मोहमद थवेर, सागर राजपूत, सदाफ मोडक – response.lokprabha@expressindia.com

अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली जाते. एक चोरीची गाडी सापडते. तिच्या मालकाचा  मृतदेह खाडीत सापडतो. एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक होते. गृहमंत्र्यांची खुर्ची वाचवण्यासाठी पोलीस आयुक्तांची बदली होते. गृहमंत्र्यांनी आपल्याला खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले होते असा आरोप ते पोलीस आयुक्त करतात. गेले महिनाभर सुरू असलेल्या मुंबईतल्या पोलीस तसेच राजकीय जगताच्या सनसनाटी घटनांचा आणि त्या सगळ्यामागे असलेल्या सचिन हिंदुराव वाझे या माणसाचा ‘इंडियन एक्स्प्रेस’ने घेतलेला वेध.

‘उनको भी जवाब दूंगा मै.. मै सचिन वाझे हूँ..’ (‘मी सचिन वाझे आहे. मी त्यालाही दाखवून देईन.’)

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ५ मार्च रोजी एक धक्कादायक माहिती दिली. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवून धमकी दिल्याचा मुंबईतल्या एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर त्यांनी आरोप केला. त्यानंतर त्याच दिवशी यासंदर्भात माध्यमांशी बोलणारी एकमेव व्यक्ती होती, या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हिंदुराव वाझे.

फेब्रुवारी २५ रोजी मुंबईत अल्टामाऊंट रोड इथं अँटालिया या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ आढळली. या गाडीमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांडय़ा आणि धमकीचं पत्र आढळलं. तपासाअंती ही गाडी ठाण्यातील ऑटो डेकॉरचे डीलर मनसुख हिरेन यांची असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी आपली ही कार चोरीला गेल्याची १८ फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती. ५ मार्च रोजी मुंब्य्राच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.

क्राइम इंटेलिजन्स युनिटचे (सीआययू) अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. ते हिरेन यांना या प्रसंगाच्या आधीपासूनच ओळखत होते असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी वाझे आणि हिरेन यांच्यामधील संभाषणाचा सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ही फक्त सुरुवात होती. तेव्हापासून बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचं आणि हिरेन यांच्या मृत्यूंचं अशा दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे दिलेला आहे. या दोन्ही प्रकरणांच्या निमित्ताने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रातलं राजकारण या दोन्ही क्षेत्रांमधल्या भानगडींची रोज नवनवी माहिती बाहेर येत आहे. या सगळ्या प्रकरणात आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या चुकांच्या परिणामी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना आपलं पद सोडावं लागलं. त्यांची बदली झाली. त्यानंतर तीन दिवसांनी, शनिवारी त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी खंडणी गोळा करण्यासाठी वाझे यांचा वापर केला असा गंभीर आरोप केला.

फडणवीस यांनी ज्या दिवशी विधानसभेत आरोप केले त्याच दिवशी म्हणजे ५ मार्च रोजी, वाझे मुंबईतील पोलीस मुख्यालयाच्या नव्या इमातरतीत चौथ्या मजल्यावरच्या आपल्या केबिनमध्ये बसून त्यांना विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं बिनधास्तपणे उत्तर देत होते.

‘तुम्ही हिरेन यांना ओळखत होतात का?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘हे म्हणजे तुम्ही मला, मी शर्ट का घातला आहे आणि टी शर्ट का घातला नाही असं विचारण्यासारखं आहे. हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हा प्रश्न कसा काय असू शकतो?’

मग ते पत्रकारांना त्यांनी या प्रकरणात काय शोधायला हवं हे सांगायला लागले. ‘हे बघा, ती स्कॉर्पिओ कोण चालवत होतं आणि ती व्यक्ती त्या गाडीतून बाहेर कशी पडली हा माझ्या दृष्टीने या प्रकरणात अनुत्तरित राहिलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. उपलब्ध झालेल्या चित्रीकरणातून ती व्यक्ती स्कॉर्पिओमधून बाहेर कशी आली आणि त्या स्कॉर्पिओच्या मागून आलेल्या इनोव्हामध्ये कशी शिरली हे स्पष्ट दिसत नाहीये. तुम्ही त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे.’

