, नव्हे तिची आवश्यकता भासली. श्री/लक्ष्मीचाही याबाबतीत अपवाद नव्हता. तिचे चित्रण आकृतींच्या साहाय्यानेही केले जात असे. त्याला श्रीवत्स असे म्हणतात आणि एक अर्थाने पूर्णकलशही श्री/ लक्ष्मीचे प्रतीक असे म्हणता येईल. आजही पाण्याने भरलेला कलश हा प्रमुख देवतांचे निवासस्थान मानले जाते. मुखाशी विष्णू, कंठाशी रुद्र तर तळाशी ब्रह्मा मध्यावर सर्व मातृदेवता निवास करतात आणि आतल्या पाण्यात पृथ्वीसमवेत सप्तसागर असतात अशी धारणा आहे. लक्ष्मीच्या रूपाने येणारी नववधू उंबरठय़ावरील मापाला किंवा कलशाला पदस्पर्श करून शिगोशीग भरलेल्या धान्याचे ओघ घरात आणते ते लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक असते. शिल्पकलेत अगदी प्राचीन काळापासून कमलपुष्पाच्छादित कलश हे समृद्धीचे आणि पर्यायाने लक्ष्मीचेच प्रतीक समजले जाते.
मूर्तिपूजेची प्रथा भारतात रूढ होण्याअगोदरच, अगदी मौर्यकाळांतही, पंचचूडा अप्सरा, श्री/ लक्ष्मी यांच्या प्रतिमा मातीच्या बाहुल्याच्या रूपात करण्याची प्रथा दृढमूल होती. त्या काळात आणि त्यापूर्वीही पक्क्या अथवा कच्च्या मातीत मातृप्रतिमा घडविण्याची परंपरा होती. मात्र नेमक्या कशा स्वरूपात या प्रतिमांचा पूजाविधीत/ कर्मकाण्डात वापर केला जात होता हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच मौर्यपूर्व काळात या मृण्मय प्रतिमा नेमक्या कोठल्या मातृदेवतेच्या होत्या, त्यातल्या कुठल्या श्री/ लक्ष्मीच्या हे रूढ प्रतीकांचा/ प्रयोजनांचा त्यात अभाव असल्याने निश्चितपणे सांगता येत नाही. इनामगाव येथील ताम्रपाषाणयुगीन वस्तीच्या उत्खननात कच्च्या मातीच्या डबीत ठेवलेली शिरोहीन व वृषभारूढ मातृदेवतेची, कच्च्या मातीत घडवलेली प्रतिमा ही स्त्री सूतिकेच्या निर्विघ्न प्रसूतीसाठी ठेवण्यात येत होती हे परिस्थितीजन्य पुराव्यावरून लक्षात आले आहे. त्यामुळे हडप्पा येथील उत्तरकालीन थरात वैदिक आर्याच्या वसतीच्या खुणा सापडल्या असल्या आणि हडप्पा संस्कृतीत मातृदेवतांच्या प्रतिमा आणि संबंधित कर्मकाण्डाचे पुरावे मिळाले असले तरी श्री/ लक्ष्मीची पूजा प्रचलित असण्याची शक्यता असली तरी नेमक्या कोणत्या प्रतिमा श्री/ लक्ष्मीच्या असाव्यात हे आज तरी सांगणे कठीण आहे.
श्री/लक्ष्मी आणि संबंधित कल्पनांचा भारतीय दृश्यकलावर झालेल्या परिणामांचा खोलात विचार करावयाचा झाल्यास, लक्ष्मीशी संबंधित दोन प्रतीकांचा अधिक विचार करणे आवश्यक ठरेल. ती म्हणजे पद्म आणि बिल्व होत.
