अनिकेत सुळे – response.lokprabha@expressindia.com

प्रा. शशीकुमार चित्रे यांचे काळाच्या पडद्याआड जाणे ही भारतीय खगोलशास्त्रासाठी एक मोठी घटना असली तरी या वाक्यात त्यांचे खरे महत्त्व अधोरेखित होत नाही. एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून आणि अलीकडच्या काळात एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी त्यांचे सर्वात मोठे योगदान या सर्वाच्याही पलीकडले होते. एक शिक्षक म्हणून, एक वडिलधारी व्यक्ती / सल्लागार म्हणून, एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी कित्येक विद्यार्थी, तरुण वैज्ञानिक आणि संस्थांच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावला आहे. त्यांच्या वैज्ञानिक कार्याची मोजदाद एक वेळ होऊ शकेल, मात्र त्यांना प्रेरणास्थानी मानणाऱ्या व्यक्ती / संस्थांची मोजदाद अशक्यच आहे.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री

प्रा. चित्रेंचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतात झाला (मे १९३६). त्यांचे बालपण मुंबईतील वांद्रे उपनगरात गेले आणि प्राथमिक शिक्षण वांद्रय़ाच्या सरकारी शाळेत झाले. त्या काळी वांद्रय़ात प्रथितयश माध्यमिक शाळा नसल्याने त्यांचे पुढील शिक्षण काही वर्षे पार्ले टिळक विद्यालय आणि नंतर दादरची किंग जॉर्ज (आताची राजा शिवाजी – इंग्रजी माध्यम) शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. गमतीचा भाग असा की, त्या काळी ब्रिटिश पद्धतीनुसार मुंबई विद्यापीठातही गणित विषयातील पदवी ही बीए अशी होती आणि सुदैवाने बीए केल्यानंतर तुम्ही विज्ञान क्षेत्रात काम कसे करू शकता? असले प्रश्न विचारणाऱ्या सरकारी बाबूंची चलती नव्हती, त्यामुळे प्रा. चित्रेंना पुढील कारकीर्दीत कोणताही अडसर आला नाही. गेल्या दोन दशकांत वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीसंदर्भात प्रा. चित्रेंना अनेक सरकारी अधिकाऱ्यांना भेटावे लागे. आंतरविद्याशाखीय शिक्षणाच्या संदर्भातील प्रा. चित्र्यांच्या कल्पनांना अशा नियमांचा खोडा घातला गेला की, हमखास चित्रे ही गोष्ट सांगत आणि मिश्कील हसू ओठांवर ठेवून म्हणत, ‘आय डोन्ट थिंक आय हॅव डन टू बॅडली इन सायन्स आफ्टर अ बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स’.

महाविद्यालयीन जीवनाचा काळ प्रा. चित्रेंनी आपल्या बुद्धिमत्तेने गाजवला आणि विद्यापीठातील अनेक मानसन्मान आणि शिष्यवृत्त्यांचे ते मानकरी ठरले आणि उच्चशिक्षणासाठी ते केंब्रिजला रवाना झाले (१९५६). या पहिल्या आंतरराष्ट्रीय जहाज प्रवासात त्यांची ओळख बनारसहून आलेल्या आणि केंब्रिजलाच जाणाऱ्या एका अन्य विद्यार्थ्यांशी झाली आणि ही मैत्री नंतर आयुष्यभर टिकली. हा सहाध्यायी आणि मित्र म्हणजे प्रा. जयंत नारळीकर! प्रा. नारळीकरांशी जहाजातील उपाहारगृहात झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा प्रा. चित्रे अनेकदा रंगवून रंगवून सांगत. पाश्चात्त्य जेवणात अनेकदा मांसाचा चवदार भाजलेला तुकडा (२३ीं‘) हा मुख्य भाग असतो आणि हा तुकडा कितपत भाजलेला आवडेल हे खाणाऱ्याला विचारले जाते. हा काहीतरी नवीनच प्रकार होता. आम्ही घरी जेवताना आमची आई कधी आम्हाला ‘कितपत भाजू / तळू रे?’ असं विचारायची नाही. सरळ बनवलेला पदार्थ ताटात यायचा. त्यामुळे आता प्रश्न पडला की काय सांगावे? त्यातल्या त्यात रेअर/ मीडिअम / वेल-डनपैकी वेल-डन म्हणजे काहीतरी चांगले असेल असा विचार करून आम्ही जोरात वेल-डन हवे असे सांगितले. पण समोर आलेला तुकडा इतका वातड होता की काटय़ाचमच्यानेही तो कापता कापता आमची पुरेवाट झाली. मी जयंतरावांना म्हटले की, आता तीन वर्षे जर असेच जेवण मिळणार असेल तर जरा कठीणच आहे.