‘अनुत्तरित’ राहिलेल्या या ‘सगळ्यात महत्त्वाच्या’ प्रश्नाचं उत्तर वाझेंनाच माहीत होतं हे नंतर स्पष्ट झालं.

अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओ ठेवण्याच्या त्या सगळ्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी त्या रात्री ती इनोव्हा आली होती आणि ती वाझेच चालवत होते असं एनआयएने सांगितलं. एनआयएच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, ती स्कॉर्पिओ वाझेंच्या क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटमधल्याच कुणी तरी चालवत तिथे आणली. एनआयएकडून किमान सीआययूच्या किमान पाच पोलिसांची चौकशी सुरू आहे.

एनआयएच्या तपासात असा दावा करण्यात आला आहे की, अगदी पहिल्या दिवसापासूनच वाझेंनी अनेक संशयास्पद गोष्टी निर्माण केल्या. कोर्टाकडे वाझेचा ताबा मागण्यासाठी केलेल्या अर्जात एनआयएने असा आरोप केला आहे की, आपली योजना फसली आहे हे वाझेच्या लक्षात आल्यावर वाझेच्या टीमने या सगळ्याशी त्याचा  संबंध जोडणारे पुरावे नष्ट केले.

एनआयएने हे प्रकरण ताब्यात घेण्याआधी महाराष्ट्र अ‍ॅण्टि टेररिझम स्क्वॉड (एटीएस)ने वाझेच्या सीआययूकडून ते पुरावे ताब्यात घेतलं होतं. ५ मार्च रोजी हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याआधी तीन दिवस वाझेनेच हिरेन यांना पोलीस तसंच माध्यमांच्या विरोधात सरकारकडे लेखी तक्रार करायला लावली होती. हिरेन यांच्या पत्रात आपल्याला चौकशीत तेच प्रश्न पुन:पुन्हा विचारले जात आहेत अशी वाझेविरुद्धदेखील तक्रार करण्यात आली होती.

या पत्राचे दोन हेतू आहेत असा एटीएसचा संशय आहे. एक म्हणजे हिरेन हे तणावाखाली होते आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असं त्यातून दिसू शकतं. ७ मार्च रोजी एटीएसने खुनाच्या प्रकरणाची नोंद केली आहे. दुसरं म्हणजे पत्रामध्ये वाझेविरुद्धच तक्रार असल्यामुळे वाझेंनीच हिरेन यांना पत्र लिहायला सांगितलं असेल अशी कुणालाच शंका येणार नाही.

५१ वर्षांचे सचिन वाझे हे मुंबई पोलिसांमधले एके काळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहेत. ख्वाजा युनुस या २७ वर्षीय इंजिनीयरचा पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला. त्याचा ठपका सचिन वाझे यांच्यावर आहे. त्यासाठी २००४ मध्ये त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं. विनंती करूनही त्यांना पोलीस सेवेत पुन्हा घेण्यात आले नाही म्हणून त्यांनी २००८ मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता.

पण वाझे प्रसिद्धीच्या झोतातून कधीही बाजूला झाले नाहीत. पोलीस सेवेतून बाजूला झाल्यानंतर त्यांनी काही काळासाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्याशिवाय त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांत सायकलिंग केलं. देशाच्या वेगवेगळ्या सीमांवरून सायकलसह आपली छायाचित्रं प्रसिद्ध केली. शीना बोरा खून प्रकरण आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीचं प्रकरण अशी दोन प्रकरणं लिहिली. लय भारी नावाची सोशल नेटवर्किंग साइट सुरू केली. टीव्हीवरच्या चर्चाच्या कार्यक्रमांमध्ये नियमित हजेरी लावली. त्याच्या तांत्रिक कौशल्यांचा, माहितीचा पोलीस तसंच तपास यंत्रणांना उपयोग व्हावा यासाठी काम केलं.