पद्मवर्णा, पद्मेस्थिता, पद्मिनी, पद्ममालिनी, पुष्करिणी, हेममालिनी अशा अनेक प्रकारे पद्माचा श्री/ लक्ष्मीशी जवळचा संबंध व्यक्त झाला आहे. त्यामुळे इ.स.च्या पाचव्या शतकापर्यंत अमरकोशातील समानार्थक पदे पाहिली तर, (लक्ष्मी: पद्मालया पद्मा कमला श्रीहरिप्रिया)- पद्म हे लक्ष्मीचे समानार्थक नाव झालेले दिसून येईल. प्राचीन कलेमध्ये लता/ पद्मलताना जन्म देणाऱ्या यक्षप्रतिमांचे बाहुल्य चटकन लक्षात येईल. lp28पाञ्चरात्र तत्त्वज्ञानातील अनिरुद्ध हा ढोबळमानाने पुराणातील शेषशायी विष्णूसारखा आहे. सृष्टीची उत्पत्ती व्हावी म्हणून ब्रह्मदेवाला निर्माण केले. त्यामुळे शेषशायीच्या नाभीतून उत्पन्न होणारे कमळ व त्यात उत्पन्न झालेला व त्यात बसलेला ब्रह्मा हे दोन्ही सर्जनाशी संबंधित असलेले देव. हिरण्यागर्भापासून विश्वाची उत्पत्ती होते, तर हिरण्यवर्णा लक्ष्मी कमळात निवास करून असते हे लक्षात घेता लक्ष्मी सर्जनाशी कशी निगडित आहे हे लक्षात येईल. लक्ष्मीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू भूदेवीशी निगडित आहे हे लक्षात घेता कर्दम, म्हणजे पाण्याने ओलसर झालेली जमीन तिचा पुत्र आहे आणि त्यातून ‘प्रजा’ निर्माण होते असा उल्लेख आहे. वैदिक दैवतकथांतून सृष्टीचे माता-पिता म्हणून नेहमी ‘द्यावा-भूमी’ आकाश आणि पृथ्वी या जोडीचा उल्लेख येतो. अथर्ववेदामध्ये ‘द्यौस्पिता’च्या ऐवजी पर्जन्य या पित्याचा पृथ्वी मातेबरोबर उल्लेख येतो. यासंदर्भात काही प्रागैतिहासिक प्रतीकांचा विचार करणे योग्य ठरेल. भूमीत दफन ही एक प्राचीन आणि सार्वत्रिक अशी परंपरा आहे. दख्खनमधील प्रागैतिहासिक ताम्रपाषाण संस्कृतीमधील काही प्रथांचा अभ्यास या संदर्भात मनोरंजक ठरेल. नवजाताचा मृत्यू किशोरावस्थेत झाला, तर एका लहानशा घागरीत त्याचा देह पुरण्याची प्रथा होती. जर प्रौढाचा मृत्यू झाला, तर आवश्यकतेनुसार ४-५ किंवा अधिक कुंभांचा वापर करून त्याचा देह जमिनीत पुरत असत. टोकाचे दोन कुंभ सोडून इतर कुंभाचे तळ फोडून तयार झालेल्या कुंभाच्या रांगेत तो देह ठेवला जाई. इनामगाव येथील उत्खननात मात्र दोन-तीन दफने अशी आढळली की, त्यात मोठय़ा रांजणांमध्ये मृतदेह गर्भावस्थेतील बालकाप्रमाणे मुडपून पुरण्यात आला होता. तसेच रांजणाचे उदर गर्भवती स्त्रीच्या उदराप्रमाणे फुगीर करण्यात आले होते. मृत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे त्याला वेगळ्या रीतीने पुरले असावे, असा उत्खनकाने अंदाज केला आणि फुगीर रांजणामुळे पृथ्वीमातेच्या उदरातून पुनश्च जन्म व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होते, हा कयास केला. यावरून असे स्पष्ट होईल की, कुंभ अथवा रांजण हे पृथ्वीमातेचे प्रतीक म्हणून त्याचा या संदर्भात वापर केला आहे. या संदर्भात काही पौराणिक व्रतांचा विचारही उपयुक्त ठरेल. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पितरांना उद्देशून जलपूर्ण सुगडाचे दान करावे असे सांगितले आहे. पितरांच्या आशीर्वादानेच संततीप्राप्ती होते अशी श्रद्धा या विधीमागे आहे. पण त्यातील जलाने भरलेल्या सुगडांचा वापर हा वरील विवेचनाच्या संदर्भात अर्थगर्भ वाटतो. पुराणांमध्ये हिरण्यागर्भदान नावाचा संस्कार दीर्घायुष्य, स्वर्गप्राप्ती आणि संततीसाठी करावा, असे सांगितले आहे. सोन्याचा रांजण करून त्यात यजमानाने गर्भावस्थेत शयन करावे व तो ब्राह्मणांना दान करावा असा विधी आहे. रांजणातील विधिपूर्वक शयन आणि हिरण्यगर्भ हे विधीचे नावच सूचक आहे. हा विधी इतका लोकप्रिय होता की चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांनी आपण तो केल्याचे अभिमानपूर्वक आपल्या ताम्रपटात नमूद केले आहे. ही उद्धृत केलेली तथ्ये लक्षात घेतली म्हणजे लज्जागौरीच्या उपासनेचे रहस्य चटकन आकळता येते. लज्जागौरीच्या प्रतिमांच्या पखरणीवरून तो पंथ/संप्रदाय उत्तर हिंदुस्थान व दक्खन यांमध्ये इ.