lp06गुरुपौर्णिमा विशेषांकातील ‘सामान्याचे असामान्य गुरू’ हा लेख वाचला. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना प्रसिद्धीमाध्यमातून श्रद्धांजली वाहताना प्रकर्षांने जाणवलेल्या एका गोष्टीबद्दल सांगावेसे वाटते. डॉ. कलामांनी सुरू केलेली ‘पूरा’ म्हणजेच प्रोव्हायडिंग अर्बन अ‍ॅमीनिटीज इन रुरल एरिया (ढ१५्र्िरल्लॠ व१ुंल्ल अेील्ल्र३्री२ ्रल्ल फ४१ं’ अ१ीं२). शहरांमधील साऱ्या सुखसुविधा खेडय़ांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना. त्यात मूलभूत पाणी, अन्न, निवारा या मूलभूत गरजा तर आल्याच, पण त्याचबरोबर उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्यसेवा, संगणकाच्या माध्यमातून अद्ययावत माहिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कनेक्टिव्हिट, रस्ते, वीजपुरवठा, इ. बाबींचा समावेश आहे.
या सर्वाची आठवण पुन्हा एकदा होण्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारचा स्मार्ट सिटी संकल्प. देशभरातील १०० शहरांना स्मार्ट करण्याचा निर्णय. फारच मोठा मनसुबा. महाराष्ट्रातील दहा शहरंदेखील आहेत. केंद्र सरकार ५०० कोटी देणार, राज्य सरकार २५० कोटी आणि महानगरपालिका २५० कोटी. पाच र्वषत शंभर शहरं स्मार्ट करणार. यात लोकसंख्यावाढीचा विचार कितपत आहे कळत नाही. असो.
पण मग खेडय़ांचा विचार कोण करणार. दरवर्षी एक हजार कोटी खर्चून समजा दहा खेडी जिल्हा शहराच्या परिसरातली सुधारायची ठरवली तरी प्रत्येक खेडय़ाला दरवर्षी शंभर कोटी रुपये मिळतील. पाच वर्षांत पन्नास खेडी तरी स्वयंपूर्ण, आधुनिक आणि निरामय होतील. सौरऊर्जेचा वापर करून शेतीचा फायदा करता येईल. शेतकरी आत्महत्या कमी होतील. तरुण वर्ग शास्त्रोक्त पद्धतीने शेती करेल. उद्योगधंद्यांना पूरक ठरेल. महात्मा गांधींच्या आत्म्याला समाधान वाटेल आणि कलामांचे स्वप्न पूर्णत्वास जाईल.
डॉ. कलाम यांचे रामेश्वरम अथवा अन्य ठिकाणी योग्य ते स्मारक होईलच, पण त्यांचे खऱ्या अर्थाने स्मरण ठेवायचे असेल तर ‘पूरा’ योजना पूर्णत्वास न्यायला हवी. अण्णा हजारेंसारख्या समाजसुधारकांनी कोणता तरी राजकीय विषय घेऊन धरणे, मोर्चा आंदोलन करण्यापेक्षा अशा उपक्रमाचे व्रत घ्यावे. क्लस्टर ऑफ व्हिलेजेस जर उभी राहिली तर क्रांती होईल.
अरविंद किणीकर, ठाणे.

उत्तम व संग्राह्य़ विशेषांक
‘लोकप्रभा’चा गुरुपौर्णिमा विशेषांक हाती येताच, सर्वसामान्यांचे असामान्य गुरू हा सुंदर लेख आधी वाचला. डॉ. अब्दुल कलाम हे सर्वार्थाने असामान्यांचे गुरू होते. राष्ट्रपती झाल्यावर आपण या देशाचे प्रथम नागरिक व वैज्ञानिक म्हणून देशाचे काय देणे लागतो याचा त्यांनी सतत विचार केला व भारत एक महासत्ता हे स्वप्न सर्वाना सांगितले व सत्यात यावे यासाठी दिशा दिली. लहान मुले व तरुण यांच्यावरच विश्वास ठेवावा हा संदश दिला. एकाअर्थाने ते राष्ट्रगुरू या पदालाच पोहोचले.
अंकातील सर्वच लेख उत्तम आहेत. सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींनी आपआपल्या गुरूमुळेच आपण आहोत हे उलगडून दाखविले आहे. मग चित्रकला असो, संगीत असो, खेळ असो किंवा दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंची आख्यायिका असो. आपल्या जीवनात येणारा प्रत्येकजण जेव्हा आपल्याला काही विचार देतो, सांगतो तो प्रत्येकजण आपला गुरू असतो. जीवनाच्या वाटेवरचा वाटाडय़ा असतो. कधी दुरून मार्गदर्शन करणारा तर कधी हाती धरून आपल्यासह चालणारा सांगाती होतो. हा सारा आशय या विशेषांकाने सांगितला. एक संग्राह्य़ अंक वाचकांना दिल्याबद्दल ‘लोकप्रभा’चे आभार.
निळकंठ नामजोशी, पालघर.