२०१३ मध्ये आलेल्या रेगे या मराठी सिनेमात गाडय़ाचा डीलर असलेल्या पोलिसाची व्यक्तिरेखा आहे. ती वाझे याच्यावरच बेतलेली होती. खऱ्या आयुष्यातील वाझेची त्याचं असं चित्रीकरण केलं जाणं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष वेधलं जाणं याबाबत काहीच हरकत नव्हती. पण त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटचं नाव आपल्या सिनेमासाठी वापरल्याबद्दल त्याने दुसऱ्या एका मराठी सिनेनिर्मात्याविरोधात पाच कोटींचा दावा केला होता. स्वामित्व हक्काच्या मुद्दय़ाचं हे प्रकरण नंतर न्यायालयाबाहेर मिटवण्यात आलं.

वाझेच्या निकटच्या वर्तुळातील एक अधिकारी सांगतो, या सगळ्या काळात वाझे ‘गणवेशाशिवायचा पोलीस’ असल्याच्याच थाटात वावरत असे. फोनवर सुरू असलेला लोकांचा संवाद ऐकता येईल आणि त्यांच्या फोनमधील मेसेज मिळवता येतील असं एक सॉफ्टवेअर आपण विकसित केल्याचा वाझेचा दावा होता. पोलीस सेवेत नसला तरी त्याने या पद्धतीने त्यामधील सगळ्या गोष्टींशी असलेला संबंध सुटू दिला नव्हता, असं हा अधिकारी सांगतो.

वाझे लहानाचा मोठा झाला तो कोल्हापूरमधील शिवाजी पेठ भागामध्ये. तो एक चांगला धावपटू होता. क्रिकेटही चांगला खेळायचा. तो १९९० मध्ये पोलिसात भरती झाला. गडचिरोलीतील नेमणुकीनंतर त्याची ठाण्यात बदली झाली. सुरेश मंचेकर गँग नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच त्यानेही केलेल्या कामाची वाखाणणी झाली.

्त्यानंतर त्याची बदली क्राइम इनव्हेस्टिगेशन युनिट अर्थात सीआययूमध्ये झाली आणि तो मुंबईत आला. इथे त्याने चकमकफेम प्रदीप शर्माबरोबर काम करायला सुरुवात केली. १९९० च्या त्या दशकात शर्मा, साळसकर आणि दया नायक या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा दबदबा होता. या आक्रमक, िहसक अधिकाऱ्यांच्या व्यक्तिरेखांची भुरळ त्या काळातल्या बॉलीवूडलादेखील पडली होती.

वाझे त्याच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीपासून प्रदीप शर्मा यांच्याबरोबर होता. तो त्यावेळी अगदीच अननुभवी असला तरी प्रदीप शर्मा यांच्या टीमबरोबर काम करत असल्यामुळे तोही चकमकफेम म्हणून ओळखला जायला लागला, असं वाझेच्या निकटच्या वर्तुळातील अधिकारी सांगतो.

अर्थात असं असलं तरी त्याने स्वत:ची म्हणून ओळख निर्माण केली. आपल्याला अटक करायला आलेल्या वाझेने आपल्याच खोलीत शांतपणे बसून नम्रपणे बोलत एक कप चहा प्यायला आणि नंतर तोच कप टीपॉयवर आपटून फोडला याची आठवण दहशतवादाच्या आरोपाखाली तेव्हा अटकेत असलेला एक आरोपी सांगतो.