स.पू. १ ले शतक ते ७ वे शतक यांदरम्यान जास्त प्रचारात होता असे दिसते. या आठशे वर्षांच्या कालखंडात लज्जागौरीच्या प्रतिमेच्या विधानात काही बदल घडत गेले. कॅरोल बोलन आणि रा. चिं. ढेरे या दोघांना प्रतिमांच्या ठेवणीत उत्तरोत्तर झालेल्या बदलात काही सूत्र असल्याचे प्रकर्षांने जाणवले आहे. ढेरे यांच्या मतानुसार प्रत्यक्ष वारुळाची पूजा ही वेगळी अवस्था न मानली तरी लज्जागौरीच्या प्रतिमा प्रतीकात्मक, साङ्ग आणि सपरिवार अशा तीन प्रकारात मोडतात. तर बोलन या १. कुंभ व कमळावर असलेला निम्मा स्त्रीदेह; २. त्यांना जोडलेले हस्त व स्तन; ३. सपरिवार प्रतिमा व ४. पार्वतीच्या रूपात असलेली अथवा समुख प्रतिमा अशा विकासाच्या अवस्था कल्पितात. मानवमुख असलेल्या लज्जागौरीच्या प्रतिमा (उदा. गुंफा २१ वेरुळ लेणी) वगळता प्रतिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे कंठापासून योनीपर्यंतचे कुंभाकृती धड व त्यावर मुखाऐवजी कमळ हा होय. लज्जागौरीच्या मूर्तीची मंदिराच्या किंवा गुहेच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली असल्यास ती उत्तानपाद स्वरूपात असते. ज्या काही सुटय़ा पूजा शिळा सापडल्या आहेत त्यांचीही पूजा त्या प्रतिमा उताण्या ठेवूनच केली जात असावी. अभिषेक हा या मूर्तीच्या पूजेचा अविभाज्य आणि अर्थपूर्ण संस्कार असला पाहिजे. आजही सिद्धनकोला येथील लज्जागौरीच्या उपासिका तिच्या योनीवर घृताचा अभिषेक करतात. नागपूर येथील सेंट्रल म्युझियममध्ये असलेल्या दोन लज्जागौरी प्रतिमांमध्ये खालच्या भागात पाणी साठवण्यासाठी चौकोनी कुंडाची व्यवस्था केली आहे. कदाचित त्यात सांडलेले पाणी तीर्थ म्हणून प्राशन करण्याचाही प्रघात असावा. पाकिस्तानात नव्याने उजेडात आलेल्या भीमादेवीसंबंधीचा पुरावा लक्षणीय आहे. ‘भीमादेण्या:’ असा मजकूर असलेले पाषाणाचे अनेक टाक (स्र्’ं०४ी) सापडले असून त्यासोबत एक कुषाणकालीन (इ.स. सुमारे तिसरे शतक) ताम्रपटही मिळाला आहे. त्यात भीमादेवीचे व्रत, त्याची पारणा इत्यादी संबंधीचा तपशील असून भीमादेवी संबंधीची बरीच रोचक माहिती मिळते. भीमादेवीची गुहा एका पहाडात असून तिचे दर्शन घेण्याअगोदर एका द्रोणीत स्नान करण्याची प्रथा असावी असे दिसते. काही टांकावर लज्जागौरीसारखीच रेखात्मक आकृती व शीर्षस्थानी कमळासारखे वर्तुळाकृती आरेखन आढळते व आकृतीसमोर दण्ड हातात घेऊन नृत्य करणारा उपासक आढळतो. तसेच हेही लक्षणीय आहे की, मार्कण्डेय पुराणातील दुर्गासप्तशतीत भीमा या महालक्ष्मीच्या अवताराचे वर्णन आले आहे. स्नान-द्रोणी, लज्जागौरीसारखी आकृती यांवरून या सृजनशील मातृदेवतेच्या काही पैलूंवर निश्चितच नवीन प्रकाश पडला आहे. तेर येथे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभागाने केलेल्या उत्खननात विटांनी बांधलेली पुष्करिणी मिळाली आहे. ही सातवाहनकाळातील असून तिच्या काठावर एका लहानशा हस्तिपृष्ठाकार देवालयाचे अवशेष मिळाले आहेत. सोबतच एक हस्तिदंती फणी मिळाली असून त्यावर एका बाजूला एका महिलेच्या साजशृंगाराचे आरेखन असून दुसऱ्या पृष्ठावर लक्ष्मीचे चित्रण आहे.