मात्र तशी काही वेळ आली नाही. चित्रे आणि नारळीकरांना केंब्रिजही आवडले आणि पाश्चात्त्य जेवणाचे तंत्रही जमले. या काळात केंब्रिजच्या गणित विभागात (खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र हा गणिताचाच भाग समजला जाई) जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर फ्रेड हॉइल या जगविख्यात खगोलशास्त्रज्ञाचा प्रभाव पडत असे. प्रा. चित्रे सांगायचे आम्हा विद्यार्थ्यांना हॉइल वगैरे मंडळी शास्त्रज्ञ म्हणून किती नावाजलेले आहेत याची थोडीफार कल्पना होती. पण आम्ही त्यांच्याकडे आकृष्ट झालो ते त्यांच्या वर्गातल्या व्याख्यानांमुळे! काही शास्त्रज्ञांना वाटते की पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिकवणे हा त्यांच्या वेळेचा अपव्यय आहे. पण विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवण्यातून जी प्रेरणा मिळते ती अनमोल असते. आणि अगदी स्वत:पुरता विचार केला तरी शिकवण्याने तुम्हाला तुमच्या विषयातील मूलभूत संकल्पनांवर विचार करायची संधी मिळते, तुमच्यातील विज्ञानविचारांना खुलविण्याचे काम ही व्याख्याने अलगद करत असतात आणि जर तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी दिली, तरच तुम्हाला भविष्यात चांगले विद्यार्थी मिळतील, ज्यांच्यावर तेव्हा तुम्हाला कमी मेहनत करावी लागेल. चित्रेंनी हॉइल, लिटिलटन इत्यादींच्या व्याख्यानवर्गातील नोंदी अगदी अलीकडेपर्यंत जपून ठेवल्या होत्या. ते शिकवायला जाताना हमखास त्यांच्या हातात सुवाच्य हस्ताक्षरातल्या, पण पिवळ्या पडलेल्या सुटय़ा कागदांचा गठ्ठा असे.

केंब्रिजमधून गणिताची पदवी घेतल्यानंतर त्यांनी केंब्रिजमधूनच प्रा. कॉवलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सौरडागांची रचना’ या विषयात १९६३ साली पीएचडी संपादन केली. काही वर्षे लिड्स विद्यापीठ व अमेरिकेतील कॅलटेक येथे संशोधन केल्यानंतर ते १९६८ साली भारतात परतून टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) रुजू झाले व पुढची ३३ वर्षे ते या संस्थेचा अविभाज्य भाग होते. अर्थात त्यांचे केंब्रिज आणि कॅलटेकशी असलेले संबंध आयुष्यभर कायम राहिले आणि तिथल्या स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोज, डग्लस गॉफ, रुथ बेल, किप थॉर्न इत्यादी सहवैज्ञानिकांशी त्यांची मैत्रीही टिकून राहिली. त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन हे सर्व शास्त्रज्ञ गेल्या २५ वर्षांत भारतात अनेकदा येऊनही गेले. ऑक्टोबर २०२० मध्ये पेनरोज यांची निवड नोबेल पारितोषिकासाठी झाल्यावर चित्रे केवळ अभिनंदन करून थांबले नाहीत, त्यांनी प्रा. पेनरोज यांना मार्च महिन्यात भारतात येण्याचे आग्रहाचे आमंत्रणही दिले आणि ९१ वर्षांच्या पेनरोज यांनी ते स्वीकारलेही. मात्र त्यानंतर पंधरवडय़ात चित्रेंची प्रकृती ढासळली.

टीआयएफआरमध्ये काम करताना प्रा. चित्रेंनी खगोलशास्त्रातल्या अनेक विषयांवर संशोधन केले. त्यांचा सूर्याचा अभ्यास चालूच राहिला, मात्र त्याबरोबरच पल्सारचे चुंबकत्व, विश्वरचनाशास्त्र, गुरुत्वीय भिंगे अशा अनेक विषयांत त्यांनी शोधनिबंध लिहिले. निवृत्तीनंतरही त्यांच्या संशोधनकार्यात खंड पडला नाही. अगदी २०२० वर्षांतही त्यांचे तीन शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या विविध शोधनिबंधातल्या सहसंशोधकांची यादी काढली तरी त्यांच्या प्रतिभेचा आवाका लक्षात येतो. आयुष्याच्या उत्तरार्धात विज्ञान संशोधन, विज्ञान शिक्षण आणि विज्ञान धोरणविषयक विविध समित्यांवर काम करताना डॉ. कस्तुरीरंगन, डॉ. चिदंबरम, डॉ. काकोडकर,  संशोधनकार्याबरोबरच चित्रे मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत होते. टीआयएफआरमधील प्रख्यात ‘भारतभाग्यविधाता’ हे म्युरल चितारण्यासाठी मकबुल फिदा हुसैन काही आठवडे तिथेमध्ये मुक्काम ठोकून होते तेव्हा त्यांचे चित्रे परिवाराशी मैत्र जमले. नेहरू तारांगणाच्या निर्मितीच्या वेळेस आवाजाचा सुयोग्य वापर कसा करावा हे शिकण्यानिमित्ताने दिलीप कुमारशी त्यांचा संबंध आला. नेहरू केंद्र, जमशेटजी टाटा विश्वस्त निधी, होमी भाभा शिष्यवृत्ती समिती, केंब्रिज नेहरू शिष्यवृत्ती समिती अशा विविधांगी समित्यांवर काम करताना त्यांचा श्याम बेनेगल, रतन टाटा, जमशेद भाभा अशा व्यक्तिमत्त्वांशी जवळून संबंध आला.