ख्वाजा युनुस प्रकरणाचा ठपका ठेवला जाईपर्यंत वाझे ६० चकमकींमध्ये सहभागी झाला होता असं सांगितलं जातं.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना सत्तेवर आली तेव्हा आपल्याला परत संधी आहे हे वाझेच्या लक्षात आलं. मुंबईचे पोलीस आयुक्त झालेल्या परमबीर सिंग यांच्याबरोबर त्याने त्यापूर्वी काम केलं होतं, या गोष्टीचीही त्याला मदत झाली. १९९० मध्ये गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून परमबीर सिंग यांनी चकमक माहीर अधिकाऱ्यांचं नेतृत्व केलं होतं. ते ठाण्याचे पोलीस आयुक्त झाले तेव्हा त्यांनी प्रदीप शर्मा यांना परत सेवेत घेतलं आणि त्यांची गुन्हे खात्यात नेमणूक केली. हेच वाझेच्या बाबतीतही झालं.

वाझेने २००८ मध्ये दिलेला राजीनामा का स्वीकारला गेला नव्हता ते कुणालाच माहीत नाही. त्याने राजीनामा दिल्यानंतर बारा वर्षांनी, २०२० मध्ये वाझे आणि त्याच्यासह इतर १८ जणांना परत सेवेत घेण्यात आलं. त्यासंबंधीच्या पुनर्निरीक्षण समितीचे प्रमुखही परमबीर सिंगच होते. या सगळ्यांना परत का घेतलं याची जी कारणं सांगितली गेली त्यापैकी सांगितलं गेलेलं कारण होतं, कोविड १९ च्या महासाथीमध्ये ९९ पोलीस कर्मचारी मरण पावल्यामुळे अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात गरज निर्माण झाली आहे.

एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा पुन्हा सेवेत घेतलं जातं तेव्हा काही महिन्यांसाठी त्याला कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवलं जातं. पण वाझेच्या संदर्भात हा संकेत पाळला गेला नाही. काही आठवडय़ांतच त्याला क्राइम ईन्व्हेस्टिगेटिंग युनिट अर्थात सीआययूमध्ये नेमण्यात आलं. सहा महिन्यांतच त्याने त्या काळातली हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास करायला सुरुवात केली. त्यामध्ये ऋतिक रोशनचं बनावट इमेल प्रकरण, दिलीप छाब्रिया प्रकरण, टीआरपी घोटाळा या प्रकरणांचा समावेश होता. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामीला अटक करायला गेलेल्या टीमचं नेतृत्वही त्याच्याकडेच होतं.

तुम्ही माझ्या नावाचा उल्लेख करा पण ही माहिती मी दिली असं लिहू नका, माहितीचं श्रेय मला देऊ नका असा माध्यमांबरोबर बातचीत करताना त्याचा आग्रह असे. ख्वाजा युनुस प्रकरणाचा त्याच्या नावावर लागलेला धब्बा पुसून काढण्यासाठी तो फार उत्सुक होता असं पोलिसांमधील माहीतगार सांगतात.

या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास वाझेकडे असल्यामुळे तो त्याच्या प्रत्यक्षातल्या क्षमतेपेक्षा जास्त मोठा होऊ लागला होता असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी थेट संपर्क साधण्याचीही त्याला मुभा होती असं सांगितलं जातं.

साहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरचा अधिकारी हा साहाय्यक पोलीस आयुक्त या त्याच्या वरिष्ठांना उत्तरदायी असतो. पण वाझे हा साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त या वरिष्ठांच्या सगळ्या साखळीला डावलून थेट पोलीस आयुक्तांच्या संपर्कात असे. तो या पद्धतीने त्याच्या अनेक वरिष्ठांशी चुकीच्या पद्धतीने वागला. पण त्याचा प्रतिवाद करण्याची िहमत कुणीच दाखवली नाही, असं एक अधिकारी सांगतो.

‘संडे एक्स्प्रेस’ने अनेकदा प्रयत्न करूनही परमबीर सिंग यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण हे रायगड पोलिसांच्या अखत्यारीतील असलं तरी त्या संदर्भातली अर्णव गोस्वामी अटकेच्या कारवाईचं नेतृत्व वाझेनेच केलं होतं. पत्रकारांनी रायगड पोलीस आम्हाला या संदर्भातली कोणतीही माहिती देत नाहीयेत अशी वाझेकडे तक्रार केली तेव्हा वाझेने रायगड पोलिसांमधील अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावला आणि रायगड पोलीस माध्यमांना माहिती देऊ शकतात असं सांगितलं.