कुषाण आणि गुप्तकाळातील श्री/लक्ष्मीचे चित्रण
कुषाण काळात श्री/लक्ष्मीचे चित्रण निरनिराळ्या माध्यमांतून झाले आहे. भाजक्या मातीतील लघुप्रतिमा, पाषाणातील चहूबाजूंनी बघता येतील अशा प्रतिमा, नाण्यांवर आणि धातुपट्टांवरील अंकन अशा अनेक प्रकारच्या प्रतिमा प्रथमच निरीक्षणात येतात. जरी मथुरा ही कुषाणांची राजधानी असल्याची अनेक प्रमाणे देता येतील तरी त्यांच्या मध्य आशिया आणि अफगाणिस्तानापर्यंत सुदूर पसरलेल्या साम्राज्याची गान्धारातही परुषपुर येथे राजधानी होती. तसेच अय खनुम हे त्यांच्या कुळासाठी महत्त्वाचे ठिकाण होते. या बाबी लक्षात घेतल्या तर इ.स. १५०-३०० या काळासाठी गांधार शिला ही कुषाण शिल्प म्हणूनच गणावे लागेल. श्री/लक्ष्मीच्या पद्महस्ता किंवा पद्मालया या चित्रणाबरोबरच कुबेर या तिच्या पारिवारिक देवतेचे चित्रण ही महत्त्वाची बाब आहे. अभिषेकलक्ष्मीची काही गांधार शैलीतील चित्रणेही उपलब्ध आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुषाण साम्राज्यातील मध्य आशिया आणि अफगाणिस्तान या प्रदेशात आणि अनुषंगाने गांधार प्रदेशात धनधान्य-समृद्धीच्या इतर धार्मिक आणि वांशिक पाश्र्वभूमीतून आलेल्या देवतांशी लक्ष्मीचे साम्य झाल्याचे दिसते, त्यामुळे नना, अद्रोक्षा व त्यांचा प्रभाव असलेल्या हारीती या बौद्ध देवतांच्या काही लाञ्छनांचा व लक्ष्मीच्या लाञ्छनांचा परस्पर मेळ घडल्याचे दिसते. तसेच हारीती आणि पाञ्चिक यांच्या प्रतिमागुणविशेषांवर लक्ष्मी आणि कुबेर यांचाही प्रभाव पडल्याच दिसते. लक्ष्मी आणि यक्षाधिपती कुबेर हे पती-पत्नी म्हणून नाही, पण धनधान्य-समृद्धीच्या देवता म्हणून जनमानसात पक्क्या होत्या व त्यांची एकत्र पूजा केली जात असे हे मथुरा शैलीतल्या काही शिल्पांवरून स्पष्ट होते. आणि ही प्राचीन धारणा आजही दिवाळीत अमावस्येला लक्ष्मीकुबेरांचे पूजन होत या प्रथेत टिकून आहे, किंबहुना लक्ष्मी आणि विष्णू यांची पती-पत्नी ही जोडी पुढे पुराणकाळातच जमली आहे असे दिसते. लक्ष्मीने विष्णूला वरले ते समुद्रमंथनातून ती १४ रत्नांपैकी एक म्हणून अमृताबरोबर आली त्या वेळी. खिलसूक्तात विष्णुपत्नीचा उल्लेख येतो म्हणजे आपातत: लक्ष्मी ही विष्णूची पत्नी म्हणून खिलसूक्तांच्या काळात ज्ञात होती असे मानता येईल. पण इतरत्र तसा पुरावा आढळत नाही. या कथेच्या प्राचीनत्वाचा अथवा काळासंबंधीचा धांडोळा निरनिराळ्या पुराणांच्या कालनिश्चितीनंतर ठरविता येऊ शकेल. तो काळ कदाचित कुषाण-गुप्त संक्रमण काळ असावा हे कलैतिहासिक पुराव्याच्या साहाय्याने मांडता येते. कुषाणकाळापर्यंत विष्णूच्या प्रतिमेचे लक्षण समकालीन मूर्तीवरून ठरवीत होते. कुषाणकाळातील विष्णूमूर्तीच्या चार हातांत तीनच आयुधे आढळतात, ती अशी- शंख, चक्र आणि गदा. त्यातल्या त्यात प्राचीन विष्णूच्या मूर्तीत दक्षिणाध करक्रमाने त्याचे लाञ्छने अशी सांगता येतील- अभय, गदा, चक्र आणि शंख. गुप्तोत्तरकाळात त्याच्या चौथ्या हातात एक नवीन लाञ्छन येते ते कमळाच्या रूपाने व शेषशायी विष्णूच्या पायाशी लक्ष्मी गुप्त-चालुक्यांच्या प्रतिमांत आढळून येते. उदा. देवगड (उ.