स्वत:शी संवाद महत्त्वाचा
‘मन नावाचा गुरू’ हा रश्मी जोशी यांनी लिहिलेला लेख उल्लेखनीय वाटला. माणसाचा आतला आवाज साथ देत असतो. पण त्याचा विचार सामान्यपणे कोणी करत नाही. दुसऱ्याच्या अनुभवावरूनच आपण निर्णय घेतो. पण हे किती चुकीचे आहे हे या लेखावरून आपणास पटते. आपल्या मनाचा कौल घेतला पाहिजे. मागील पिढी मोठय़ा माणसांच्या सल्ल्याप्रमाणे वागे व ते पटवून देण्यासाठी मोठी माणसेदेखील ‘पावसाळ्या’च्या गोष्टी ऐकवून इथवर आल्याचे पटवून देत. फार पूर्वी असे नसावे. आताप्रमाणेच तरुण पिढी निर्णय स्वत:च घेत होती. शास्त्राप्रमाणे म्हणजेच ‘श्रुती ऊर्फ वेद’ही असेच सांगतात. हा आत्मा मीच आहे. अर्थात मीच ब्रह्म आहे. तोच आतला आवाज ओळखणे हेच महत्त्वाचे आहे. व तो ओळखण्यासाठी गुरूचे साहाय्य लागेल नाहीतर अहंभाव किंवा देहात्मभाव वाढतो. जो आत्मज्ञानासाठी धोका ठरतो किंवा बाधक असतो. स्वत:च्या अनुभवातून स्वत: शिकणे महत्त्वाचे. स्वत:चा स्वत:शी संवाद घडवणे गरजेचे आहे.
डॉ. शैलजा अयाचित.

गुरुपौर्णिमा विशेषांक आवडला
‘गुरुपौर्णिमा’ विशेषांक संग्रही ठेवावा असाच आहे. सर्वच गुरू-शिष्यांचे लेख वाचनीय आहेत. सर्वच क्षेत्रांतील गुरूंचे योगदान मोलाचे आहे. आध्यात्मिक गुरू-शिष्य परंपरा ते आधुनिक तंत्रज्ञानातील मेंटॉर व नेट गुरू या सर्वाचा छान ऊहापोह झाला आहे. गुरू-शिष्य नात्याचे अनेक पैलू उलगडून दाखविणाऱ्या पुस्तकांचा परिचय ग्रंथांचे महत्त्व सांगतो. तसेच दत्तात्रेयांच्या २४ गुरूंचा तपशील पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ गुरू आहे याची प्रचीती येते.
ॠतुजा गुरव, कोल्हापूर.

नव्या जुन्याचा संगम
गुरुपौर्णिमा विशेषांक म्हणजे नव्या आणि जुन्या पिढीच्या विचारांचा संगम म्हणावा असाच आहे. पारंपरिक गुरू संकल्पना तर आपण मांडलीच आहे, पण त्याचबरोबर आजच्या पिढीच्या मनात गुरूबद्दल नेमकी भावना देखील व्यक्त झाली आहे. आपल्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद
संजय गायकवाड, कल्याण.