पण शेवटी वाझेच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे त्याच्यावर ही वेळ आणली आहे.

वाझेप्रमाणेच निलंबन झालेला आणि पुन्हा सेवेत घेण्यात आलेला एक अधिकारी म्हणाला, आधीच्या कार्यकाळात आमच्याकडून झालेल्या चुकांमधून आम्ही बरंच शिकलो. मी नशीबवान होतो म्हणून मला दुसरी संधी मिळाली आहे. त्यामुळे ती मिळाल्यापासून मी लो प्रोफाइल राहून काम करतो आहे. प्रसिद्धीचा झोत तुमच्यावर येतो तेव्हा त्याचे म्हणून तोटे असतात हे समजायला खूप र्वष जावी लागली. पण काही जण त्यातून काहीच शिकत नाहीत असं दिसतं आहे.

‘संडे एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार वाझेने जो प्लान अमलात आणला असा आरोप केला जात आहे तो घडल्यापासून काही तासांतच उघडकीला आला. एटीएसमधल्या सूत्रांच्या सांगण्यानुसार अँटालियासमोर पार्क करण्यात आलेली स्कॉर्पिओ आणि तिच्या मागे मागे गेलेली संबंधित इनोव्हा या दोन्ही वाहनांवरून कुणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याला हा आत्मविश्वास होता. कारण या प्रकरणाचा तपास त्याच्याकडे आणि त्याच्या सीआययूच्या टीमकडे असणार आहे हे त्याला माहीत होतं.

पण अंबानीच्या खासगी सुरक्षा व्यवस्थेने ती स्कॉर्पिओ तिथं असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर आणि वाझेच्या टीमने ती तिथून हलवल्यानंतर तासाभरातच महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएस टीमला त्या गाडीत जिलेटिनच्या काडय़ा सापडल्याचं कळवण्यात आलं.

एटीएसचा वरिष्ठ अधिकारी ती स्कॉर्पिओ ताब्यात घेण्यासाठी गेला तेव्हा वाझेने आपल्या हातातली सूत्रं सोडण्यास नकार दिला. आणि या प्रकरणाचा तपास आपणच करणार असल्याचं त्या अधिकाऱ्याला सांगितलं. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या जवळ असलेल्या यलो गेट पोलीस स्टेशनच्या परिसरात ताब्यात घेण्यात आलेली संबंधित स्कॉर्पिओ ठेवण्यात आली आहे हे मुंबई पोलिसांनी एटीएसच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर मग या सगळ्या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

तिथं पोहोचल्यावर एटीएसला समजलं की, त्या गाडीची नंबर प्लेट बनावट आहे आणि चॉसी आणि इंजिनाच्या नंबरशी छेडछाड करण्यात आली आहे. त्यांनी या गाडीचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सॅम पीटर न्यूटन यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की, ते गाडीच्या सजावटीचे २.८ लाख रुपये देऊ न शकल्यामुळे हिरेन यांनी ती त्यांच्याकडून ताब्यात घेतली होती. मग एटीएसची टीम ठाण्यात हिरेन यांच्या घरी पोहोचली.

एटीएसची टीम हिरेन यांच्या घरी जाऊन धडकल्यामुळे वाझेच्या टीमसमोर हिरेन यांना चौकशीसाठी बोलावण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. एटीएसच्या चौकशीत दिरंगाई व्हावी यासाठी प्रयत्नही केले गेले, असं एटीएसचा अधिकारी सांगतो.

एटीएसमधील सूत्रांच्या मते विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत हिरेन यांचा सीडीआर वाचून दाखवला आणि त्यातून वाझे हिरेन यांच्याशी गेल्या वर्षांत किमान दोन वेळा तरी बोलले आहेत हे स्पष्ट झालं तेव्हा वाझेचं सगळं बिंग फुटलं. सरकारलाही तोंड दाखवायला जागा उरली नाही.

फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नीचं पत्रही विधानसभेत वाचून दाखवलं. त्यात तिने आरोप केला होता की, वाझेने हिरेन यांना या प्रकरणात अटक व्हायला सांगितलं होतं. आपण लवकरच तुला जामिनावर सोडवू असंही त्याने हिरेन यांना आश्वासन दिलं होतं. पण तोपर्यंत एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हातात घेतला होता.

एनआयएने मार्च १३ रोजी वाझेला बोलावलं आणि १२ तासांपेक्षाही अधिकच्या चौकशीनंतर त्याला अटक केली. वाझेचं पुन्हा निलंबन करण्याशिवाय सरकारपुढे दुसरा पर्यायच उरला नाही.

एनआयएच्या आत्तापर्यंतच्या चौकशीतून पुढे आलं आहे की, अंबानीच्या घरासमोर वाहन ठेवण्याच्या षड्यंत्रात वाझे हा सहभागी होता. सीआययूमधल्या त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याला हा प्लान अमलात आणण्यासाठी सहकार्य केलं. अजूनपर्यंत तरी वाझेने तपासात कुणाचंही नाव घेतलेलं नाही.

पण जो आधीच सरकारच्या मते ज्यांना झेड प्लस सिक्युरिटी आवश्यक आहे अशांच्या यादीत येतो अशा भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्फोटकं ठेवून त्याच्या सुरक्षेला धोका असल्याचं चित्र निर्माण करणं या कृतीमागचा नेमका हेतू काय आहे, हा मोठ्ठा प्रश्न अनुत्तरितच आहे.

अशा पद्धतीने तिथं स्फोटकं भरलेली गाडी ठेवायची आणि आपण त्या गुन्ह्य़ाची उकल केली असं दाखवून आपण किती कार्यक्षम आहोत हे दाखवून द्यायचं या हेतूने हे सगळं केलं असं वाझेने एनआयएला सांगितलं असं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या मते एनआयएचं वाझेच्या या खुलाशावर समाधान झालेलं नाही.

वाझेच्या या गुन्ह्य़ाच्या परिणामी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले आणि नवाच वाद सुरू झाला.

आता पुढे काय?

शिवसेनेची नामुष्की

सुरुवातीला तरी उद्धव ठाकरे प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवलेली स्कॉर्पिओ सापडणं, सचिन वाझे यांचा त्यात हात असल्याचं पुढे येणं हे सगळं नाकारण्याच्याच भूमिकेत होतं. या प्रकरणातली सत्यता उघडकीला आल्यानंतर सारवासारव करण्यासाठी आघाडी सरकारची गडबड उडाली. वास्तविक एकदा निलंबन करून पुन्हा सेवेत घेतलेल्या वादग्रस्त सचिन वाझेंवर वेळीच कारवाई करण्यात आघाडी सरकारने दाखवलेली असमर्थता हे या सगळ्या प्रकरणाचं मूळ होतं. २०२० मध्ये कोविडच्या महासाथीमुळे टाळेबंदी सुरू असतानाच्या काळात देखील विरोधात असलेल्या भाजपने सत्ताधारी आघाडीच्या विरोधात फट  शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना राज्याच्या परवानगीशिवाय मुंबईत येऊन तपास करता येणार नाही अशी व्यवस्था केली. वेगवेगळ्या हाय प्रोफाइल प्रकरणांमध्ये सरकारने मुंबई पोलीस आणि त्यांचे आयुक्त परमबीर सिंग यांची पाठराखण केली. अँटालिया बॉम्ब प्रकरणातही सरकारने तेच केलं.