प्र) येथील दशावतार मंदिराच्या एका भद्रावर असलेल्या शेषशायीच्या शिलापटात व ऐहोळे येथील (व आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या भांडारात असलेल्या) शेषशायी मूर्तीत पायाशी लक्ष्मी आहे. पण आयुधपुरुषात पद्मपुरुषाचा अंतर्भाव नाही अथवा कमळ हे लाञ्छनही नाही. चतुर्भुज विष्णूच्या हातातील ही लाञ्छने गुप्तोत्तर काळात उत्तरेत आणि दक्षिणेत तीच आढळतात. फक्त त्यांचा क्रम उत्तरेत आणि दक्षिणेत वेगळा असतो. विष्णूच्या चौथ्या हातात कमळ हे लाञ्छन स्थिर होण्याअगोदरच्या काळात काही मूर्तीमध्ये एक गोल फळ दाखविलेले आढळते. हे निश्चितच बीजपूरक किंवा मातुलिंग नाही, कारण त्याच्या पृष्ठभागावर खवले नाहीत. ते बिल्वफळच असावे. या अगोदर विवेचिल्याप्रमाणे बिल्व हे लक्ष्मीचे फळ आहे. आणि विष्णुव्यतिरिक्त इतरही काही देवतांनी समकाळात हे फळ धारण केल्याचे दिसते.
अजिंठा येथील गुंफा क्र. १९च्या मुखावर (ऋूंंीि) चैत्य गवाक्षाच्या दोन्ही बाजूंना शंख-निधी आणि पद्मनिधी द्वारपाल म्हणून दाखविले आहेत. या द्वारपालांच्या प्रतिमा निधींच्या आहेत यात शंका नाही. कारण शेजारी उभा असलेला यक्ष धनाच्या पिशवीतून नाण्यांची रास जमिनीवर ओतताना दिसतो आहे. स्वत: शंखनिधीच्या हातात एक गोल फळ आहे. गुंफा क्र. २१ मध्ये गाभाऱ्यात भगवान बुद्धाची मूर्ती आहे. तिच्या दोन बाजूंस दोन बोधिसत्त्व आहेत. ते बहुधा वज्रपाणि आणि अवलोकितेश्वर असावेत. अवलोकितेश्वराच्या हातात एक गोल फळ आहे. ते बहुधा बिल्वफळच असावे. कारण ते अलक्ष्मीच्या नाशाचे द्योतक आहे, एवढेच नव्हे तर, सुप्रजननाचेही असावे. सद्धर्मपुण्डरीकसूत्रात अवलोकितेश्वराचा सर्वदद या नावाने महिमा गायिला आहे. अवलोकितेश्वर हा निरनिराळ्या संकटांत सापडलेल्या भक्तांची, त्यांनी मनापासून करुणा भाकल्यानंतर सुटका करतो. नेहमी ज्यांचे वर्णन येते ती संकटे म्हणजे- १. सिंह, २. हस्ति, ३. नाग, ४. दावानल, ५. दस्यु, ६. समुद्री वादळ. यांच्याबरोबरच काही वेळा हातात मूळ घेतलेले जोडपे दिसते. सद्धर्मपुण्डरीकसूत्राच्या २४व्या अध्यायात असेही वर्णन आले आहे की कदाचित शंकर, विष्णु इ. देवतांची करुणा भाकल्यानंतर संततीची प्राप्ती होणार नाही, पण अवलोकितेश्वराची करुणा भाकल्यास संतानप्राप्ती होऊ शकेल. कदाचित या व अशा कारणांमुळे अजिंठा येथील बोधिसत्त्व आणि यक्ष या प्रतिमांच्या हातात बेलफळ दाखविले असावे. उत्तर-lp29गुप्त आणि गुप्तोत्तर काळात मात्र विष्णूच्या प्रतिमेबाबत बेलफळाऐवजी पद्माचाच पर्याय घेतला असावा, कारण सृजनशीलतेचे लक्ष्मीचे खरे प्रतीक पद्मच होय.