२००१ मध्ये टीआयएफआरमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी विद्यापीठ क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले. पाच वर्षे मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र शिकवताना संशोधनसंस्था आणि विद्यापीठांतील फरक त्यांना जवळून पाहता आला. विद्यापीठातील ‘कडीकुलूप संस्कृती’ने त्यांनाही अनेकदा दणका दिला. कधी व्याख्यान द्यायचे आहे, पण वर्गाला कुलूप तर कधी दोन व्याख्यानांच्या मधल्या वेळात शौचालयाचा वापर करायचा आहे, पण शौचालयाला कुलूप अशा घटनाही घडल्या, पण त्यांनी त्या हसण्यावारी नेल्या. मात्र या अनुभवांतून विद्यापीठ क्षेत्राला नवचैतन्याची गरज आहे आणि त्यासाठी एका अशा संस्थेची निर्मिती करावी जी विद्यापीठाला उत्कृष्टतेची कास धरण्याची आतून प्रेरणा देईल असे त्यांना जाणवले. याच ध्यासातून यूएम- डीएई- सीईबीएस या ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ अशा संस्थेची स्थापना २००७ साली मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलामध्ये झाली. आपल्या आयुष्याच्या अखेपर्यंत प्रा. चित्रे या संस्थेसाठी कार्यरत होते.

सीईबीएसची सुरुवात करताना इमारती तयार नव्हत्या, शिक्षकांच्या नेमणुका झाल्या नव्हत्या, विद्यार्थ्यांचे वसतिगृहही पूर्ण तयार नव्हते. पण प्रा. चित्र्यांचा आत्मविश्वास दुर्दम्य होता. संस्थेसाठी पूर्णवेळ काम करणारे दोघेच म्हणजे प्रा. चित्रे आणि नवनियुक्त संचालक प्रा. माथुर, सोबतीला इतर संस्थांमधले शिक्षक अशी ती संस्था सुरू झाली. त्या पहिल्या काही वर्षांत रोज चित्रेंसोबत बोलण्याची संधी मिळत असे. चित्रेंची खासियत ही की, कोणत्याही अन्य व्यक्तीस ते बरोबरीने वागवत. मग वयाचा वा अनुभवाचा फरक त्याच्या आड येत नसे. नवीन संस्थेच्या शैक्षणिक धोरणापासून ते देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रातील अग्रक्रमांच्या यादीपर्यंत सर्व विषयांत ते लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाची मते ऐकून घेत असत. त्यातून त्यांना नवीन कल्पना मिळत असत तर कधी स्वत:ची कल्पना बोलून दाखवून ‘सांग पाहू तुला याबद्दल काय वाटते?’ अशी प्रांजळ पृच्छा करत.

चित्रे शिक्षक म्हणून जेव्हा फळ्यासमोर उभे राहत तेव्हा त्यांना पाहणे हा एक वेगळाच सोहळा होता. त्यांचा मूळ पिंड शिक्षकाचा होता. वयाच्या ८०व्या वर्षीदेखील ते उत्साहाने सलग ९० मिनिटे शिकवू शकत. मुलांना परीक्षा देण्याऐवजी छोटेखानी संशोधन प्रकल्प द्यावा व त्या आधारे त्यांचे मूल्यमापन करावे यासाठी ते आग्रही असत.

दोन महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांच्याशी अखेरचे बोलणे झाले तेव्हा पुढील वर्षांत काय काय करता येईल, पेनरोज मार्चमध्ये आले तर त्यांना कुठे कुठे न्यावे, पुढील सत्रात ते कुठला विषय शिकवणार आहेत आणि मी कुठला विषय शिकवावा अशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. तो दूरध्वनी अखेरचा असेल असे वाटले नव्हते. त्यानंतर एकदोनदा फोन केला असता ते प्रकृतिअस्वास्थ्यामुळे फोन घेऊ शकले नाहीत आणि इस्पितळातही ते आयसीयूमध्ये असल्याने भेट शक्य झाली नाही. अखेर ११ जानेवारी रोजी ‘वी ऑल आर मेड अप ऑफ स्टारडस्ट’ असे सांगणारा हा सूर्यसाधक सूर्यासमान तप्त भडाग्नीत विलीन झाला!

(लेखक होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात सहयोगी प्राध्यापक आहेत.)