सुरुवातीला तर आठवडा उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात मुंबई पोलिसांना तपासात काहीही मोठं सापडलं नाही याची सरकारला काहीच फिकीर नव्हती. ५ मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे आणि मनसुख हिरेन या दोघांच्याही संभाषणाचे पुरावेच विधानसभेत सादर केले तेव्हा सरकारवर सगळ्यात पहिल्यांदा नामुष्कीची वेळ आली.

फडणवीस विधानसभेत बोलत असतानाच हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत सापडला. हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलं तेव्हा फडणवीस यांच्याकडे होते तेवढेही पुरावे सरकारकडे नसल्यामुळे राज्य सरकारवर पुन्हा तोंड लपवण्याची वेळ आली. सूत्रांच्या मते सरकारला वाझेंची सीआययूमधून तातडीने बदली करायची होती. पण विरोधी पक्षाने मुद्दा उपस्थित केला म्हणून लगेच बदली कशाला करायची असाही एक दृष्टिकोन होता. बदली करण्यात झालेल्या या विलंबामुळे सरकारची नाचक्की झाली असं एका सेना नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं.

८ मार्च रोजी म्हणजे अर्थसंकल्पाच्या दिवशी फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नीने केलेले आरोप वाचून दाखवत पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने आपल्या पत्रात असं म्हटलं होतं की मनसुख यांचा खून झाला असून वाझेंनी तो केला असल्याचा संशय आहे. भाजपा जिथे विरोधात आहे अशा राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना घुसवण्याचा आणखी एक प्रयत्न अशीच या सगळ्याची संभावना करण्याचा आघाडी सरकारने पुन्हा प्रयत्न केला. पण तोपर्यंत एनआयएने अँटिलिया प्रकरणाचा तपास आपल्या ताब्यात घेतला होता. अगदी १० मार्च रोजी वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली केली तेव्हादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची पाठराखण करताना दिसले. एनआयएने १३ मार्च रोजी दिवसभर केलेली वाझेंची चौकशी, त्यांना झालेली अटक, या गुन्ह्य़ातल्या सहभागाविषयी त्यांनी दिलेली कबुली या सगळ्यामधून सरकारचीच प्रतिमा मलिन झाली आहे.

घटनाक्रम

फेब्रुवारी २५

२० जिलेटिनच्या कांडय़ा आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटरवर आढळली.

फेब्रुवारी २६

हे प्रकरण तपासासाठी एपीआय वाझे यांचकडे सोपवण्यात आलं. कार मनसुख हिरेन यांची असल्याचं आढळलं. त्यांची वाझे यांनी चौकशी केली.

मार्च १

वाझे आणि हिरेन यांचे आधीपासून संबंध असल्याचं आढळल्यामुळे तपास अधिकारी बदलला.

मार्च ४

हिरेन गायब झाले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह ठाणे खाडीत सापडला.

मार्च ६

त्यांच्या मृत्यूचा तपास एटीएसने करायला घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या खुनाची नोंद करण्यात आली. या खुनात वाझे यांचा सहभाग असल्याचा हिरेन यांच्या पत्नीचा आरोप. फेब्रुवारी ५ च्या आधीही कित्येक महिने वाझेच ती स्कॉर्पिओ वापरत असल्याचाही आरोप.

मार्च ८

अँटिलिया बॉम्ब प्रकरण एनआयएने ताब्यात घेतलं.

मार्च १३

एनआयएने वाझे यांना अटक केली. दुसऱ्याच दिवशी त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली. स्कॉर्पिओचा पाठलाग करणारी एनोव्हादेखील सीआययूचीच असल्याचे एनआयएचे स्पष्टीकरण.

मार्च १५

वाझे निलंबित

मार्च १७

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली

मार्च १९

हिरेन खून प्रकरणात आपल्याकडे वाझेविरुद्ध पुरावे असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले.

मार्च २०

मनसुख हिरेन खून प्रकरण एटीएसकडून एनआयएकडे वर्ग

— विश्वास वाघमारे

संडे एक्स्प्रेसमधून

अनुवाद वैशाली चिटणीस