श्री/लक्ष्मी आणि तिचे दोन पुत्र
चिक्लीत आणि कर्दम या दोन लक्ष्मीच्या पुत्रांविषयी याअगोदर विवेचन आले आहेच. कर्दम हा कृषिजन्य समृद्धीसाठी कारणीभूत, तर चिक्लीत हा मानव आणि पशुधनाच्या सुप्रजननासाठी कारणीभूत आहे. मथुरा येथील काही स्त्रीप्रतिमा स्तनातून पान्हा फोडण्याच्या आविर्भावात उभ्या असलेल्या दिसतात. वासुदेव शरण अग्रवाल इ. अभ्यासकांनी या मुद्रेला स्तनपायनमुद्रा असे नाव दिलेले आहे. या मुद्रेला भारतीय संस्कृती व शिल्पपरंपरेत काही विशिष्ट स्थान असले पाहिजे. लक्ष्मीची ‘पुष्टी,’ आणि ‘तृप्ता तर्पयन्ती’ ही बिरुदे अर्थगर्भ आहेत, आणि त्यामुळे कुषाणकाळातील मथुराशैलीमध्ये घडविलेली स्त्रीशिल्पे ही लक्ष्मीच्या पुष्टिरूपाची असावीत यात शंका नाही. ही परंपरा रसिक आणि कलाकारांच्या मनात इतकी खोलवर ठसली असली पाहिजे की, बालीमधील या ११व्या शतकात गुहेत कोरलेल्या विष्णुवर्धन स्मारकातील काही स्त्रीशिल्प या मुद्रेत आहेत. एरलंग्ग विष्णुवर्धनाच्या या समाधिस्थळात एरलंग्ग स्वत: विष्णुरूपात गरुडावर आरूढ असून या विष्णुमूर्तीच्या खालील भागात एक जलकुण्ड आहे. जलकुण्डाच्या भिंतीवर सुरसुंदरीसारख्या प्रतिमा कोरलेल्या असून त्यांच्या स्तनांतून जलधारा बाहेर पडत असतात. लक्ष्मीच्या पुष्टिरूपाचेच हे एक चित्रण आहे.
यासंदर्भात मातृदेवता आणि तिचे दोन पुत्र या संकल्पनांचा विचार करणे उचित ठरेल. लज्जागौरी आणि श्री/लक्ष्मी यांचा किती जवळचा संबंध आहे हे यापूर्वी आपण पाहिले आहेच. लज्जागौरी आणि पार्वती यांचेही अनेक बाबतीत साम्य आहे. पार्वतीचे स्कंद आणि गजानन हे औरस पुत्र नसले तरी ते दोन आहेत हा योगायोग नसावा. याहीपेक्षा बौेद्ध आणि जैन परंपरांचा अभ्यास करता हारिती आणि अम्बिका यांची उदाहरणे चटकन नजरेस भरतात. हारिती ही बौद्ध देवकुलातील एक वेगळीच देवता आहे. ती एक यक्षी आहे आणि यक्षांच्या एकूण प्रवृत्तीप्रमाणे शुभाशुभ- द्वन्द्वात्मक (ंे्रु५ं’ील्ल३) तिची प्रकृती आहे. पुराणकथेनुसार तिच्या पूर्वजन्माच्या संस्कारामुळे ती कव्यादप्रवृत्तीची झाली, विवाहानंतर तिला ५०० मुलेही झाली, पण नवजात अर्भकांना भक्षण करण्याची तिची प्रवृत्ती कमी होईना. भगवान बुद्धाकडे नगरीच्या प्रजाजनांनी या उपद्रवाविषयी तक्रार केल्यानंतर त्यांनी तिला धडा शिकवावयाचे ठरविले. तिच्या ५०० पुत्रांपैकी सर्वात लहान शुभंकर आणि प्रियंकर या दोन मुलांना त्यांनी आपल्या कमंडलूत गुप्त करून ठेवले. हारितीला हे कळल्यानंतर तिने भगवंताला आपले भीषण रूप दाखवून भेडसावयाचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेल्याने ती भगवंताला शरण गेली. भगवंताला तिची करुणा आली, पण तिच्या पुत्रांना परत करण्याअगोदर त्यांनी अट घातली की, नवजात अर्भकांना उपद्रवकारक ही नरभक्षक वृत्ती सोडून तू त्यांचे रक्षण करणे योग्य ठरेल. उपदेश पटल्यामुळे तिने यापुढे अहिंसक जीवन जगण्याचा निश्चय केला. पण मी उदरभरण कसे करावे असा प्रश्न तिने उपस्थित केल्यानंतर प्रत्येक विहारात भिक्षू स्वत:ची भिक्षा खाण्याअगोदर तुला आपल्या भिक्षेतील वाटा अर्पण करतील या आश्वासनानंतर ती अर्भकांचे रक्षण करणारी मातृदेवता झाली. अजंठा व वेरुळ येथील बौद्ध विहारात दोन पुत्र व पति पाञ्चिक यांच्या समवेत