कथेमध्ये तर्कसुंसंगतता असावी
पाच जूनच्या अंकातील स्वाती वढावकर यांची ‘सुखद निर्णय’ ही कथा वाचल्यानंतर काही मुद्दे खटकले.
मेजर आदेश यांनी घरी येऊन विभावरीला अरुणासाठी इन्व्हिटेशन कार्ड दिले होते. त्याच कार्यक्रमास विभावरी व अरुण (भाऊ) उपस्थित होते. तेथे त्यांना आदेश यांचे एक महिन्यापूर्वी लग्न झाल्याचे समजल्याने विभावरीवर मानसिक आघात होतो. पण कार्डमध्ये (जे पूर्वीच मिळालं होतं) पार्टीच्या कारणाचा उल्लेख (म्हणजे लग्नाची पार्टी) निश्चितच असावा. त्यामुळे तार्किकदृष्टय़ा प्रसंगसंगती मनास पटत नाही.
आदेशचे लग्न झाल्याचे समजल्यावर मानसिक आघातानंतर विभावरीस डॉ. सुदेश गुप्ते पार्टीत भेटतात. त्यांच्याशी कॅ. अरुण (भाऊ) हे विभावरीचे लग्न ठरवतात. अरुण व विभावरीची पार्टीत उपस्थिती ही केवळ विभावरीचे लग्न ठरविण्यासाठीच असते? त्यापूर्वीच इतर मार्गाने (उदा. प्रेमलग्न किंवा योजून लग्न इ.) लग्नाचे प्रयत्न झालेच नाहीत?
कथेमध्ये तर्कसुंसंगतता असावी ही अपेक्षा.
रघुनाथ सोनार, डोंबिवली.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ
‘लोकप्रभा’चा स्वातंत्र दिन विशेषांक, माहितीपूर्ण आणि संग्रही ठेवण्याजोगा आहे. आजकाल बऱ्याच लोकांना वर्षांतून एकदा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याची आठवण होते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, कारण त्याबरोबर जबाबदारीची जाणीव महत्त्वाची. जगात कोण खरा स्वतंत्र आहे, आकाशात मुक्त विहार करणारे विहंग, कधी रानावनांत, कधी अथांग सागरात, तर कधी उंच उंच पर्वत शिखरावर तर घटकेत खोल दरीच्या पोटात सूर मारत अगदी मोकळेपणाने सर्वत्र विहार करीत असतात. तरीदेखील त्यांना जाणीव असते, किती दूर आपण उडू शकतो, कधी तरी थांबायला हवे हे पक्ष्यांना बरोबर कळते, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते.
हाच फरक मनुष्यप्राणी आणि विहंगामध्ये आहे. मनुष्यप्राण्याला वाटते आपले ते स्वातंत्र्य? मला दहीहंडीत डी. जे. कर्कशपणे लावायचे स्वातंत्र्य आहे, पण ध्वनिप्रदूषणामुळे आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहोत, याचे भानही नसते.
परदेशी मोठय़ा पगाराची नोकरी मिळाली म्हणून वृद्ध आई-वडिलांना एकटे टाकून आपले आपले स्वातंत्र्य उपभोगणारी मुले आई-वडिलांच्या भावनांचा विचारदेखील करीत नाहीत. भरपूर पैसे पाठवले म्हणजे आपली कर्तव्यपूर्ती झाली असे त्यांना वाटते. मला वाटते स्वातंत्र्य आणि जबाबदारी ह्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विशेषत: राजकारण्यांना समजेल तो खरा सुदिन होय.
प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे. मुंबई.

एक शून्य शून्यला उजाळा
क्राइम टाइम, प्राइम टाइम ही एक चांगली कव्हर स्टोरी वाचनात आली. सध्या विविध वाहिन्यांवरील क्राइम शोजनी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आता बहुतेक सर्वच घरांमध्ये केबलमुळे मनोरंजनाचा खजिनाच उपलब्ध झाला आहे. आबालवृद्ध टीव्हीवरील सारे कार्यक्रम पाहात असतात. पण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईसारख्या शहरात चाळीत एखाद्या घरातच टीव्ही असायचा. अगदी रंगीत टीव्हीचा उदय झाल्यावरदेखील कृ ष्णधवल टीव्ही ही चैनीची बाब असायची. सुरुवातीस असणारे मोजक्या तासांचे प्रक्षेपण नंतर रात्री अकरा-साडेअकरापर्यंत वाढविण्यात आले. त्या काळात दूरदर्शनवरील एक शून्य शून्य मालिकेने कमालिची लोकप्रियता मिळवली. साध्या पोशाखातील शिवाजी साटम, अनंत जोग आणि दीपक शिर्के हे या मालिकेतील पोलीस सर्वानाच आवडायचे. करमचंद, तिसरा डोळा अशा अनेक मालिकांची त्या वेळीदेखील रेलचेल होती. या लेखाच्या निमित्ताने त्याला उजाळा मिळाला.
सुहास बसणकर, दादर.

तीन जुलैच्या अंकातील ‘हुरहुर लावणारी एक्झिट’ हा वसुधा कुलकर्णी यांनी जुन्या जमान्यातील प्रसिद्ध गायिका कुंदा बोकील यांच्यावर लिहिलेला लेख आवडला. त्यांची वैयक्तिक माहितीदेखील काही प्रमाणात हवी होती. मृत्यूसमयी त्यांचं वय किती होतं याबद्दल लिहायला हवं होतं. अशा लेखात ही सर्व माहिती असावी, लेख परिपूर्ण असावा असं माझं व्यक्तिश: मत आहे.
– प्रभाकर खरवडे, नागपूर</strong>

भारतीय रेल्वे कधी सुधारणार हा १२ जूनच्या अंकातील संजयंत सहस्रबुद्धे यांचा लेख आवडला. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प, मंजूर असून निधीअभावी रखडलेले प्रकल्प, गेज परिवर्तन, भविष्यातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर आपण एक विशेष अंकच काढावा. त्या अंकाची एक प्रत रेल्वेमंत्र्यांना द्यावी.
– रमेश रामचंद्र गुटकळ, बारामती.

२६ जूनच्या अंकातील वैद्य प. य. खडीवाले वैद्य यांचा ‘योगसाधनेचा आनंदयोग’ हा माहितीपूर्ण लेख फार आवडला. योगाने शरीर सुंदर होते व आयुष्य वाढते. मानवाच्या गरजांबरोबरच चौथी गरज म्हणजे वाचन ही चांगली सवय आहे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते.
महादेव चांगू मोकल, कारावी, ता. पेण.