असलेल्या हारितीचे चित्रण अनेक ठिकाणी आढळते. गुंफा क्र. २ (अजिंठा) येथे तर मुख्य गाभाऱ्याशेजारील दोन देवळ्यांपैकी एका देवळीत पद्मनिधी व शंखनिधी यांच्या प्रतिमा आहेत, तर दुसऱ्या देवळीत हारिती आणि पाञ्चिक, दोन पुत्र आणि हारितीच्या आख्यानांचा शिल्पपट कोरलेला आहे. हारिती आणि श्री यांच्या साम्याचा वर उल्लेख केला आहेच, कदाचित हारिती आणि तिचे दोन पुत्र या व्यक्तिवैशिष्टय़ाबाबत श्री/लक्ष्मीच्या व्यक्तिरेखेचा तिच्यावर प्रभाव झाला असल्यास ते असंभव नाही असे वाटते.
जैन परंपरेतील पद्मावती आणि श्री/लक्ष्मी यांचा फारच जवळचा संबंध आहे. पद्मावतीच्या उपासनेचे उल्लेख सर्वप्रथम वनवासीच्या कदंब राजांपासून (इ.स. ५ वे शतक) असून त्यांनी पद्मावतीच्या देवस्थानाला भूमिदान केल्याचा उल्लेख आहे. श्री/लक्ष्मी आणि अंबिका आणि हारिती यांमधील साम्याचा मात्र विशेष उल्लेख केलाच पाहिजे. अंबिका ही ब्राह्मण कुळातील स्त्री नेमिनाथांची परमोपासिका होती, आणि ती अशीच भगवंताच्या दर्शनासाठी गिरनारला गेली असता, तिच्या संशयी नवऱ्याने तिचा पाठलाग केला आणि त्याच्या भीतीने तिने स्वत:चा कडेलोट करून घेतला. पुण्यप्रभावाने ती यक्षी म्हणून जन्माला आली. स्वत:च्या नावाला अनुरूप म्हणून ती आंब्याच्या झाडाखाली बसते. तिचा क्रूर नवरा या जन्मात तिचे वाहन सिंह होतो आणि शुभंकर आणि प्रियंकर हे तिचे पुत्र तिच्या जवळ असतात. तिच्याकडे आणि तिच्या बरोबरीचा सर्वाह्न् यक्ष हे यात्रेकरूंचे व तीर्थक्षेत्रांचे रक्षणकर्ते म्हणून भाविक त्यांची आराधना उपासना करतात. त्यातील शत्रुंजय, आबू आणि प्रतिष्ठान (आधुनिक पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र) ही उल्लेखनीय क्षेत्रे म्हणून सांगता येतील. संततीचे रक्षण करणारी देवता म्हणून आजही तिचे पूजन केले जाते, आणि अंबाजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या देवस्थानाला आजही हिंदू आणि जैन भाविक मोठय़ा संख्येने यात्रेसाठी जातात.

लक्ष्मी ते महालक्ष्मी- उपासना ते शाक्त आगम
देवतशास्त्रदृष्टय़ा श्री/लक्ष्मी ही इतर वैदिक देवतांपेक्षा एक वेगळीच देवता आहे यात शंका नाही. पृथिवी किंवा अदिती या वेदांतील अत्यंत महत्त्वाच्या देवता आहेत यात शंका नाही; पण आशय आणि व्यापाच्या दृष्टीने श्री/लक्ष्मी त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावी असली पाहिजे. कारण पृथिवीच्या धान्यसमृद्धीपेक्षा तिचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक आहे. ती मानव आणि (इतर) पशूंच्या सुप्रजननाचीच नव्हे तर सर्व भूतांची ईश्वरी आहे. त्याहीपेक्षा ती धनाची, इतर मानवावरील अधिकाराची, प्रभुत्व आणि ऐश्वर्याची दात्री देवता आहे. आणि खऱ्या अर्थाने, पुरातत्त्वीय भाषेत बोलावयाचे झाल्यास, द्वितीय नागरीकरणाची अधिष्ठात्री देवता आहे. वैदिक देवतांमध्ये तितकीच महत्त्वाची आणखी एक देवता आहे, ती आहे ‘अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदेवै:!’ म्हणून स्वत:ची ओळख करून देते ती रात्रिसूक्तातील देवी. वैदिक देवतांत श्री/लक्ष्मीच्या द्वंद्वरूपात राहणारी देवता मात्र एकच आहे. आणि ती म्हणजे तिची प्रतिद्वंद्वी क्षुत्-पिपासा- मल- अभूति- असमृद्धीची अधिष्ठात्री अलक्ष्मी.
रामयण-महाभारताच्या काळांत मातृदेवतांच्या दैवतकथांमध्ये एक मोठा बदल आढळून येतो. एका बाजूला विश्व आणि जीवसृष्टी यांचा मातृदेवतेच्या संदर्भात विचार केला असता २७ नक्षत्रे ही प्रजापतीच्या स्त्रिया आणि सुरभि, विनता, कद्रू इत्यादी प्राण्यांच्या माताही प्रजापतीच्या स्त्रिया अशी कल्पना करण्यात आली आहे. लक्ष्मी-लक्ष्मींच्या विरोधी द्वंद्वाचे प्रतिसाद आपल्याला मातृदेवता तसेच कुमार आणि स्कन्द यांच्या परस्परसंबंधावरून लक्षात येतात. मातृदेवतांना लोकमातृत्व स्कंदाच्या प्रसादामुळे मिळते, तर बालग्रह हे पापी लोकांच्या घरातच आम्ही वावरू, पापभीरूंच्या नाही असे आश्वासन देतात. स्कंदाची पत्नी ज्येष्ठा म्हणजे अलक्ष्मीच आहे हे यासंदर्भात लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रामायण-महाभारताचा काळ हा मातृदेवतांच्या दैवतशास्त्रीय विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा आहे. वेदकाळांत लक्ष्मी ही शुभ आणि अलक्ष्मी ही अमंगळ, या दोन शक्तींचा विरोध आढळतो. तर महाभारत-रामायणाच्या काळात अमंगळ प्रवृत्ती शुभाच्या प्रभावाखली येऊन फक्त पापीजनांना त्रासदायक होतात, पापभीरूंना नाही असा बदल घडतो.
शिव आणि विष्णू यांच्या देवी व्यक्तिमत्त्वात बदल होऊन उत्तरउपनिषद काळात ज्याप्रमाणे या दोन देवांचे स्वत:चे असे आगमनिष्ठ संप्रदाय उदयाला येतात- उदाहरणार्थ पाशुपत आणि पाञ्चरात्र, तसेच देवीच्या बाबतीत घडते, म्हणजे लक्ष्मीचा शाक्त संप्रदाय उदयाला येतो. आद्य शक्ती ही महालक्ष्मी असून महाकाली व महासरस्वती ही तिची ‘तामस’ आणि ‘राजस’ रूपे आहेत. सर्व देवतांची तेजे एकवटून महालक्ष्मी उभी राहते आणि सृष्टीचक्राला खीळ घालणाऱ्या दानवी-असुरी शक्तींचा ती नि:पात करते. मार्कण्डेय पुराणातील दुर्गा सप्तशतीच्या रूपाने महालक्ष्मीच्या प्रभावाचा हुंकार पौराणिक काळात निनादतो. धन-धान्यसमृद्धी, संतती, ऐश्वर्य यावर प्रभाव टाकणारी शक्ती, बा आणि आंतर अलक्ष्मींचा नाश करणारी सर्वभूतेश्वरी अशी लक्ष्मी अजा, एकानंशा, जगद्धात्री असुरसंहारकारिणी होते हा लक्ष्मी देवतेच्या दैवी व्यक्तिमत्त्वाचा परमोत्कर्ष बिंदू होय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:12 am

Web Title: laxmi poojan 2
टॅग Diwali
Next Stories
1 चांदीचा गाव : चांदीनगरी हुपरी
2 मेक टू ऑर्डर : तज्ज्ञ डॉक्टरचा आग्रह धरणं अत्यावश्यक – डॉ. मुकुंद थत्ते
3 मेक टू ऑर्डर : किशोरवयीन मुलांमधली क्रेझ ही चिंतेची बाब – डॉ अनिल टिब्रावाला
Just Now!
X